बोकाचीओ, जोव्हान्नी : (१३१३ – २१ डिसेंबर १३७५). थोर इटालियन साहित्यिक. त्याच्या जन्मस्थळासंबंधी मतभेद आहेत. काहींच्या मते त्याचा जन्म पॅरिसमध्ये झाला, तर काहींच्या अंदाजानुसार तो फ्लॉरेन्सजवळील चेर्ताल्दोनामक छोट्याशा गावात झाला. बोकाचीओच्याच लेखनात आढळणाऱ्या काही आत्मचरित्रात्मक उल्लेखांच्या आधारे, त्याची आई एका फ्रेंच सरदार घराण्यातील स्त्री होती, असे म्हटले जाते. तथापि हे खरे आहे किंवा काय ह्याविषयी शंका आहे. बोकाचीओचे बालपण फ्लॉरेन्समध्ये गेले. वयाचे सातवे वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच काव्यरचनेची उर्मी आपल्या मनात निर्माण झाली आणि आपण काही कविता रचिल्याही होत्या, असे बोकाचीओने म्हणून ठेवले आहे. तथापि व्यवसायाने बँकर असलेल्या बोकाचीओच्या वडिलांना आपल्या पुत्राचा वाङ्‌मयाकडे असलेला कल पसंत नव्हता. व्यापारशिक्षण घेण्यासाठी त्यांनी त्याला १३२८ च्या सुमारात नेपल्समध्ये ठेविले. व्यापारक्षेत्रात सहा वर्षे निष्फळ उमेदवारी केल्यानंतर जवळजवळ तेवढीच वर्षे त्याने नेपल्स विद्यापीठात ‘कॅनन लॉ’ शिकण्यात नाखुषीनेच व्यतीत केली. तथापि नेपल्समधील वास्तव्यात, नेपल्सच्या राजदरबारातील अभिजनांशी बोकाचीओचा परिचर झाला ग्रीक भाषा-संस्कृतीचा अभ्यास त्याने तेथेच केला आणि विविध लॅटिन साहित्यकृती तसेच फ्रेंच भाषेतील साहसपूर्ण रोमान्स ह्यांचे वाचनही त्याने तेथे केले. नेपल्समध्ये असताना तो लेखनही करु लागला. नेपल्समधील त्याच्या वाङ्‌मयनिर्मितीत La Caccia Di Diana (काव्य रचनाकाल सु.१३३६ – ३८, इं.शी. डायनाज हंट) Il Filocolo (गद्य रोमान्स, रचनाकाल सु.१३३७ – ३९) Il Filostrato (पद्य रोमान्स, रचनाकाल सु.१३३९ – ४०) ह्यांचा समावेश होतो. Teseida ह्या १२ सर्गांच्या महाकाव्याचा (रचनाकाल सु. १३४० – ४२) आरंभ त्याने नेपल्समध्ये केला आणि लॉरेन्समध्ये ते पूर्ण केले असे दिसते. ‘डायनाज हंट’ ह्या काव्यात नेपल्समधील साठ सुंदर स्त्रियांचे वर्णन आलेले आहे. Il Filocolo हा पहिला इटालियन गद्य रोमान्स होय. प्रेम आणि साहस हा त्याचा विषय. Il Filostrato मध्ये ट्रॉइलस आणि क्रेसिडा ह्यांची कथा त्याने सांगितली आहे. चारण नसलेल्या व्यक्तीने इटालियन भाषेत लिहिलेला हा पहिला पद्य रोमान्स होय. ह्या कथेचा शेक्सपिअरने आपल्या ट्रॉइलस अँड क्रेसिडा ह्या नाट्यकृतीसाठी उपयोग करून घेतलेला आहे. Teseida ह्या महाकाव्यात एकाच स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या दोन मित्रांची कहाणी आहे. इटालियन भाषेच्या तस्कन बोलीत लिहिले गेलेले हे पाहिले महाकाव्य. विख्यात इंग्रज साहित्यिक चॉसर ह्याने आपल्या कँटरबरी टेल्समध्ये ही कथा अंतर्भूत केली. नेपल्समध्ये असताना बोकाचीओचे एका स्त्रीवर प्रेम जडले होते. फिआमेत्ता ह्या नावाने ती त्याच्या साहित्यकृतींत आलेली आहे. आपल्या लेखनात बोकाचीओने अधूनमधून स्वतःसंबंधीचे जे उल्लेख केलेले आहेत, ते पाहता फिआमेत्ताबद्दल त्याने परस्परविरोधी विधाने केलेली आढळतात. ती राजकन्या असल्याचा उल्लेख तो एके ठिकाणी करतो. तर दुसऱ्या ठिकाणी ती सरदारघराण्यातील एका स्त्रीची कन्या असल्याचे तो सांगतो. फिआमेत्ता ही कुणीही असली, तरी बोकाचीओचे तिच्यावरील प्रेम फलद्रूप झालेले दिसत नाही. त्याच्या वाङ्‌मयनिर्मितीवर मात्र तिने बराच काळ काही प्रभाव पाडलेला दिसतो. १३४० च्या सुमारास बोकाचीओला त्याच्या वडिलांनी