ऊलान ऊडे : रशियाच्या दक्षिण सरहद्दीवरील बुर्यात स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या २,६९,००० (१९७२). उडा व सेलेंगा या नद्यांच्या संगमावर हे वसले असून ट्रान्ससायबीरियन लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मंगोलियाकडे लोहमार्गाचा फाटा जातो. रेल्वे एंजिने, मोटारी, लाकूड, काच, मांसपरिवेष्टन, साखर, कापड इत्यादींचे येथे कारखाने आहेत. येथे कृषिमहाविद्यालय व शिक्षक-महाविद्यालय असून क्षयरोग्यांकरिता आरोग्यधाम आहे.

लिमये, दि. ह.