वालुमक्षिका ज्वर : हा अर्बोव्हायरस या विषाणूंच्या (व्हायरसांच्या) एका गटामुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. ताप, डोळे येणे, अंगदुखी इ. याची लक्षणे असून याचा प्रसार मुख्यत्वे वालुमक्षिकेच्या फ्लेबोटोमस पॅपाटासी या जातीमुळे होतो. म्हणून याला पॅपाटासी वा फ्लेबोटोमस ज्वर असेही म्हणतात. फ्लेबोटोमस प्रजातीच्या अन्य जातींतील माद्यांमुळेही असा विकार होतो.

ताप येण्याच्या आधी एक दिवस व ताप येऊ लागल्यावर एक दिवस एवढ्या कालातच रोग्याच्या रक्तात या रोगाचे विषाणू आढळतात. त्यामुळे त्या काळात रोग्याला चावलेली वालुमक्षिकाच (मादीच) पुढे रोगाचा प्रसार करू शकते. रोग्याला चावल्यानंतर हे विषाणू माशीच्या शरीरात प्रवेश करतात. तेथे त्यांची वाढ होते व अंदाजे सात दिवसांनी माशी रोगप्रसारक्षम होते व पुढे आयुष्यभर ती तशी राहते.

हा रोग सामान्यतः दमट, उपोष्ण कटिबंधी भागांत आढळतो. भूमध्य समुद्रातील बेटे व भोवतालचे देश, मध्यपूर्व व पुढे भारत, म्यानमार (ब्रह्मदेश) व चीनच्या काही भागांत हा आढळतो. उष्ण व कोरड्या हवामानात, विशेषतः ग्रीष्म ऋतूत जेव्हा वालुमक्षिकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते, तेव्हा या रोगाच्या साथी येतात. इतर ठिकाणांहून अशा भागात आलेल्या लोकांना रोगाची लागण लगेच होते. स्थानिक प्रौढ व्यक्तींना सहसा हा रोग होत नाही. लहान वयात त्यांना हा रोग वारंवार झाल्याने त्यांच्या शरीरात या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते, हे बहुंधा याचे कारण असू शकेल. एकदा झालेल्या रोगाने काही महिने टिकेल इतकी तात्पुरती रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. वारंवार रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीची पुरेशी पातळी निर्माण होते. डेंग्यू ज्वर आणि अर्बोव्हायरसच्या इतर गटांमुळे होणाऱ्या तत्सम ज्वरांच्या विरुद्ध निर्माण झालेल्या रोगप्रतिकारशक्तीचा या रोगाविरुद्ध उपयोग होत नाही.

लक्षणे : माशी चावल्याच्या ठिकाणी आग होते व सूज वा गांध येते. रोगाचा परिपाक काल (विषाणू शरीरात शिरल्यापासून लक्षणे दिसू लागण्यापर्यंतचा काळ) दोन ते पाच दिवस असतो. त्यानंतर अचानक थंडी वाजून ताप भरतो. ताप ३८०.८ ते ४००.३ से. (१०२० ते १०४०.५ फॅ.) पर्यंत चढतो. डोकेदुखी व अंगदुखी (मुख्यतः मान, पाठ, कंबर व हातपाय) सुरू होते. नेत्रश्लेष्मशोथ, डोळे येणे, डोळे दुखणे, उजेडाचा त्रास होणे, जिभेवर पांढरा साका धरणे व चव जाणे, चेहरा लाल दिसणे इ. लक्षणेही दिसतात. नाडी तापाच्या मानाने मंद असते. बहुतेक लक्षणे ⇨डेंग्यू ज्वराप्रमाणे असतात परंतु पुरळ येत नाही. दोन तीन दिवसांत घाम येऊन ताप उतरतो. क्वचित काही दिवसांनी पुन्हा ताप येतो. नंतर अशक्तपणा खूप येतो.

निदान : या रोगाचे निदान करणे अवघड आहे. कारण सुरुवातीच्या काळात लक्षणांवरून हा रोग डेंग्यू ज्वर, इन्फ्ल्यूएंझा वा इतर विषाणुजन्य ताप, हिवताप इत्यादींपासून वेगळ ओळखता येणे कठीण आहे. रक्ततपासणी करून मुख्यतः हिवताप आहे की नाही, हे कळते. ज्या प्रदेशांत हा रोग मुख्यत्वे आढळतो तेथे निदान करणे त्यामानाने सोपे असते. रक्तातातील  श्वेत कोशिकांची (पांढऱ्या पेशींची) कमतरता, लसीका कोशिकांची [⟶ लसीका तंत्र] तौलनिक संस्थावाढ इ. इतर बदल रक्ततपासणीत आढळतात पण ते रोगविशिष्ट नाहीत. तापाच्या पहिल्या दिवशी रक्तातून विशिष्ट विषाणू मिळविता येतो परंतु ते व्यवहार्य ठरत नाही.

उपचार : हा विषाणुजन्य रोग असल्याने यावर विशिष्ट उपचार नाही. लक्षणांप्रमाणे ताप, अंगदुखी इत्यादींकरिता वेदनाशामक औषधे उपयुक्त आहेत. रोग गंभीर किंवा मारक नसल्याने इतर उपचारांची जरूरीही नसते.

प्रतिबंधक उपाय : वालुमक्षिकांचे प्रजनन घराच्या भिंतीतील बारीक फटी, चिरा, वळचणीच्या जागा इ. ठिकाणी होत असल्याने त्यांचा संपूर्ण नाश करणे शक्य होत नाही परंतु प्रजनन स्थानांवर कीटकनाशकांचे फवारे वारंवार मारून आणि वैयक्तिक पातळीवरील प्रतिबंधक उपाय योजून रोगप्रसारास प्रतिबंध करता येतो. ही माशी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळात चावत असल्याने रात्री हिंडताना जाड कपडे व बूट वापरणे, कीटक प्रतिवारकांचा उपयोग करणे इ. उपाय करतात. साध्या मच्छरदाणीच्या जाळीतून ही माशी आत शिरू शकत असल्याने या मच्छरदाणीचा उपयोग होत नाही. बारीक जाळीची मच्छरदाणी किंवा कीटकनाशक फवारलेली मच्छरदाणी उपयुक्त असली, तरी तिचा वापर व्यवहार्य नाही. नवीन प्रकारच्या गुळगुळीत भिंतींच्या व फटीविरहित घरांत प्रजनन स्थानांच्या अभावामुळे वालुमक्षिकांच्या प्रजननास आळा बसतो.

पहा : वालुमक्षिका.

प्रभुणे, रा. प. रानडे, म. आ.