प्राण्यांचेस्थलांतर : एका प्राण्याच्या किंवा प्राण्यांच्या समूहाच्या, एका प्रदेशातून दुसऱ्या दूरच्या प्रदेशांत जाण्या-येण्याच्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. ज्या वेळी प्राणी एकदा स्थलांतर केल्यावर परत त्या जागी येत नाहीत त्या वेळी त्या स्थलांतराला देशत्याग म्हणता येईल. काही प्राण्यांमध्ये परतीचे स्थलांतर तेच प्राणी करू शकत नाहीत, तर त्यांचे वंशज करतात. अशा स्थलांतराला देशागमन असे म्हणता येईल. हंगामी होणाऱ्या अशा हालचाली काही प्राण्यांमध्ये मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. एसिटॉन जातीच्या लष्करी मुंग्यांच्या मोसमी हालचाली अशा तऱ्हेच्या असून त्या मुख्यत्वेकरून त्यांच्या अळ्यांकरिता खाद्य मिळविण्यासाठी किंवा प्रजोत्पादनासाठी असतात. त्या २०० ते ३०० मी. सलग लांब पट्ट्यात जाताना दिसतात. अशा प्रकारच्या हालचालींना ‘अल्पवर्धित स्थलांतर’ मानता येईल. मॉनर्क फुलपाखरासारखे स्थलांतर मात्र अधिक प्रगत स्वरूपाचे आहे. मूळ उत्तर अमेरिकेत सापडणारे हे फुलपाखरू आता पूर्व आणि पश्चिमेकडील देशांचेही रहिवासी बनले आहे पण त्याचे मुख्य स्थलांतर अमेरिकेतच पहावयास मिळते. उन्हाळ्यात उत्तर भागात व कॅनडाच्या दक्षिण भागात राहून हिवाळ्यात मात्र अमेरिकेच्या दक्षिण भागाकडे मेक्सिकोपर्यंत सुद्धा याचे स्थलांतर होते. स्थलांतराचा प्रवास ३,००० किमी. पर्यंत असू शकतो. कॅलिफोर्नियात असे आढळून आले आहे की, एका जातीची १०,००० फुलपाखरे दरवर्षी पुष्कळ दूर अंतरावरून येऊन एका विवक्षित झाडाच्या पाच फांद्यांवर बसतात व पुन्हा थोड्याच दिवसांत परत जातात. कीटकांच्या स्थलांतरात पुष्कळदा परतीचे उड्डाण त्याच कीटकांकडून न होता दुसऱ्या पिढीतील कीटकांकडून होते कारण कीटकांचे आयुष्यच अल्प असते.

 

इतर काही अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांतही स्थलांतर आढळते. सागरी गोगलगायी उन्हाळ्यात समुद्रापासून नदीच्या प्रवाहात स्थलांतर करतात. याच गोगलगायी हिवाळयात परत समुद्रात जातात. काही शेवंडे (होमेरसअमेरिकॅनस) पाण्याचे तापमान बदलले की, स्थलांतर करतात. काही खेकडे अंडी घालण्याकरिता पाण्यात स्थलांतर करतात व अंडी घातल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणी परत येतात. हे स्थलांतर सु. १२० किमी. असू शकते व त्याला सहा महिन्यांचा अवधी लागतो.

 

मासे : काही जातींच्या माशांचे स्थलांतर प्रसिद्ध आहे व त्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. ⇨ईल या माशाच्या पुष्कळ जाती आहेत. त्या समुद्रात (खाऱ्या पाण्यात) जन्मतात व प्रौढावस्थेत आल्यावर सर्व आयुष्य नद्या व तळी (गोड्या पाण्यात) अशा ठिकाणी घालवितात. अंडी घालण्याच्या वेळी हे मासे परत आपल्या जन्म ठिकाणी दूरवर समुद्रात जातात व अंडी घालून ती फलित झाल्यावर तेथेच मरतात. गोड्या पाण्यात राहून खाऱ्या पाण्यात अंडी घालण्यास जाणाऱ्या माशास ‘कॅटाड्रोमस’ असे म्हणतात. याउलट सामन मासे समुद्रात राहतात व अंडी घालण्यासाठी गोड्या पाण्यात येतात, अशा माशांस ‘ॲनाड्रोमस’ असे म्हणतात.

