लोलिगो : अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गात लोलिगोंचा समावेश होतो.

लोलिगो अटलांटिक व पॅसिफिक महासागरांत आढळतात. त्यांच्या लोलिगो पीलईलो. ओपॅलेसेन्स या दोन जाती सापडतात.

लोलिगो : (१) बाहू, (२)डोळा, (३) पर, (४) प्रावार, (५) नसराळे, (६) डोके, (७) स्पर्शक.लोलिगोचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. लांबी सु. २० ते ३० सेंमी. असते. शरीरावर जाड मांसल प्रावार (कवचाच्या लगेच खाली असणारी त्वचेची बाहेरची मऊ घडी) असते. शरीराच्या वरच्या भागातील प्रावारात अल्पांशाने राहिलेले कवच असते. डोके मोठे असते व त्यावर दोन मोठे डोळे असतात. याच्या डोळ्यांची रचना बरीचशी पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या डोळ्यांच्या रचनेसारखी असते. डोक्याच्या मध्यावर मुख असते व ते दहा मांसल बाहूंनी वेढलेले असते. बाहूंवर कपाच्या आकाराचे चूषक (अन्य प्राण्याच्या शरीरावर चिकटून राहण्यासाठी असलेले अवयव) असतात. बाहूंची चौथी जोडी लांब असते व ते आत ओढून घेता येतात, त्यांना संस्पर्शक म्हणतात. शरीराच्या निमुळत्या टोकाच्या दोन्ही बाजूंना मांसल पर (हालचालीस व तोल सावरण्यास मदत करणारा अवयव) असतो. शरीर व डोके एकमेकांना मानेने (ग्रीवेने) जोडलेले असते. मानेभोवती प्रावाराचे कडे असते. मानेच्या खाली मांसल निनाल (वक्र नलिका) असते. निनालांची दिशा बदलून लोलिगो त्याप्रमाणे पुढे किंवा मागे कसाही पोहू शकतो. यांच्या त्वचेमध्येवर्णकीलवक असतात. त्यात पिवळे किंवा तपकिरी रंगाचे रंगद्रव्ये असते. हे वर्णकीलवक आकुंचन व प्रसरण पावत असतात व त्याप्रमाणे प्राण्याच्या शरीराचा रंग फिकट किंवा गडद दिसतो.

लोलिगो लहान कवचधारी प्राणी, लहान मासे, इतर मृदुकाय प्राणी यांवर आपली उपजीविका करतो. निनालातून पाण्याचा फवारा भक्ष्यावर एकदम सोडून नंतर बाहूंच्या सहाय्याने भक्ष्य आत ओढून घेतले जाते.

गुदांत्राच्या जवळ मसीकोष (शाईची पिशवी) असतो. त्याची नलिका गुदद्वाराजवळ उघडते. मसीकोषात गडद रंगाचे द्रव्य असते. लोलिगो संकटकाळी ते द्रव्य पाण्यात सोडतो त्यामुळे आसपासचे पाणी काळसर रंगाचे होऊन लोलिगो दिसेनासा होतो व तो तेथून निसटून जाऊ शकतो.

लोलिगोमध्ये लिंगे भिन्न असतात. जनन ग्रंथी शरीराच्या मागच्या टोकाकडे असतात. नरामध्ये डावीकडील चौथ्या बाहूचे रूपांतर मैथुनांगात झालेले असते. अंड्याचे निषेचन (फलन) मादीच्या शरीरात होते. मैथुनानंतर थोड्या वेळात मादी अंडी घालते. अंड्या भोवती जिलेटिनाचे आवरण असते. अंडी मोठी असून त्यांत पुष्कळ पीतक असते. दोन-तीन आठवड्यांनी लहान पिल्लू बाहेर येते व ते लगेच आपली उपजीविका स्वतंत्रपणे करू शकते. लोलिगो मोठ्या प्रमाणावर पकडून विकतात.

चिन्मुळगुंद, वासंती रा.