अपचन : अन्नपचन योग्य न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे व अस्वस्थता ही लक्षणे असलेल्या विकाराला ‘अपचन’ असे म्हणतात. पचन तंत्रात रचनात्मक बिघाड नसून पचनक्रियेत दोष उत्पन्न झाल्यास ही संज्ञा वापरतात.

कारणे : अती खाण्यामुळे तसेच तळलेले, तिखट व मसाल्याचे पदार्थ, त्याचप्रमाणे पचण्यास जड किंवा सवय नसलेले पदार्थ खाण्यात आल्यास अपचन होते. काळजी, मनस्ताप वगैरे भावनाप्रधान कारणांमुळे व पित्ताशयविकार आंत्रपुच्छशोथ (ॲपेंडिक्सची दाहयुक्त सूज) वगैरे कारणांमुळे प्रतिक्षेपी अपचन होऊ शकते. अन्न नीट न चावता घाईघाईने गिळणे, जेवणानंतर लगेच व्यायाम व श्रम करणे यांमुळेही अपचन संभवते.

यांशिवाय अपचन आणखी एका विशिष्ट कारणाने होते. यात पिष्ठमय पदार्थांच्या पचनात दोष उत्पन्न होते. नेहमी पिष्ठमय पदार्थाचे पचन मुख्यतः लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) वरच्या भागात अग्निपिंड स्रावातील विशिष्ट पिष्ट-पाचक (ॲमिलॉप्सी) एंझाइमामुळे (शरीरातील रासायनिक विक्रिया सुलभतेने होण्यास मदत करणाऱ्‍या संयुगामुळे) होते. लघ्वांत्रा- तून अन्न फार वेगाने खाली उतरल्यास त्या एंझाइमाची पिष्ठमय पदार्थांवरील आवरणावर क्रिया होण्यास पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे अन्न लघ्वांत्राच्या खालच्या भागात येईपर्यंत पिष्ठमय पदार्थांचे द्राक्षशर्करेत (ग्लुकोजमध्ये) रूपांतर होत नाही. तेथील एंटरोकॉकस या सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे त्या अर्धवट पचलेल्या पिष्ठाचे किण्वन (जैव पदार्थाचे हळूहळू होणारे विघटन) होऊन कार्बन डाय-ऑक्साइड व अम्ले उत्पन्न होतात. याला ‘आंत्र-पिष्ठापचन’ असे नाव आहे.

 लक्षणे : भूक न लागणे, पोट फुगणे, जेवणानंतर अस्वस्थता व ढेकर येणे व अपान वायू सरणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत.

 आंत्र-पिष्ठापचनात फुगवटी व वेदना, पोटात गुरगुरणे ही लक्षणे पोटाच्या खालच्या भागात व बेंबीभोवती आढळतात. बहुधा रात्रीच्या वेळी व सकाळी दुर्गंधी नसलेला अपान वायू सरकतो. पोटातल्या गुरगुरण्यामुळे व अस्वस्थतेमुळे झोप चांगली लागत नाही.

चिकित्सा : अती खाणे टाळणे, शिळे व पचण्यास जड असे पदार्थ वर्ज्य करणे, काळजी, मनस्तापादी भावना टाळणे व अन्नासंबंधी सवयी बदलणे या गोष्टी चिकित्सेत मूलभूत आहेत. नियमित वेळा सावकाश चावून चावून अन्न खाणे, जेवणानंतर काही वेळ विश्रांती घेणे व जरूर तर हवापालट करणे या गोष्टींचा चांगला उपयोग होतो.

आंत्र-पिष्ठापचनात डायास्टेज या वनस्पतिजन्य एंझाइमाचा उपयोग होतो  तसेच आंत्रातील क्रमसंकोच व अपाचित पिष्ठमय पदार्थांची गती फार वेगाने होऊ नये म्हणून शामके देतात.

जठर, यकृत, पित्ताशय वगैरे अंतस्त्यांचे (अंतर्गत इंद्रियांचे ) विकार किंवा अंतर्गळ नाही याची खात्री करून घेणे या विकारात अगत्याचे असते.

ढमढेरे, वा. रा.