 

ईल माशाचे स्थलांतर : (१) सारगॅसो समुद्र (अंडाकार प्रदेश), (२) उत्तर आफ्रिकेचा किनारा, (३) यूरोपचा किनारा (हे किनारे जाड रेषेने दर्शविले आहेत.). मिमी. मधील आकडे डिंभांची स्थलांतरातील त्या त्या प्रदेशातील लांबी दर्शवितात. बरीच वर्षे ईल या माशाचे जीवनवृत्त ठाऊक नव्हते. जे. श्मिट या डॅनिश शास्त्रज्ञांनी प्रथम ईल माशाची लहान पिले वेस्ट इंडिजच्या ईशान्येस सारगॅसो समुद्रात शोधून काढली व असे अनुमान काढले की, हे मासे यूरोपातून सबंध अंटलाटिक महासागर पोहून सारगॅसो समुद्रात अंडी घालण्यास येत असावेत आणि अंडी घालण्याचे कार्य संपल्यावर मरत असावेत. अंड्यातून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर पडल्यावर ते सु. ५,००० किमी. चा. प्रवास करून परत यूरोपियन किनाऱ्यावर आपल्या पिढीजाद गोड्या पाण्याच्या प्रवाहात अगर तळ्यात जात असावेत, हे अनुमान खरे ठरले. हा प्रवास करण्यास डिंभांना दोन ते तीन वर्षांचा अवधी लागतो. या माशांना यूरोपच्या किनाऱ्यापासून सारगॅसो समुद्रापर्यंत जाणे कसे जमते याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नव्हती. ब्रुस हंटर या शास्त्रज्ञांच्या मते मासे ३६५ मी. खोल पाण्यातून पोहतात व पाण्याच्या प्रवाहामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत् तरंगांमुळे त्यांना मार्गदर्शन होते. ईल माशात असे विद्युत् तरंग ओळखण्याची पात्रता आहे, हे जेम्स मॅक्लीव्ह या शास्त्रज्ञांनी प्रयोगान्ती सिद्ध केले आहे.

 

सामन माशांच्या स्थलांतरातही असे विद्युत् तरंग त्यांना उपयोगी पडतात, असे डब्ल्यू. एफ्. रॉइस या शास्त्रज्ञांना आढळले [⟶ सामन]. ईल माशांना आपली पिढीजाद जागा बरोबर सापडते. अमेरिकन ईल यूरोपातील गोड्या पाण्यात किंवा यूरोपियन ईल अमेरिकेच्या गोड्या पाण्यात कधीही आढळत नाही.

 

सारगॅसो समुद्रात तयार झालेले ईलचे डिंभ यूरोप किंवा उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर ४ ते ७ किमी. अंतर पोहून येतात. सुरुवातीस डिंभाची लांबी १० ते २५ मिमी. इतकी असते. स्थलांतरास सु. तीन वर्षे लागतात. या काळात ते काही खात नाहीत. यूरोप किंवा आफ्रिकेच्या किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत त्यांची वाढ होऊन लांबी ६५ मिमी. पर्यंत झालेली असते. नदीच्या गोड्या पाण्यात शिरल्यावर डिंभांचा रंग पिवळा किंवा तपकिरी होतो आणि त्यांना एलव्हर म्हणतात. नर ईल आकारमानाने लहान असतात व नदीच्या मुखाजवळ राहतात. माद्यांचे आकारमान मोठे असून त्या नदीच्या वरच्या प्रवाहात राहतात. जेव्हा ईल प्रजोत्पादनाकरिता स्थलांतर करण्यास निघतात त्या वेळी त्यांचा रंग रुपेरी होतो व म्हणून त्यांस रुपेरी ईल असे म्हणतात. ईल गोड्या पाण्यात सु. ३५ वर्षे वास्तव्य करतात. या माशांचे वय त्यांच्या मानेत असलेल्या ऑटोलिथ या इंद्रियावरून काढता येते. १६-१७ वर्षाच्या ईलचे वजन साधारण ५-६·७५ किग्रॅ. असते व लांबी साधारण १·५ मी. असते. स्थलांतराच्या वेळी त्यांचे वय सु. २५ वर्षे असते.

