भूमिरूप विज्ञान : पृष्ठभागावरील भूमिरूपे आणि त्यांच्यावर होणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैव प्रक्रिया यांसंबंधीचे अध्ययन करणारे विज्ञान. ग्रहोपग्रहांच्या, विशेषेकरून पृथ्वीच्या पृष्ठभागी. असणाऱ्या विविध प्रकारच्या भूमिरुपांचे वर्णन, वर्गीकरण, उत्पत्ती, विकास व इतिहास यांचा अभ्यास यात केला जातो. खंड आणि महासागरांच्या द्रोणी ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी रुपे असून ती आद्य भूमिरूपे म्हणता येतील मात्र त्यांचा अभ्यास या विज्ञानात प्रत्यक्षात केला जात नाही. ⇨ कवच विरूपण, अग्निज क्रिया (उदा., ज्वालामुखीचे उद्‌गीरण) व ⇨ झीज आणि भर या भूमिरूपे निर्माण करणाऱ्या प्रमुख क्रिया आहेत. पहिल्या दोन्हींमुळे निर्माण होणाऱ्या भूमिरूपांना प्राथमिक, तर तिसरीने निर्माण होणाऱ्यांना द्वितीयक (किंवा क्रमसूचक) भूमिरूपे म्हणतात. भूमिरूपविज्ञानात मुख्यतः द्वितीयक भूमिरूपांचा विचार केला जातो. अर्थात प्राथमिक भूमिरूपे तसेच, समुद्रतळावरील व इतर ग्रहोपग्रहांवरील भूमिरूपांचाही अभ्यास भूमिरूपवैज्ञानिकांना करावा लागतो. तसेच भूमिरूपविज्ञानातील माहितीचा उपयोग पर्यावरणीय अभियांत्रिकीचे काही प्रश्न सोडविण्यासाठी कसा करून घेता येईल, याचा विचारही भूमिरूपवैज्ञानिक करतात.

भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकांवर पाणी (उदा., नद्या), वारा, हिमनद्या, लाटा, जीव, जलवायुविज्ञान (दीर्घकालीन सरासरी हवामान), गुरुत्व इ. कारकांचा सतत परिणाम होत असतो. त्यामुळे भूपृष्ठाची सतत झीज व भर होऊन भूदृश्य बदलत असते. भूमिजलाचा भूमिरूपांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे पर्वत, दऱ्या, घळी, खोरी, पूरभूमी, जलोढ पंखे, डोंगरांचे उतार व माथे, सागरी गुहा, पठारे, द्रोणी, कॅन्यन, निदऱ्या, छत्री खडक, मेसा, ब्यूट, शैलभिंती, वाळवंटे, ड्रमलीन, हिमस्थगिरी, हिमगव्हरे, त्रिभुज प्रवेश, वालुकाभिंती (दांडे), पुळणी, लोएस, वालुकागिरी, मैदाने, एस्कर, प्रवाळभिंती इ. अनेक भूमिरूपे निर्माण होतात आणि ती सावकाशपणे सतत बदलत असतात. (विश्वकोशामध्ये यांपैकी बहुतेक भूमिरूपांवर स्वतंत्र नोंदी आहेत). भूमिरूपे उत्क्रांत होताना घडणाऱ्या साऱ्या घडामोडी ह्या खडकांचे संघटन, प्रकार व संरचना, त्यांच्यावर कार्य करणाऱ्या कारकांचा प्रकार वा प्रक्रिया, हवामान इ. अनेक घटकांवर अवलंबून असतात. म्हणून या सर्वांचा अभ्यास भूमिरूपविज्ञानात केला जातो. भूपृष्ठाची संरचनात्मक मांडणी, वातावरणक्रिया, जमिनीची हालचाल आणि टेकड्यांचे उतार, हिमानी व परिहिमानी (हिमनदी व हिमस्तरांभोवतालच्या भागातील) घटना, समुद्रकिनारे ⇨ कर्स्ट भूमिस्वरूप इत्यादींचा विचार यात केला जातो. त्यावरून एखाद्या प्रदेशातील प्राचीन काळातील भूमिरूपे, तेव्हाचे जलवायुमान, झीज आणि भर करणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप यांविषयी अनुमान करता येते. विशेषेकरून पृथ्वीच्या इतिहासामधील सर्वांत अलीकडच्या काळातील भूमिरूपांचा व त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रक्रियांचा इतिहास समजण्याच्या दृष्टीने भूमिरूपविज्ञानाची माहिती उपयुक्त ठरते.