 आयुर्वेद चिकित्सा : प्रमाणापेक्षा जास्त, अवेळी, भोजनाचे नियम सोडून अथवा बेचैन मनःस्थितीत असताना केलेल्या जेवणामुळे अजीर्ण होते. अजीर्णावर लंघन हा जरी मुख्य उपाय असला तरी पोटात अजीर्णरूप होऊन राहिलेले अन्न पूर्ण पचविण्यासाठी औषधाचा उपयोग लंघनाबरोबर करणे जरूर आहे. हे अन्न पोटात राहिल्याने पोट फुगते, पोटात जळजळते व ओकाऱ्‍या होतात, तोंडाला पाणी सुटते, काहीही केले तरी चैन पडत नाही. अशा वेळी अजीर्णातील सामता घालविण्यासाठी क्षारयुक्त दीपन-पाचन करणारी औषधे उपयोगी पडतात. सामुद्रादिचूर्ण ३ मा. व सज्जीखार १ मा. पाण्याबरोबर दिवसातून ३ वेळा द्यावे. याने आमाशयातील अजीर्ण ताबडतोब कमी होईल. फार अशक्त माणूस असेल तर  सामुद्रादिचूर्ण ३ मा. पातळ तुपातून चाटवावे. तसेच जड आहार घेतल्याने जे अजीर्ण झाले असेल त्यावर आल्याचा रस, लिंबाचा रस १-२च., सैंधव ६ गुं. व संजीवनी गुटी किंवा शंखवटी ४ गुं. मिसळून चाटवावे. याने अवरोध कमी होईल, ढेकर स्वच्छ येईल, वारा सरेल व तिडलेले पोट मोकळे होईल. मासे व मांस अधिक खाण्याने जर अजीर्ण झाले असेल तर क्रव्यादरस २ ते ४ गुं. लिंबूपाण्याबरोबर किंवा ताकाबरोबर दिवसातून तीन वेळा द्यावे. या अजीर्णाबरोबर मलमूत्राचा संग होऊन उदावर्त निर्माण झाले असेल तर ही सारी औषधे देता येतात. पोट व पाठ गरम पाण्याने शेकावी.

पित्त बिघडवणारा आहार घेतल्याने होणाऱ्‍या अजीर्णात घशाशी जळजळते, कडू ओकारी होते, तोंड कडवट होते, उमासे जोरदार येतात, चेहरा लाल होतो, डोके दुखते. अशा अजीर्णावर प्रवालभस्म ४ गुं. लिंबाचा रस व साखर यांबरोबर दिवसातून ३ वेळा अग्निपुटीबरोबर चाटवावे. प्रवाळपंचामृत ४ गुं. ३ वेळा तूपसाखरेतून द्यावे. अविपत्तिकर चूर्ण १ मा. २ वेळा जेवणानंतर दुधाबरोबर द्यावे म्हणजे पित्तविशिष्ट अजीर्ण नाहीसे होईल.

ज्या अजीर्णामध्ये पोट फुगलेले असते, थोडे थोडे शौचास होते, बरेच शौचाला होईल अशा भावनेने माणूल शौचालयात जातो परंतु प्रत्यक्ष अगदीच थोडे शौचास होते, आलेला वेग थांबतो, पोट मात्र फार फुगते, कुशीलाही तडस लागते, श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो अशा वेळी गंधर्वहरीतकी १ मा., सैंधव ४ गुं. गरम पाण्याबरोबर दिवसातून २-३ वेळा द्यावे. नाभीच्या खालील पोटास तेल लावावे व शेक करावा.

 अजीर्णात विशिष्ट आहारामुळे अजीर्ण होत आहे असे दिसते तेव्हा त्याविरूद्ध म्हणजे ज्या पदार्थाचे अजीर्ण होते त्या पदार्थाला सुलभतेने पचवणाऱ्‍या काही द्रव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे : अजीर्णकारक पदार्थ—तांदूळ, हरभरा, वरी, सावे, कांग, मटकी, कुळीथ, तूप, आम्ररस, केळी, गव्हाचे पदार्थ, मूग, उडीद, मांस, दही, फणस, दूध, उसाचा रस, श्रीखंड, गूळ, पिस्ते, बदाम, मनुका. अनुक्रमे त्यांना पचवणारे पदार्थ—नारळाचे दूध, मुळ्याचा रस, दही, तेल, लिंबाचा रस, मुगाचे वरण, साखर, दूध, आंब्याची कोय, तूप, काकडी, आवळकाठी, साखर, आंबट कांजी, आवळकाठी, केळी, ताक, आले, सुंठ, मिरी, पिंपळी, सुंठ, लवंगा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री