 

भारतातील ⇨ पाला (हिल्सा) व सामन माशांमध्येही स्थलांतर आढळते. हे मासे गंगा नदीत आढळतात व त्यांचे स्थलांतर गंगेच्या प्रवाहात १,२०० किमी. पर्यंत होते.

 


 

उभयचर : उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गात जपानी सॅलॅमँडर (मेगॅलोबॅट्रॅकसजॅपोनिकस) या प्राण्यात स्थलांतर आढळते. उन्हाळ्यात हे प्राणी नदीच्या उगमाकडे उथळ पाण्यात समुद्रसपाटीपासून ७०० मी. उंचीवर जातात. तेथे नर खड्डे करून मादीची वाट पाहत बसतो. मादी आल्यावर व समागम झाल्यावर मादी फलित अंडी खड्ड्यात घालते व आपल्या निवासस्थानी परत जाते. नर दोन-तीन आठवडे अंड्यांचे रक्षण करून मग परत फिरतात.

 

सरीसृप : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गात गालॅपागस बेटांवरील कासवांत (टेस्ट्यूडोएलेफंटोपस) स्थलांतर आढळते. ही कासवे पर्वताच्या पायथ्याशी पावसाळ्यात प्रजोत्पादन करतात आणि पुढे पाऊस संपल्यावर ७०० मी. उंचीवर स्थलांतर करतात. पाऊस सुरू झाल्यावर परततात. काही सागरी सापांमध्येही स्थलांतर आढळते.

 

पक्षी : बऱ्याच पक्ष्यांच्या जाती स्थलांतराबद्दल प्रसिद्ध आहेत. पक्ष्यांचे स्थलांतर बहुधा उत्तरेकडून दक्षिणेकडे असते. उत्तरेकडे बर्फ पडू लागला की, पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरास सुरुवात करतात (उदा., दिल्ली, आग्रा व भरतपूर येथे हिवाळ्यात येणारे पाहुणे पक्षी). स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा पिढ्यानपिढ्या तोच मार्ग असतो. साधारणपणे स्थलांतर मोठ्या गटाने होते पण काही जातींत नरमादीच्या जोड्या असतात. काही पक्षी जमिनीपासून कमी उंचीवरून उड्डाण करतात, तर काहींचे उड्डाण १,००० ते १,५०० मी. उंचीवरून होते. साधारणपणे उडण्याची गती दिवसाला ४० किमी. पर्यंत असते. एकंदरीत पाहता वसंत ऋतूत होणारी उड्डाणे जास्त वेगाने, तर शरद ऋतूत होणारी मंद गतीने म्हणजे जवळजवळ निम्म्या वेगाने होतात. हा वेग पक्ष्यापक्ष्यांतच वेगवेगळा असतो. कमीत कमी वेग अमेरिकेतील चिपिंग स्पॅरोचा दर तासाला २४ ते ३० किमी. असा आहे. कॅनडातील लांब शेपटीच्या बंदकाचा वेग दर तासाला ८५ ते ११५ किमी. इतका आहे. सर्वांत जास्त वेग अमेरिकेतील ससाण्याच्या एका जातीचा ताशी २५० ते ३०० किमी. असा आहे. भूप्रदेशावर राहणारे काही लहान पक्षी (उदा., ब्लॅकपोल) समुद्रावरून सु. ३,६०० किमी. अंतर सरासरी ८६ तासांत पार करतात. या उड्डाणात अनुकूल हवामान मिळण्याकरिता काही वेळ त्यांचे उड्डाण थंड व ऑक्सिजन कमी असलेल्या ६,३०० किमी. उंचीवरून होते. लहान पक्ष्यांतील हे सर्वांत लांब व उंचावरून करण्यात येणारे उड्डाण होय. एकंदर उड्डाण व उड्डाणाची उंची हवामानावर अवलंबून असते. उद्दिष्ट स्थळी पोहोचण्यास लागणारा काळही प्रत्येक पक्ष्याच्या जातीचा वेगळा असतो. सर्वसाधारणपणे असेही आढळून येते की, फळे व बिया खाणारे पक्षी बहुधा स्थलांतर करीत नाहीत. किडामुंगी खाणारे पक्षीच विशेषकरून स्थलांतर करतात.पंखांच्या पिसांची रचना स्थलांतर करणाऱ्या व न करणाऱ्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळी आढळते. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे पंख निमुळते व टोकदार असतात. त्यामुळे त्यांना सहज व जलद उडता येते.