अशा प्रकारे भूमिरूपविज्ञान प्राकृतिक भूगोल व भूविज्ञान यांचे महत्त्वाचे अंग झाले आहे. तसेच यामध्ये मुख्यत्वे नैसर्गिक प्रक्रियांचा विचार केला जात असल्याने याचा पुढील अनेक विज्ञानशाखांशी निकटचा संबंध आहे. अवसादविज्ञान, संरचनात्मक भूविज्ञान, जलवायुविज्ञान, हिमानी भूविज्ञान, जलविज्ञान, मृदाविज्ञान, परिस्थितिविज्ञान, प्लाइस्टोसीन भूविज्ञान (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या कालविभागाचे भूविज्ञान),अभियांत्रिकी, जीवविज्ञान, भूरसायनाशास्त्र, खनिजविज्ञान, शिलावर्णनविज्ञान, सागरी भूविज्ञान, द्रायुयामिकी, ज्वालामुखीविज्ञान, भूकंपविज्ञान वगैरे. यांशिवाय हवाई छायाचित्रण, कृत्रिम उपग्रहांद्वारे केलेली निरीक्षणे, दूरवर्ती संवेदना ग्रहणतंत्रे इत्यादींचेही साहाय्य यात घेतले जाते.

इतिहास : हीरॉडोटस (इ. स. पू. पाचवे शतक), स्ट्रेबो (इ.स.पू. पहिले शतक), इब्न सीना (९८०-१०३७) इत्यादींना भौतिक प्रक्रियांनी भूमिरूपे बनतात याची कल्पना होती तर लिओनार्दो दाव्हींची (१४५२ – १५१९), जॉर्ज ॲग्रिकोला वगैरेंना दऱ्यांची निर्मिती व गाळाची वाहतूक नद्यांमुळे होते, हे माहीत होते. मात्र आधुनिक भूमिरूपविज्ञानाचा उदय एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी झाला. नद्या व इतर जलप्रवाह यांच्या द्वारे भूपृष्ठाची दीर्घकाळ झीज व भर झाल्याने बहुतेक दऱ्या बनल्याचे जेम्स हटन, जॉन प्लेफेअर व चार्लस लायेल यांनी दाखवून दिले. या व इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनकार्यामुळे ही विज्ञानशाखा स्वतंत्र गणली जाऊ लागली. एकोणिसाव्या शतकात खनिजपदार्थांचा शोध घेण्यासाठी जगभर सर्वेक्षणे करण्यात आली. त्यांतून मिळालेल्या माहितीमुळे भूमिरूपविज्ञानाच्या अध्ययनास मदत झाली.

ग्रोव्ह कार्ल गिल्‌बर्ट (१८४३ – १९१८) हे एक आधीचे प्रमुख भूमिरूपवैज्ञानिक होत. जिऑलॉजी ऑफ हेन्ऱी मौंटन्स (१८७७) या त्यांच्या अहवालामुळे कवचाच्या हालचाली आणि झीज-भर प्रक्रिया यांच्या अभ्यासात सुसंगती आली. लेक बॉनव्हील (१८९०) या व्याप्तिलेखात त्यांनी ग्रेट सॉल्ट लेक या सरोवराचा प्लाइस्टोसीन काळातील इतिहास लिहिला तर हिस्टरी ऑफ नायगारा रिव्हर (१८९०) या पुस्तकात नायगारा नदी व धबधब्याविषयीचे त्यांचे संशोधन दिलेले आहे. नदीमुळे होणारी गाळाची वाहतूक व नदीच्या बदलत्या पात्राचे हाणारे परिणाम यांचे पृथक्करणही त्यांनी केले होते. शिवाय त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील वैशिष्ट्यांचा अभ्यास केला होता.

