हीमोस्पोरिडिया : प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील ⇨स्पोरोझोआ वर्गाच्या टिलोस्पोरिडिया उपवर्गातील एक गण. या गणातील प्राणी परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणारे सजीव) असून ते दुसऱ्या प्राण्यांच्या (यजमान प्राण्यांच्या, आश्रयींच्या) शरीरात राहतात. त्यामुळे या प्राण्यांमध्ये हालचाल करणारे अवयव नसतात. प्लास्मोडियम सारख्या परजीवीचे जीवनचक्र दोन आश्रयी प्राण्यांच्या शरीरात पूर्ण होते. ते पृष्ठवंशी प्राण्यांच्या तांबड्या रक्तकोशिकेत राहतात, तर काही काळ ते डासासारख्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या आतड्यांत व लाला ग्रंथीत राहतात. आश्रयी प्राण्यांच्या शरीरातील कोशिकाद्रव हे त्यांचे अन्न असते. या प्राण्यांमध्ये अलैंगिक प्रजनन गुणित विभाजनाने होते. लैंगिक प्रजननानंतर बीजाणू तयार केले जातात. अलैंगिक व लैंगिक प्रजनन एकांतरण पद्धतीने (एकाआड एक) होते. या प्राण्याच्या जीवनचक्राचा शेवट बीजाणुज निर्मितीने होतो. 

 

हीमोस्पोरिडिया गणातील प्लास्मोडियम ही प्रजाती अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रजातीच्या चार जाती आहेत. त्यांपैकी प्ला. व्हायव्हॅक्स ही जातीहिवताप (मलेरिया) रोगास कारणीभूत असल्याने महत्त्वाचीआहे. या जातीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी ॲनॉफेलीस प्रजातीतील डासाची मादी व मनुष्य या दोन आश्रयींची गरज असते. मानवाच्या शरीरात ते तांबड्या रक्तकोशिकांत किंवा यकृताच्या कोशिकांत राहतात. मानवी शरीरात या प्राण्याची वाढ होते व त्याचे अलैंगिक प्रजनन होते, त्यास स्किझोगोनी असे म्हणतात. अलैंगिक प्रजननाच्या अखेरीस मेरोझॉइट (खंडजीव) तयार होतो. लैंगिक प्रजननाची सुरुवात मानवात होते आणि ती ॲनॉफेलीस प्रजाती़तील मादी डासाच्या शरीरात पूर्ण होते, त्यास गॅमोगोनी असे म्हणतात. यानंतर ॲनॉफेलीस मादी डासाच्या शरीरात त्याचे अलैंगिक गुणित विभाजन होते, त्यास स्पोरोगोनी असे म्हणतात. या क्रियेत असंख्य बीजाणू तयार होतात. या बीजाणूंपासून स्पोरोझॉइट (बिजाणुज) तयार होतात. 

 

ज्या वेळी ॲनॉफेलीस प्रजातीतील डासाची मादी निरोगी मनुष्याचे रक्त शोषण करण्यासाठी चावा घेते, त्यावेळी हजारो बीजाणुज माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे हिवताप हा रोग होतो. अशा प्रकारे मानवाच्या शरीरात हिवतापाच्या रोगजंतूचा प्रवेश होतो, हे ⇨ सर रॉनल्ड रॉस यांनी शोधून काढले. या संशोधन कार्याबद्दल त्यांना १९०२ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

 

पहा : प्रोटोझोआ स्पोरोझोआ हिवताप. 

पाटील, चंद्रकांत प.