 

कोकिळ हा पक्षी वर्षाचे पुष्कळ दिवस आग्नेय आफ्रिकेत राहतो पण वसंत ऋतू आला की, तो अंडी घालण्याकरिता भारतात येतो. या पक्ष्याची अंडी कावळ्याच्या घरट्यात घातली जातात. या पक्ष्याचे स्थलांतर साधारण ७,२०० किमी. होते.

 

आर्क्टिक कुररी (स्टर्नापॅराडिसा) या पक्ष्याच्या स्थलांतरात त्याचा एकंदर ३५,००० किमी. प्रवास होतो. त्याचे घरटे ग्रीनलंड या देशात असते आणि तेथे तो अदमासे चार महिने राहतो. तेथून मग तो यूरोप-आफ्रिका-ब्राझील-अंटार्क्टिका-दक्षिण अमेरिका या प्रदेशांस भेटी देऊन परत ग्रीनलंड येथे येतो.

 

काही पक्षी सपाट प्रदेशातून पर्वतांच्या उंच शिखरांवर स्थलांतर करतात.

 

पक्षी स्थलांतर का करतात व त्यांच्या स्थलांतराच्या उड्डाणासाठी कोणती शक्ती प्रेरक ठरते ह्यांसंबंधी विचारवंतानी व संशोधकांनी काही माहिती दिली आहे. वातावरणातील बदल किंवा खाद्याची उणीव अशा केवळ शरीरबाह्य कारणामुळे स्थलांतर होते, हे पक्ष्यांच्या बाबतीत पटत नाही. पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून जरी या बाह्य कारणांची उणीव भासू दिली नाही, तरी स्थलांतराकरिता त्यांची धडपड चालू असते, असे आढळून आले आहे. यावरून बाह्य कारणांपेक्षा शरीरांतर्गत काही कारणे असावीत असे वाटते. जननांगातील (जननेंद्रियातील) प्रतिक्रियेमुळे स्थलांतराच्या उड्डाणाला प्रेरणा मिळते, ही मूळ कल्पना हेन्री सीबोम यांची आहे. पुढे विल्यम रोवन यांनी जंको पक्ष्यांवर प्रत्यक्ष प्रयोग करून सीबोम यांची मूळ कल्पना सिद्धांत स्वरूपात मांडली. स्थलांतराची संवेदना जननांगाच्या शरद ऋतूत होणाऱ्या घटीवर व वसंतात त्यांना प्राप्त होणाऱ्या पूर्णावस्थेवर अवलंबून असते आणि जननांगात होणारा हा हंगामी बदल ऋतुमानावर किंवा लहानमोठ्या दिवसांतील कमीजास्त प्रकाशावर अवलंबून असतो. याचा अर्थ असा की, स्थलांतराला उद्युक्त करण्यास दिनमानातील फरक कारणीभूत होतो. असेही मानता येईल की, जननांगांत बदल घडून आणणाऱ्या क्रिया व स्थलांतराच्या उड्डाणाची उद्युक्तता ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा परस्परसंबंध नाही परंतु या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडविणारी दुसरी एकच प्रेरक शक्ती असू शकेल, असे सध्या मानले जाते.

 

जे. बेन्वा आणि त्यांचे सहकारी ह्यांनी असे सिद्ध केले आहे की, खरी प्रेरक शक्ती ⇨ पोषग्रंथी ही असून ती दिनामानाच्या काळानुसार जनन ग्रंथी उद्युक्त करण्यास प्रेरक ठरते. डोळ्यावाटे दिनमानाप्रमाणे कमीजास्त प्रणामात येणाऱ्या प्रकाशाची प्रक्रिया पोष ग्रंथीवर होऊन तिच्यापासून निर्माण होणारी हॉर्मोने (सरळ रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव) जननांगावर परिणाम करतात व त्यातूनच स्थलांतराची शारीरिक सिद्धता होते.