आधुनिक कार्य : भूमिरूपविज्ञानाचा सैद्धांतिक पाया ⇨ विल्यम मॉरिस डेव्हिस यांनी घातल्याचे मानतात. विविध प्रक्रियांनी भूपृष्ठाची झीज होत राहून भूपृष्ठाचे स्वरूप टप्प्या-टप्प्याने बदलते व भूमिरूपे (किंवा भूदृश्य) उत्क्रांत होत असतात, हा अनुमानिक सिद्धांत त्यांनी मांडला. याला अपक्षरण, क्षरण अथवा भूमिरूपचक्र असेही म्हणतात. सर्व भूमिरूपांची संरचना, त्यांवर कार्य करणाऱ्या प्रक्रिया आणि त्यांकरिता लागणारा काळ या गोष्टींचे स्पष्टीकरण या सिद्धांताद्वारे करता येते. असे डेव्हिस यांचे मत होते.

त्यांचा हा सिद्धांत १९०९ साली जिऑग्राफिकल एसेज मध्ये प्रसिद्ध झाला. तथापि त्याचा विकास १८८४ – १९३४ या काळात झाला. भूमिरूपाचा विकास युवा, प्रौढ व वृद्ध या तीन अवस्थांतून होतो व या प्रत्येक अवस्थेची खास वैशिष्ट्ये असतात, असे यात गृहीत धरलेले आहे. उत्थानाने भूपृष्ठ वर उचलले जाते (उदा.,घडीचा पर्वत) तेव्हा युवावस्था सुरू होते. विशेषतः नद्यांमुळे अशा भूपृष्ठाची झीज होऊन जवळजवळ असलेल्या पुष्कळ दऱ्या खोदल्या जाऊन भूपृष्ठाला प्रौढावस्था प्राप्त होते. यापुढे झीज होत राहून शेवटी भूपृष्ठ स्थलीप्राय म्हणजे जवळजवळ सपाट मैदानासारखे होते तेव्हा त्याला वृद्धावस्था प्राप्त झाली, असे म्हणतात. यांपैकी कोणत्याही अवस्थेत पुन्हा उत्थान झाले, तर या चक्रात खंड पडू शकेल आणि पुन्हा युवावस्था प्राप्त होईल. याला पुनर्युवीकरण म्हणतात. अशा प्रकारे भूमिरूपाच्या अवस्थेवरून त्याच्या इतिहासाची कल्पना येऊ शकते, असे डेव्हिस यांचे मत होते.


टेकड्यांचे उतार, दऱ्या, पर्वत, नदीसंहती यांसारख्या सर्व भूमिरूपांच्या बाबतीत हे चक्र लागू पडते. विशेषतः आर्द्र समशीतोष्ण प्रदेशांतील भूमिरूपांच्या बाबतीत ही कल्पाना उपयुक्त ठरली आहे. उष्ण कटिबंधीय, ध्रुवीय व वाळवंटी भूमिरुपांच्या बाबतींत अन्य कल्पना मांडण्यात आल्या आहेत. खडकाचा प्रकार व संरचना, झीज होण्याची प्रक्रिया यांद्वारे भूमिरूपाचे स्वरूप ठरते, हे डेव्हिस यांना मान्य होते परंतु काळ हा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचा त्यांचा आग्रह होता. आता भूमिरूपाच्या विकासात काळ हा इतर घटकांपेक्षा अधिक महत्त्वाचा असल्याचे मानीत नाहीत. वॉल्टर पेंक यांनी या चक्राचे वृद्धी, स्थितिशील व क्षीणन असे टप्पे पाडले होते लेस्टर किंग यांचा दृष्टिकोन काही प्रमाणात असाच होता.

