एकियूरस पॅलॅसिआय अधर दृश्य : (१) खोबण असलेल्या शुंडाच्या टोकाशी असलेले मुख, (२) अधर अंकुश, (३) गुदद्वार.

एकियूरॉयडिया : हा समुद्रात राहणाऱ्या कृमिसदृश प्राण्यांचा लहान समूह असून पूर्वी सिपंक्युलॉयडिया आणि प्रायाप्युलॉयडिया या दोन प्राणिसमूहांबरोबर त्याचा ‘जेफीरिया’  या वर्गात समावेश केलेला होता, परंतु हल्ली त्याला प्राणिजगतात स्वतंत्र संघाचे स्थान दिलेले असून त्याचे ॲनेलिड (वलयी) कृमींशी नाते आहे असे मानण्यात येते. उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांतील समुद्रांच्या किनाऱ्यांवरील उथळ पाण्याच्या तळाशी वाळूत किंवा चिखलात बिळे करून ते राहतात. या समूहात थॅलॅस्सेमा, एकियूरस, बोनेलिया, सॅक्कोसोमा, स्यूडोबोनेलिया, हॅमिंजिया आणि एपिथेटोसोमा या वंशांचा समावेश होतो. या लहानशा संघात सु. ६० जाती आहेत.

शरीर द्विपार्श्व-सममित (दोन सारखे भाग पडणारे), पिशवीसारखे आणि पुष्कळदा रंगीत असते प्रौढ दशेत ते खंडयुत नसते अग्र (पुढच्या) टोकाला लवचिक आणि संकोचशील शुंड (सोंड) असून भक्ष्य पकडण्याकरिता त्याचा उपयोग होतो तो अतिशय कुरचूक (ठिसूळ) असून त्याचे सहज तुकडे पडतात किंवा शरीरापासून तो अलग होतो त्याच्या जागी नवीन उत्पन्न होतो तो संवेदनशील (उद्दीपनांना अनुक्रिया व्यक्त करणारा) आणि चल असतो काही प्राण्यांत (बोनेलिया) तो लांब व Y अक्षराच्या आकृतीचा, तर काहींत तो आखूड व चमच्याच्या आकृतीत असतो तो शरीराच्या आत ओढून घेता येत नाही. देहभित्ती जाड व मांसल असून बाह्यत्वचेवर सूक्ष्म पिंडिकांची (लहान निमुळत्या उंचवट्यांची) वलये असतात. शरीराच्या अग्र भागी अधर पृष्ठावर शूकांची (लहान राठ केसासारख्या संरचनांची) एक जोडी असते काहींत (एकियूरस) गुदद्वाराभोवती शूकांची एकदोन वलये असतात. शुंडांच्या बुडाशी मुख व पश्च टोकाशी गुदद्वार असते. ग्रसनी (मुखगुहेच्या मागचा अन्नमार्गाचा भाग) आखूड व जाड भित्ती असलेली, आंत्र (आतडे) वेटोळी पडलेले आणि मलाशय (गुदद्वाराजवळचा आतड्याचा भाग) अंडाकृती असतो, मलाशयात उघडणारे दोन आशय बहुधा मुख्य उत्सर्जनांगे (निरूपयोगी पदार्थ बाहेर टाकणारी इंद्रिये) होत. देहगुहा मोठी व अखंड असते. परिवहन तंत्र (रुधिराभिसरणाची इंद्रिये) पृष्ठीय व अधर वाहिकांचे बनलेले असते.

पुढच्या बाजूला वृक्ककांच्या (नळीसारख्या उत्सर्जक इंद्रियांच्या) १–३ जोड्या अथवा एकच मोठा वृक्कक असून ते सगळे युग्मकवाहिन्यांचे (अंडाणू व शुक्राणू नेणार्‍या वाहिन्यांचे) कार्य करतात. अधर मध्यरेषेवर एक तंत्रिका-रज्जू (जाड मज्जातंतू) असून तंत्रिकागुच्छिका (तंत्रिका-कोशिकांचा समूह) नसतात. ज्ञानेंद्रिये नसतात. लिंगे भिन्न असतात. काही प्रकारांत कमालीची लैंगिक द्विरूपता (नर आणि मादीत दिसून येणारे स्पष्ट फरक) आढळते. जनन-ग्रंथी एकच असून मागच्या बाजूला मध्यरेषेवर असते. बोनेलियाचा नर सूक्ष्म असून त्याला मुख, गुदद्वार किंवा शुंड नसतो. आहारनाल र्‍हास पावलेला असतो. तो मादीच्या वृक्ककात कायम राहतो. विकासात ट्रोकोफोर डिंभकावस्था (अळीसारखी अवस्था) असते [→ डिंभ].

कर्वे, ज. नी.