 

वाढत्या दिनमानामुळे पक्षी जास्त वेळ हालचाल करतात व स्नायूंच्या वाढत्या व्यायामामुळे जननांगातील क्रियाचक्र बदलते, अशी एक समजूत आहे. टी. एच्. बिझॉनेट यांनी स्टर्लिंग या पक्ष्यावर प्रयोग करून ह्या समजुतीवर प्रकाश पाडला. अशा व्यायामामुळे जननांगातील स्थलांतरानुकूल बदल उलट लांबणीवर पडतात, असे त्यांना आढळून आले. तेव्हा वाढत्या दिनमानामुळे होणारा जादा शारीरिक व्यायाम स्थलांतराला कारणीभूत होत नसून वाढत्या दिनमानामुळे बदलणाऱ्या प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) परिणाम म्हणून स्थलांतर घडत असावे, असे त्यांचे अनुमान आहे.

 


  

स्थलांतरासंबंधी अगदी अलीकडील विचार ए. वोल्फसन व त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे ते म्हणतात की पोष ग्रंथी दिनमानातील वाढत्या बदलामुळे व हॉर्मोनांमुळे जनन ग्रंथीवर परिणाम करते व त्याचबरोबर शरीराच्या एकंदर चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) ⇨ अवटूग्रंथीसकट नियंत्रण केले जाते. याचा परिणाम असा होतो की, पक्ष्यांच्या शरीरात सामावलेल्या चरबीमुळे त्यांचे शरीर उड्डाणाला सिद्ध होते आणि त्याच वेळी शरीराबाहेरील कोणत्याही कारणाने (तापमान, खाद्यपदार्थांची उणीव किंवा ऋतुमानातील बदल इ.) प्रेरित होऊन ते स्थलांतर करू शकतात. वोल्फसन यांचे हे मत रोवन यांच्या मूळ उपपत्तीला पूरक असेच आहे.

 

पक्षी स्थलांतराकरिता ठराविक ठिकाणेच निवडतात व पुन्हा त्याच जागी ठराविक वेळी परत येतात (उदा., भांडीक, हळदी, ऑस्प्रे इ.). ठिकाणाच्या निवडीसाठी व अचूक परतीसाठी पक्ष्यांना कोणत्या गोष्टी मार्गनिर्देशक ठरतात, हे एक कोडेच आहे. ठिकाणाच्या निवडीसाठी मार्गदर्शक काय असते, हे अजून समजलेले नाही पण स्थलांतराच्या वेळी काही ठोकताळे ते मानत असले पाहिजेत. ⇨कृत्रिमतारामंडळामध्ये (प्लॅनिटेरियममध्ये) ठेविलेल्या पक्ष्यांनी सूर्याच्या स्थानात बदल केल्याबरोबर आपल्या स्थलांतराच्या दिशेतही बदल केला. यावरून गुस्टाफ क्रेमर या जर्मन शास्त्रज्ञांनी १९४९ साली असे अनुमान केले की, पक्षी स्थलांतराची दिशा ठरविण्याकरिता सूर्याचा उपयोग करतात. पुष्कळ पक्षी स्थलांतरास जाताना पृथ्वीवरच्या खाणाखुणा लक्षात ठेवतात व त्यांच्या आधाराने परतीचा मार्ग ठरवितात. स्थलांतराच्या काळात पक्षी विशेष अन्न घेत नाहीत व त्याचे जनन तंत्रही (जननसंस्थाही) सुप्त असते. पक्ष्यांच्या शरीरात असलेली चरबी त्यांना स्थलांतरात ऊर्जा मिळण्यास उपयोगी पडते.

 

दुसऱ्या एका सिद्धांताप्रमाणे पक्ष्यांना त्यांच्या डोळ्यांची तीव्र कार्यक्षमता उपयोगी पडते व यामुळेच ते वर निर्देशिलेल्या जमिनीवरच्या खाणाखुणा पाहून ठेवू शकतात.

 

पक्ष्यांच्या स्थलांतरात पृथ्वीच्या चुंबकत्वाची दिशा हेही एक मार्गनिर्देशक तत्त्व असू शकेल. काही शास्त्रज्ञांना असे आढळले की, काही सूक्ष्मजंतू मॅग्नेटाइट (लोह व ऑक्सिजन यांच्या संयोगामुळे तयार झालेले चुंबकीय द्रव्य) या द्रव्याचे संश्लेषण करतात आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संलग्न होण्याकरिता या द्रव्याचा उपयोग करतात. या प्रकारचे द्रव्य कबूतरांच्या डोक्यात व मधमाशीच्या उदरातही आढळते. काही शास्त्रज्ञांच्या मते मधमाश्या आपली उड्डाणाची दिशा ठरविण्याकरिता या द्रव्यावर अवलंबून असतात पण कबूतरे या द्रव्याचा काय उपयोग करतात, हे मात्र ज्ञात नाही.