भूमिरूपे दर्शविण्यासाठी प्राकृतिक नकाशे व ठोकळ्या आलेख यांचा वापर करतात. भूमिरूपाचा विकास कालपरत्वे कसा झाला असेल, हे सामान्यपणे ठोकळ्या आकृत्यांच्या मालिकेने दर्शवितात. या अजूनही उपयुक्त आहेत. मात्र त्यांच्यावर पुष्कळ टीका झाली होती. कारण मालिकेतील काल्पनिक घटनाक्रम हा पुरावाच असल्याचे मानण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. आता यांशिवाय इतर अनेक प्रकारचे नकाशे वापरात आहेत. त्यांच्यात असाधारण अशी किंवा विशिष्ट प्रकारे निर्माण झालेली भूमिरूपे रेखाटतात.

आर्. ई. हॉर्टन व ए. एन् स्ट्रॅलर यांनी भूमिरूपविज्ञानात साख्यिकीय पद्धतींचा वापर सुरू केला, तर १९५० नंतर या विज्ञानातील परिमाणात्मक व प्रायोगिक पद्धतींचा वापर वाढत आहे. तसेच १९५७ नंतर चंद्र व इतर ग्रहांच्या पृष्ठभागांचा अभ्यास अधिक होऊ लागल्याने भूमिरूपविज्ञानाला नवीन क्षेत्र लाभले आहे. ग्रहोपग्रहांच्या पृष्ठभागांच्या समन्वेषणाने मिळालेल्या माहितीमुळे भूमिरूपवैज्ञानिक प्रक्रियांमधील वैचित्र्य अधिक स्पष्ट झाले व त्यातून पृथ्वीवरील भूमिरूपांविषयीच्या नवनवीन परिकल्पना पुढे आल्या. आता चंद्र व बुधावरील अशनिविवरे, मंगळावरचे प्रचंड भूमिपात व घळी, गुरूच्या आयो या उपग्रहावरील विलक्षण ज्वालामुखीक्रिया, गुरूच्या गॅनिमीड या उपग्रहावरील हिम-सांरचनिकी इ. रहस्ये उलगडण्याच्या कामी  भूमिरूपविज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.

इ. स. १९५० नंतर डेव्हिस यांच्या सैद्धांतिक विचारांना पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आले आहेत. त्यांपैकी जर्मनी व फ्रान्समध्ये पुढे आलेले जलवायुमानीय भूमिरूपविज्ञान हे विशेष महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विशिष्ट भूमिरूपे व प्रक्रिया ही ठराविक जलवायुमान असणाऱ्या प्रदेशांशी निगडीत असतात असे मानले आहे. याच काळात या विज्ञानात खूप विविधता आलेली आहे आणि सापेक्षतः कमी व्याप्ती असलेल्या क्षेत्रांचे (उदा., किनारी प्रक्रिया, नादेय प्रक्रिया, हिमानी भूविज्ञान, चतुर्थकालीन भूविज्ञान म्हणजे गेल्या सु. ६ लाख वर्षांतील खडकांचे अध्ययन, कार्स्ट भूमिस्वरूप इ.) खास अध्ययन करणारे शास्त्रज्ञांने पुष्कळ गट पुढे आले आहेत.

