हाल-२ : (हाल आन देर साल ). जर्मनीच्या सॅक्सनी-ॲन्हाल्ट (साचेन-ॲन्हाल्ट) राज्यातील प्रमुख शहर तसेच व्यापार, उद्योग वदळणवळण केंद्र. लोकसंख्या २,३१,४४० (२०१२). हे लाइपसिकच्याउत्तरेस ३४ किमी.वर साल नदीकिनारी वसलेले असून लोहमार्गावरील प्रमुख प्रस्थानक आहे. हाल शहर रस्त्यांनी इतर शहरांशी जोडलेले असून येथे विमानतळ आहे.

 

खाणींतून मीठ (सैंधव) काढणे या कामकाजाशी याचा संबंध होता, असे याच्या नावावरून स्पष्ट होते. येथील मीठ कामगारांचे शहरास फार मोठे योगदान होते. एक गढी म्हणून इ. स. ८०६ मध्ये याचा उल्लेख आढळतो. पवित्र रोमन साम्राज्याचा राजा पहिला ऑटो याच्याकडून इ. स. ९६८ मध्ये हे शहर व येथील तत्कालीन बहुमोल मीठ उद्योग मॅग्डेबर्गच्या बिशपला मिळाला. दुसरा ऑटो याने शहरास सनद दिली (इ. स. ९८१). हे शहर १२८१–१४७८ पर्यंत ‘हॅन्सिॲटिक लीगङ्खचे सभासद होते. बिशपने याठिकाणी मॉरित्सबुर्क किल्ला बांधून येथील जनतेवर वचक बसविण्याचा प्रयत्न केला होता. येथील जनता प्रॉटेस्टंट चळवळीत सहभागी झाली (१५२२). १६४८ मध्ये हे शहर वेस्टफेलिया तहान्वये ब्रांडेनबुर्कच्या आधिपत्याखाली आले. १८०६ मध्ये हे फ्रेंचांच्या व १८१३ मध्ये प्रशियाच्या ताब्यात होते. दुसऱ्या महायुद्धात शहराची अतोनात हानी झाली होती. ही १९४५–५२ पर्यंत सॅक्सनी-ॲन्हाल्ट राज्याची राजधानी होती तसेच हे पूर्व जर्मनीत असताना हाल जिल्ह्याचे मुख्यालय (१९५२–९० पर्यंत) होते.

 

हाल हे पोटॅश, मीठ, लिग्नाइट कोळसा यांच्या खाणीचे केंद्र आहे. येथे साखर, कागद, शेती अवजारे, रसायने, बिअर, सिमेंट, औषधे, यंत्रसामुग्री, कापड, कातडी वस्तू व अन्नप्रक्रिया इ. निर्मितिउद्योग चालतात.

 

हाल येथे मार्टिन ल्यूथर विद्यापीठ (१६९४), ए. एच. फ्रँक गरीब मुलांची शाळा (१६९५) व बायबल सोसायटी (१७१०) या ऐतिहासिक शिक्षणसंस्था आहेत. येथे चौदाव्या शतकातील जीर्णोद्धारित नगरभवन, सुप्रसिद्ध जॉर्ज फ्रीड्रिख हँडेल या संगीतकाराचा पुतळा, सेंट मॉरित्स चर्च( चौदावे शतक), सोळाव्या शतकातील गॉथिक शैलीतील चर्च, कॅथीड्रल, रेड टॉवर (१५०६), मॉरित्सबुर्क किल्ल्याचे अवशेष, कलावीथी इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

  

गाडे, ना. स.