 

इतर काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार पाणबुडी जहाजात मार्गदर्शनाकरिता जी योजना असते तसलीच योजना पक्ष्यांच्या शरीरात असावी पण आश्चर्यकारक वस्तुस्थिती अशी आहे की, पक्ष्यांना गुंगी आणून जरी अज्ञात ठिकाणी सोडले आणि निरूढीजन्य मार्गनिर्देशनाकरिता (गृहीत धरलेले अंतर व केलेल्या प्रवासाची दिशा यांचा आधार घेऊन आपोआप स्थानाची निश्चिती करण्याकरिता) आवश्यक असलेल्या खाणाखुणांची (उदा., वळणे, उंचसखल प्रदेश यांची) जरी त्यांना जाणीव करून दिली नाही, तरीसुद्धा ते आपल्या घरट्याकडे न चुकता परत येतात.

 

इटालियन शास्त्रज्ञ फ्लोरियानो पापी यांच्या मते कबूतरे वासाच्या साहाय्याने आपल्या घरट्याकडे परततात. त्यांनी कबूतरांच्या नाकात बोळे घालून किंवा त्यांच्या घ्राण्रेंद्रियाच्या तंत्रिका (मज्जा) तोडून त्यांना अज्ञात ठिकाणाहून सोडले तेव्हा त्यांना आपल्या घरट्याकडे येण्यास त्रास पडला. याउलट ज्या कबूतरांची नाके मोकळी होती ती कबूतरे ताबडतोब आपल्या घरट्याकडे परतली.

 

प्राप्त माहितीनुसार पक्ष्यांच्या स्थलांतरासंबंधी पुढील निष्कर्ष काढता येतील : (१) पुष्कळशा जातींचे पक्षी आपला जाण्यायेण्याचा मार्ग उत्तम तऱ्हेने निश्चित करतात. (२) मार्ग निश्चित करण्यासाठी ते सूर्याचा अगर ताऱ्यांचा होकायंत्राप्रमाणे व आंतरिक घड्याळाचा [नियमित कालावधीने लयबद्ध बदल घडवून आणणाऱ्या शरीरांतर्गत यंत्रणेचा ⟶ आवर्तिता, सजीवांतील] उपयोग करतात. (३) त्यांना हवामानाचा अचूक अंदाज घेता येतो. (४) ते हवेच्या दाबाचाही अंदाज घेऊ शकतात. (५) ते पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षण यांचाही अंदाज घेऊ शकतात. (६) त्यांच्या घ्राणेंद्रियांचाही ते उपयोग करतात. (७) कबूतरे ध्रुवित प्रकाश (एका विशिष्ट प्रतलातच कंप पावणाऱ्या तरंगांनी युक्त असलेला प्रकाश) न जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणे ओळखू शकतात.

 

स्थलांतराकरिता वरीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा हे पक्ष्याची जात, वय, हवामान वगैरे परिस्थितींवर अवलंबून राहील. पक्ष्यांच्या स्थलांतरासंबंधीची बरीच अनुमाने अजून प्रयोगाने सिद्ध व्हावयाची आहेत व त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर अद्यापही एक गूढच राहिले आहे.

 