भूपृष्ठावरील बहुतेक भूवैज्ञानिक प्रक्रियांचा तसेच भूपृष्ठालगतच्या आणि त्याच्या खोल भागातील भूवैज्ञानिक प्रक्रियांचा भूमिरुपनिर्मितीत प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध येतो (उदा., पर्वताची झीज). वातावरण क्रिया, मृदानिर्मितीच्या क्रिया, हिमानी क्रिया, पाणी, वारा, लाटा, गुरूत्व वगैरेंद्वारे होणारी वाहतूक इ. क्षरणाच्या म्हणजे विनाशक क्रिया होत. रचनात्मक क्रियाही भूमिरूपांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. अर्थात या दोन्ही क्रियांमधील आंतरक्रियांचा परिणाम म्हणजे भूमिरूपनिर्मिती आहे. म्हणून या प्रक्रियांचा अभ्यास हा भूमिरूपविज्ञानाचे महत्त्वाचे अंग होय. हल्ली या प्रक्रियांच्या मूलगामी अभ्यासावर अधिक भर देण्यात येत असून ‘प्रक्रिया भूमिरूपविज्ञान’ ही याची स्वतंत्र उपशाखाच बनली आहे. त्यामुळे प्रवाह आणि सरोवरे यांतील क्रिया, वाऱ्याची द्रव्य वाहून नेऊन साचविण्याची क्रिया, उतारावरून होणारी द्रव्याची हालचाल-उदा., भूमिपात, मृदासर्पण इ. [⟶ भूमिपात], किनारी व पुळण भागातील लाटा व प्रवाहांची क्रिया इ. सर्व विनाशक व रचनात्मक प्रक्रियांचा अभ्यास यात केला जातो. याकरिता प्रत्यक्ष क्षेत्रातील व प्रयोगशाळेतील नव्या पद्धती व विश्लेषण करण्याची नवनवीन तंत्रे वापरतात (उदा., प्रयोगशाळेत शक्य तेवढ्या तंतोतंत पण छोट्या प्रतिकृती बनवून नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास करणे). यांपैकी पुष्कळ तंत्रे इतर विज्ञानशाखांतील असल्याने हा अभ्यास आंतरवैज्ञानिक दृष्टिकोनातून करावा लागतो. यामुळे भूमिरूपविज्ञानाच्या सैद्धांतिक विचारात काहीशी पोकळी निर्माण झाली आहे.

भूमिरूपांचे वर्गीकरण हा या विज्ञानातील महत्त्वाचा मुद्दा आहे. भूमिरूपांचे उत्पत्तीनुसार वा विकासानुरूप वर्गीकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो व त्यासाठी भूवैज्ञानिक प्रक्रिया तपशीलवार समजून घेणे आवश्यक ठरते. भूमिरूपांना आकार देण्याऱ्या प्रक्रियांना अनुसरून भूमिरूपांचे वर्णन करणे व त्यांचे गट पाडणे या हेतूने एकोणिसाव्या शतकात अशा अनेक वर्गीकरण पद्धती सुचविण्यात आल्या. काही पद्धतींत भूमिरूपांच्या उत्क्रांतीतील घटक म्हणून भूमिरूपाच्या टप्प्याचा विचार केला होता, तर काहींत शिलावर्णन, थरांची मांडणी, खडकांतील विभंग व संधी, तसेच भूपृष्ठाचा मोठा भाग उचलला जाणे, जलवायुमानातील फरक हे स्थूल परिणाम करणारे घटक विचारात घेतले होते.


विशिष्ट भूदृश्याच्या उत्पत्तीचा विचार करताना खडकाची संरचना व भूदृश्य यांतील परस्परसंबंध चटकन लक्षात येतात. शिवाय तेथील जलवायुमानाचा भूदृश्यावर परिणाम होत असतो.

कोलोरॅडो पठारावरील ‘ग्रँड कॅन्यन’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. वालुकाश्म, चुनखडक व शेल या खडकांचे बनलेले हे पठार जवळजवळ सपाट आहे. यांपैकी काही खडक कमी प्रमाणात, तर काही जास्त प्रमाणात झिजल्याने येथे पायऱ्यापायऱ्यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण जटिल भूद्दश्य निर्माण झाले आहे. येथील शुष्क वा अर्धशुष्क जलवायुमान हे अशी झीज होण्यामागील एक कारण आहे. अशा जलवायुमानामुळे तेथील जमिनीवरील वनस्पतींच्या आच्छादनाचे व पर्यायाने नदीद्वारे होणाऱ्या झिजेचे स्वरूप ठरले. झीज होतानाच वेळोवेळी पठार वर उचलेले जाण्याची क्रियाही घडून आल्याने या पठाराचा भूवैज्ञानिक इतिहास गुंतागुंतीचा झालेला आहे.