फ्लॉरेन्सला बोलावून घेतले. ते ज्यांच्याबरोबर आपला व्यवसाय करीत होते, त्या बार्दीनामक मंडळींचे दिवाळे निघाले होते. ह्या दुर्घटनेची झळ बोकाचीओलाही लागलीच पण फ्लॉरेन्सला परतल्यानंतरच्या काळात बोकाचीओची प्रतिभा अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. देकामेरॉन हा त्याचा जगद्‌विख्यात ग्रंथ फ्लॉरेन्समध्ये परतल्यानंतरच लिहिलेला. १३४८ ते १३५३ ह्या सहा वर्षांच्या कालखंडात देकामेरॉनची रचना झाली असावी, असा अंदाज आहे. १३४८ साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीमुळे फ्लॉरेन्स शहरावर मृत्यूची छाया पसरलेली असताना तीन तरुण आणि सात तरुण स्त्रिया ते शहर सोडून सुरक्षित ठिकाणी जातात आणि दहा दिवस एकमेकांना गोष्टी सांगून आपले मन रिझवतात अशी ह्या कथांमागची पार्श्वभूमी बोकाचीओने दाखविली आहे. प्रत्येक दिवशी दहा जणांच्या दहा कथा ह्याप्रमाणे दहा दिवस शंभर कथांचे कथन होते. प्रत्येक दिवशीच्या कथासत्राचे संचालन त्या दिवसासाठी राजा किंवा राणी म्हणून नेमली गेलेली व्यक्ती करते. ही व्यक्ती कथांसाठी सामान्यतः काही एक विषय ठरवून देते आणि त्याच्या कक्षेत बसू शकेल अशी कथा सांगण्याची आज्ञा करते. सुखात्म, शोकात्म, चुटकेवजा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथांतील पात्रांत राजघराण्यातील स्त्री-पुरुष तसेच मंत्री, धर्मोपदेशक, जोगिणी, सैनिक, डॉक्टर, वकील, तत्त्वज्ञ, व्यापारी, विद्यार्थी, चित्रकार, मद्यपी, यात्रेकरु, जुगारी अशा अनेक प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. ह्या कथाग्रंथातून मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण अनुभवांचा एक पटच, बोकाचीओने एक प्रकारच्या वस्तुनिष्ठ, अलिप्त वृत्तीने उलगडून दाखविला आहे. त्याच्या परिपक्क कलात्मकतेचा प्रत्यय तीतून मिळतो. देकामेरॉनमधील सर्वच कथा स्वतंत्र आहे, असे नाही त्यांची हाताळणी मात्र स्वतंत्र आहे. ह्या कथाग्रंथासाठी निरिनिराळ्या आख्यायिका, लोककथा आदींचा उपयोग त्याने करून घेतलाच तथापि समकालीन जीवन हा त्याच्या कथांचा सर्वांत मोठा आधार होय. त्या जीवनाचे-विशेषतः त्यातील अनेक अप्रपवृत्तींचे-वास्तववादी दर्शन ह्या कथा घडवितात. प्रत्यक्ष रोमन कॅथलिक चर्च आणि खिस्ती धर्माधिकारी ह्यांच्यावरही काही कथांतून त्याने उपरोधप्रचुर टीका केलेली आहे. तथापि बोकाचीओचा दृष्टिकोण नीतिवादी नव्हता. देकामेरॉनमधल्या अनेक कथा अश्लील-निदान चावट- गणल्या जातात. सैल चारित्र्याच्या स्त्रीपुरुषांचे चित्रण अशा कथांत आढळते. तथापि यूरोपीय मध्ययुगातील निवृत्तिवादाकडे पाठ फिरवून लौकिक जीवनाकडे मुक्त मनाने जाणाऱ्या नव्या प्रवृत्तीचा तो आविष्कार आहे. देकामेरॉनमधील अन्य अनेक कथांतूनही तो दिसून येतो. देकामेरॉनने इटालियन गद्यालाही महत्त्वपूर्ण वळण दिले. बोकाचीओपूर्वीची इटालियन गद्यशैली सर्वसाधारणतः कृत्रिम आणि अलंकारप्रचुर होती. बोकाचीओने तिला सहजसुंदर आणि कलात्मक करून उत्कृष्ट गद्यशैलीचा एक आदर्शच निर्माण केला. मध्ययुगातील कथाकथनाची संपन्न परंपरा इटालियन साहित्यात त्याने जिवंत ठेवली. तसेच साहित्य आणि सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन ह्यांच्यात निकटचे नाते निर्माण केले. ह्या ग्रंथाचे मूळ हस्तलिखित आज उपलब्ध नाही. त्याची पहिली मुद्रित आवृत्ती १४७१ मध्ये प्रसिद्ध झाली. पुढे ह्या ग्रंथाचे अनेक भाषांत अनुवाद झाले.