स्तनीप्राणी : सस्तन प्राण्यांत पक्ष्यांच्या मानाने स्थलांतर कमी असते. थंडी सुरू झाल्यावर कीटक कमी होत असल्यामुळे वटवाघळे उत्तर ध्रुवाकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. स्थलांतर करताना नर व माद्यांचे गट वेगवेगळे असतात. अमेरिकन गवा (बायसनबायसन) व रेनडियर (रँगिफरआर्क्टिॲन्स) या सस्तन प्राण्यांत स्थलांतर आढळते. उत्तर अमेरिकेतील हरणांच्या (सेर्व्हसकॅनेडेन्सिस) स्थलांतरच्या वेळी दूर जाताना माद्या पुढे असतात, तर परतीच्या प्रवासाच्या वेळी नर पुढे असतात. अलास्कातील फर-सील हे सस्तन प्राणी बेरिंग सामुद्रधुनीतील आपल्या मूळ प्रदेशातून दक्षिणेकडे पर्यटन करून खूप लांबचा पल्ला गाठतात. लेमिंग्ज (लेमसलेमस) नावाचे उंदरासारखे प्राणी नॉर्वे व स्वीडन या देशांतील आहेत. यांच्यात संख्या नियंत्रित करण्याकरिता स्थलांतर केले जाते. मोठ्या संख्येने हे प्राणी प्रवासाला निघतात. यांपैकी काही वाटेतच अपघाताने मरतात अगर इतर प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. शिल्लक राहिलेले प्राणी समुद्रकिनारा गाठल्यावर समुद्रात आत्मार्पण करतात व अशा रीतीने त्यांची संख्या नियंत्रित होते. काही देवमासे (सिबाल्डसमस्कुलस) आर्क्टिक समुद्रात राहतात व थंड पाण्यातील प्लवकांवर (तरंगणाऱ्या सजीवांवर) जगतात. बर्फ पडू लागल्यावर ते उष्ण कटिबंधात स्थलांतर करतात व पुन्हा उन्हाळी हवा सुरू झाली की, आपल्या निवासी प्रदेशात परत जातात.

 


 

स्थलांतराच्याअभ्यासाचीतंत्रे : ठिकठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून स्थलांतराच्या मार्गाची नोंद ठेवणे, स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांना पकडून त्यांच्या अंगावर खुणा (रंग इ.) करणे अगर पायात कडी किंवा वळी घालणे (पक्षी आणि वटवाघळांच्या बाबतीत), अंगावर बिल्ले लावणे (माशांच्या खवल्यावर), पंखांना भोके पाडणे (फुलपाखरांबाबतीत) किंवा धातूंच्या पट्ट्या चरबीत खुपसून ठेवणे (देवमाशांच्या बाबतीत) अशा निरनिराळ्या साधनांचा उपयोग करून पक्षी, फुलपाखरे अगर वन्य प्राणी कुठवर जातात हे समजू शकते. उड्डाण करताना ते उड्डाण किती उंचीवरून होते ते विमानांच्या टेहळणी करण्याच्या साधनांच्या द्वारे समजू शकते. उड्डाणात पक्षी आवाज करतात व त्याचीही नोंद करता येते. ग्रेबर व कॉक्रन ह्यांनी तर १९५९ मध्ये इलेक्ट्रॉनीय विवर्धक (आदान विद्युत् संकेताच्या शक्तीत वाढ करणारे इलेक्ट्रॉनीय मंडल) व फीतमुद्रक (टेपरेकॉर्डर) परावर्तित अर्धगोलात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या उड्डाणांच्या नोंदी घेतल्या. त्यापूर्वी म्हणजे १९५६ च्या सुमारास सटर यांनी रडारच्या साहाय्याने पक्ष्यांच्या रात्रीच्या उड्डाणांच्या नोंदी घेतल्या होत्या. समुद्रकिनाऱ्यावरची दीपगृहे ही तर स्थलांतराच्या उड्डाणांची नोंद घेण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या पायात घातलेल्या वळ्यांवर त्या घालणाऱ्याचा पत्ता व पक्ष्याचा क्रमांक कोरलेला असतो. पुढे जेव्हा असे पक्षी इतरत्र कोणालाही सापडतात तेव्हा त्यांची नोंद होऊ शकते. अशा केलेल्या नोंदींमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग व इतर आनुषंगिक माहिती यांसंबंधी निश्चिती करता येते.

 

पहा : मानवाचे स्थलांतर.

 

संदर्भ : 1. Dorst, Jean P. Trans. Sherman, C. D. The Migration of Birds, London, 1962.

            2. Fisher, A. C. Mysteries of Bird Migration, National Geographic, August, 1979.

            3. Griffin, D. R. Bird Migration, New York, 1961.

            4. Harden-Jones, F. R. Fish Migration, London, 1969.

            5. Thevenin, R. Animal Migration, New York, 1963.

            6. Williams, C. B. Migration of Butterflies, London, 1930.

 

जोशी, अ. कृ इनामदार, ना. भा.