अशा प्रकारे भूवैज्ञानिक प्रक्रिया, खडकांचा प्रकार व संरचना आणि भूप्रदेशाचा अगदी अलीकडच्या काळातील भूवैज्ञानिक इतिहास या सर्वांच्या एकत्रित परिणामातून भूदृश्य उत्क्रांत होते असते.म्हणून या सर्वांचे अध्ययन भूमिरूपविज्ञानात महत्त्वाचे असते.

इ. स. १९५० नंतरच्या काळात भूमिरूपविज्ञानाच्या अभ्यासाचे पुढील प्रमुख विभाग पाडण्यात आले आहेतः (अ) निरीक्षणांद्वारे भूमिरूपांचे शक्य तेवढे अचूक वर्णन करणे, (आ) भूमिरूपांचे आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या प्रक्रियांचे वर्गीकरण करणे आणि (इ) भूमिरूपांच्या उत्पत्तीच्या परिकल्पना सुचविणे व शक्य झाल्यास क्षेत्रीय अध्ययनाने त्या तपासून पाहून भूमिरूपांच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत विकसित करण्याचा प्रयत्न करणे.

(अ) भूमिरूपांचे वर्णन विविध प्रकारे (उदा., त्यांचे आकार, आकारमान, दिकस्थिती, उताराचा कोन, तसेच खडकाच्या राशीची संरचना, भूमिरूपाच्या निर्मितीची तऱ्हा व अवस्था देऊन) करतात. असे वर्णन करण्यामागील हेतू वेगवेगळे असू शकतात. डेव्हिस यांची वर्णनशैली ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची होती व १९५० पर्यंत तिचा बराच पगडा होता. १९५० नंतर ए. एन्. स्ट्रॅलर यांनी अधिक वस्तुनिष्ठ वर्णनाचा पाठपुरावा केला. त्यासाठी अचूक स्थलवर्णनात्मक नकाशे व सर्वेक्षणाद्वारे मिळणारी अचूक परिमाणे व आकार यांचा वापर होऊ लागला. या माहितीचे सर्वमान्य सांख्यिकीय पद्धतींनी विश्लेषणही करतात.

(आ) भूमिरूपांचे तसेच त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रक्रियांचे वर्गीकरण करण्याची गरज असते (उदा., उताराचे आकारावरून अंतर्गोल, बहिर्गोल वा सपाट किंवा कोनावरून तीव्र वा सौम्य असे प्रकार पाडतात). वर्गीकरणाचा भूमिरूपाच्या उत्पत्तीशी संबंध असतोच असे नाही. मात्र त्यामुळे उत्पत्तीविषयीची पार्श्वभूमी तयार होऊ शकते. वर्गीकरण करताना सुटीसुटी भूमिरूपे किंवा प्रक्रिया विचारात घेत नाहीत तर त्यांच्या समूहाचा विचार केला जातो.

वातावरणाक्रिया, गाळाची वाहतूक व झीज यांच्या बाबतीत प्रत्येक जलवायुमानीय प्रदेशाची स्वतःची अशी वेगळी परिस्थिती असते. यावरून प्रत्येक  जवलायुमानाची वैशिष्ट्यपूर्ण भूमिरूपे किंवा भूदृश्ये असतात, असे काहींचे मत आहे. अशा प्रकारे पेंक, जे. ब्युडेल, एल्. सी. पेल्त्ये यांनी भूमिरूपांचे जलवायुमानीय प्रदेशावर आधारलेले प्रकार पाडले आहेत.

(इ) भूमिरूप, विशेषतः त्याचे समूह (भूद्दश्य), कसे निर्माण झाले याचे स्पष्टीकरण देणे हे भूमिरूपविज्ञानाचे शेवटचे उद्दिष्ट असते. भूदृश्ये वा भूमिरूपे अतिशय गुंतागुंतीची असतात. त्यांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे भूमिरूपांच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण पुढील विविध मार्गांनी देता येते.