 

विख्यात इटालियन कवी आणि विद्वान ⇨ पीत्रार्क ह्याच्याशी १३५० मध्ये बोकाचीओचा परिचय झाला. पीत्रार्कबद्दल बोकाचीओला अत्यंत आदर होता (त्याचे चरित्रही बोकाचीओने (लॅटिन भाषेत) लिहिले होते. त्या दोघांची लवकरच गाढ मैत्री झाली आणि अभिजात ग्रीक-लॅटिन वारशाचा शोध घेण्याच्या कार्यात ते गुंतून गेले. पीत्रार्कने फ्लॉरेन्स विद्यापीठात शिकविण्यासाठी यावे, अशीही बोकाचीओची इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही तथापि लेओंझिओ पिलाते ह्या नावाचा एक माणूस त्या विद्यापीठात ग्रीक शिकविण्यासाठी पीत्रार्कने स्वतःच्या शिफारशीने पाठविला. त्याच्याकडून होमरकृत इलिअडचे लॅटिन भाषांतर बोकाचीओने करून घेतले ह्या भाषांतराच्या द्वारा होमरचा अभ्यास केला. इटालियन मानवतावाद्यांनी चालू केलेल्या अभिजात ग्रीक साहित्यकृतींच्या अभ्यासाचा हा आरंभ मानला जातो. पीत्रार्कबरोबरच्या बोकाचीओच्या मैत्रीचा एक परिणाम असा झाला, की देकामेरॉननंतर बोकाचीओने मुख्यतः लॅटिनमध्येच लेखन केले. ह्या लेखनात जीनिऑलॉजी ऑफ द गॉड्‌स ऑफ द जेंटिल्स (१५ खंड – इं. शी.) Bucolicum Carmen (१३५१-६६.), Declaris mulieribus (१३६०-७४), De casibus virorum ellustrium (१३५५ -७४, इं. शी. ऑन द फेट्‌स ऑफ फेमस मेन), ‘ऑन माउंटन्स, फॉरेस्ट्‌स, स्प्रिंग्ज, लेक्‌स, रिव्हर्स, स्वँपस ऑर मार्शिस अँड ऑन द नेम्स ऑफ द सी (१३५५-७४, इं. शी.) ह्यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो. ‘जिनिऑलॉजी …’ ह्या विश्वकोशात्मक ग्रंथात त्याने त्याला उपलब्ध असलेल्या सर्व पेगन पुराणकथा व ईश्वरशास्त्र संगृहीत केलेले आहे. Bucolicum… हा छोट्या रुपकात्मक गोपकवितांचा (पास्टोरल पोएम्स), संग्रह. Declaris .. ही प्रसिद्ध स्त्रियांची चरित्रे. ईव्हपासून त्यांची सुरुवात बोकाचीओने केली आहे. ‘ऑन द फेट्‌स ऑफ फेमस मेन’ मध्ये नियतीने ज्यांच्या आयुष्याला धक्का दिला अशा प्रसिद्ध पुरुषांची चरित्रे आहेत. त्यांचा आरंभ आदमपासून करण्यात आला आहे. ऑन माउंटन्स … हा त्याने तयार केलेला भूगोलकोश.

 

हे सारे काम त्याने अनेकदा हलाखीला तोंड देत केले. १३७३ मध्ये दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडीचे जाहीर वाचन त्याने फ्लॉरेन्सच्या एका चर्चमध्ये सुरु केले. तथापि ढासळत्या प्रकृतीमुळे हे तो पूर्ण करु शकला नाही. १३७४ मध्ये पीत्रार्क निधन पावला. तो धक्काही त्याला असह्य झाला. फ्लॉरेन्समधून तो चेर्ताल्दोला परतला. तेथेच त्याचे निधन झाले.

 

संदर्भ : 1. Hutton, Edward, Giovanni Boccaccio, A Biographical Study, London, 1909. 2. Kruton, J. W. Five Masters, A Study in the Mutation of the Novel, Glucester, Mass. 1959.

 

कुलकर्णी, अ. र.