विशिष्ट प्रकारचे जलवायुमान, खडकांचा प्रकार व संरचना यांच्यातील परस्परसंबंध ठरवून भूमिरूपांच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देता येते. उदा., ग्रॅनाइट, चुनखडक वा बेसाल्ट इ. खडक असलेल्या भागात नेहमी आढळणारी भूमिरूपे शोधण्याचा प्रयत्न करतात. तसेच उतारावर खडकाचा की त्याच्या संरचनेचा (उदा., थराच्या नतीचा) प्रभाव पडलेला आहे, याचा अभ्यास करतात.

भूमिरूपांच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण ऐतिहासिक दृष्टीनेही केले जाते. त्यासाठी हल्लीचे भूदृश्य ज्या पूर्व अवस्थांमधून उत्क्रांत झाले, त्या अवस्था स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ही विचारसरणी डेव्हिस यांच्याकडून आली आहे. पूर्वीची स्थलीप्राय पृष्ठे ओळखणे, त्यांचा काळ ठरविणे, त्यांचा अर्थ लावणे तसेच नदी-संहतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे यांचा या विचारसरणीत अंतर्भाव होतो. मात्र या विचारसरणीचे पुढील दोष आहेत : यामुळे थोड्याच प्रदेशाविषयी स्पष्टीकरण देता येते यासाठी कुशल व्यक्तीची गरज असते व ही विचारसरणी अनुमानांवर आधारलेली असल्याने मतभेदांना वाव मिळतो.


भूमिरूप व सुट्यासुट्या प्रक्रिया वा त्यांचे गट यांच्यातील परस्परसंबंधांद्वारे भूमिरूपाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यात येते. याकरिता वातावरणक्रिया, झीज आणि भर यांचे विश्लेषण केले जाते. अर्थांत यामध्ये टोकाची मते आढळतात. पुष्कळ प्रक्रिया अगदी मंद वा अधूनमधून होणाऱ्या असल्याने त्यांचे मापन काळजीपूर्वक करावे लागते. विशिष्ट प्रक्रियेने विशिष्ट भूमिरूप बनते, असे ठामपणे म्हणता येत नाही. तसेच निसर्गात एकाच वेळी अनेक परस्परविरोधी प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे एका सुट्या प्रक्रियेचा वेगळा अभ्यास करणे अवघड असते. जरी भूमिरूप व प्रक्रिया यांच्यातील परस्परसंबंध दाखविता आला, तरी भूमिरूप हे या प्रक्रियेतून आले की उलट झाले आहे, हे स्पष्ट होतेच असे नाही. म्हणजे प्रक्रिया आधी की भूमिरूप आधी किंवा दोन्ही परस्परावलंबी आहेत, असा प्रश्न पडतो.

अर्थात विशिष्ट प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी वरील सर्व विचार सरणींचे साहाय्य घ्यावे लागते. उदा., टॉरच्या उत्पत्तीचा विचार करताना खडक, त्यांची संरचना, प्रदेशाचा भूवैज्ञानिक व जलवायुमानीय इतिहास व वातावरणक्रियेचा (प्रक्रियेचा) प्रकार या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

भूमिरूपविज्ञानात अशा तऱ्हेच्या अनेक अडचणी आहेत. हे विज्ञान नवीन असल्याने भूमिरूपे व त्यांची उत्पत्ती यांविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन माहिती पुढे आली की, प्रचलित सिद्धांत तपासून घ्यावे लागतात. जलवायुमान व भूमिरूप यांच्यातील परस्परसंबंधाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. शिवाय या विज्ञानाचे स्वरूपच असे आहे की, त्यात पुढील अंगभूत अडचणी येतात : यावर एकरूपतावादी (आताच्या प्रक्रियांद्वारे पूर्वीच्या प्रक्रियांविषयी अनुमान करता येते असे मानणाऱ्या) विचारसरणीचा पगडा आहे परंतु जलवायुमानात अलीकडील काळात झालेले बदल या दृष्टीने अडचणीचे ठरतात. कारण त्यांवरून पूर्वीच्या परिस्थितीचे आकलन अचूकपणे होऊ शकत नाही. भूमिरूपांच्या निर्मितीमागील प्रक्रिया ह्याच मुळात विनाशकारी आहेत (त्यात मानवी कार्यांची भर पडते आहे ती वेगळीच) म्हणजे जूनी भूमिरूपे नष्ट होऊन नवीन बनत असतात. उदा., उताराच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत मांडायचा झाल्यास हल्लीच्या उताराचे पूर्वीचे स्वरूप जाणून घेणे महत्त्वाचे असते. मात्र दुर्दैवाने पूर्वीचा उतार कायमचाच नष्ट झालेला आहे. तसेच गाळावरून झीज होण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती मिळू शकते हे खरे परंतु हा गाळ सहज नष्ट होऊ शकतो हेही खरे. थोडक्यात आवश्यक त्या पुराव्यांची कमतरता या विज्ञानात भासतेच, शिवाय मागे उरलेले पुरावेही सलग नसून खंडित स्वरूपाचे असल्याने त्यांच्याविषयी एकमत होणे अवघड असते. यांतील मापने निःसंदिग्ध, अचूक व सुसंगत नसतात.त्यामुळे त्यांची सरासरी मूल्ये खरी प्रातिनिधिक नसतात व यातून सांख्यिकीय प्रश्न उभे राहतात. तसेच प्रयोगशाळेत काळाची पूर्ती करता येणे शक्य नसते, म्हणून सर्वसाधारण सूत्र बनविणे अवघड होते.

मानवी जीवनावर भूमिरूपांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम होतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. माणूस गरजांनुसार भूमिरूपाशी जुळवून घेतो किंवा शक्य असल्यास त्यांच्यात बदल करून घेतो. देशांचा विचार केल्यास भूमिरूपे सांस्कृतिक देवाणघेवाण, संरक्षण, व्यापार वगैरे दृष्टींनी महत्त्वाची असतात. उदा., पर्वत हा दळणवळणातील अडथळा ठरतो तर मैदानी प्रदेश शेती व वस्ती यांना सोयीचा असतो आणि तेथील राहणीमानात एकसारखेपणा येऊ शकतो. बंदरांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या खडकाळ किनाऱ्यावर मच्छीमारी समाज भरभराटू शकतो तर सुपीक किनारी भागात शेतीची भरभराट होऊ शकते. डोंगराळ भागाचा हवामानावर, तर जमिनीच्या उताराचा तिच्या सुपीकतेवर होणारा परिणाम, हे भूमिरूपांचे अप्रत्यक्ष परिणाम होत.

विशेषकरून जमिनीच्या वापराच्या दृष्टीने (उदा., शेती, सिंचन, खाणकाम इ.) भूमिरूपे अतिशय महत्त्वाची ठरतात. उलट नदी, हिमनदी व महासागरातील गाळ व वाळू यांची हालचाल, नदीच्या पात्रात होणारा बदल, जमिनीची धूप, भूमिपात, किनारी भागातील झीज वगैरे घटनांवर होणारे मानवी समाजाचे परिणाम वाढत आहेत. तसेच या गोष्टींपासून मानवाला होऊ शकणारा धोकाही वाढत आहे. पर्यावरणाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनेही भूमिरूपविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे मानवी जीवनाच्या दृष्टीने भूमिरूपविज्ञानाचे महत्त्व वाढते आहे.

पहा : किनारा व किनारी प्रदेश गाळाचे खडक, झीज आणि भर नदी भूमिपात लाटा, समुद्रातील वारे वाळवंट स्थलवर्णन हिमनदी.

संदर्भ :

1.Easterbrook, D. J. Principles of Geomorphology, New York, 1969. 2. Pitty, A. F. Introduction to Geomorphology, London, 1971. 3. Ritter, D. F. Process Geomorphology, Dubuque, Io., 1978. 4. Small, R. J. The Study of Landforms, Cambridge, 1977, 5. Sparks, B. W. Geomorphology, London, 1965

ठाकूर, आ. ना.