टेनरेक : कीटकभक्षी गणातील टेनरेसिडी कुलातील एक सस्तन प्राणी. या कुलात १० वंश आणि सु. २० जाती आहेत. त्या मॅलॅगॅसीमध्ये आणि कॉमोरे बेटांत आढळतात. या कुलातील सगळ्याच प्राण्यांना सामान्यतः टेनरेक म्हणण्याचा प्रघात आहे. टेनरेक वंशात टेनरेक इकॉडेट्स ही एकच जाती आहे. मॅलॅगॅसी आणि कॉमोरो बेटांच्या जवळपासच्या इतर बेटांतही या जातीच्या प्राण्यांनी प्रवेश केला आहे. समुद्रसपाटीपासून ९०० मी. उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशांत (रुक्ष प्रदेश वगळून) हे प्राणी आढळतात. उष्ण प्रदेश, झुडपा-रानातील वालुकामय भूप्रदेश, जंगलातील साफ केलेली जागा व पहाडांवरील पठार या ठिकाणी ते राहतात.
टेनरेक भारतीय ⇨जाहकासारखाच प्राणी आहे. त्याची डोक्यासह शरीराची लांबी २६·५–३९·० सेंमी. असते शेपूट १–१·६ सेंमी. लांब असते. शरीराचा रंग सर्वसाधारणपणे करडा तपकिरी अथवा तांबूस तपकिरी असतो, परंतु काही प्राण्यांची पाठ आणि ढुंगण गडद तपकिरी असते. शरीरावर केस आणि कंटक असतात, पण ते दाट नसतात. वयाने लहान प्राण्यांच्या पाठीवर मजबूत पांढऱ्या कंटकांच्या लांब ओळी असतात, पण प्रौढ दशेत त्या नाहीशा होऊन त्यांची जागा लांब ताठ केसांनी घेतलेली असते. मागच्या पायांपेक्षा पुढचे पाय आखूड असतात.
या प्राण्याला भीती वाटली किंवा तो रागावला अथवा चिडला, तर त्याच्या पाठीच्या पुढच्या भागावरील लांब केस ताठ उभे राहतात व तो फुसकारल्यासारखा आवाज काढतो किंवा किंचाळतो. जाहकाप्रमाणे याला शरीराची चेंडूप्रमाणे गुंडाळी करता येत नाही. हे प्राणी मजबूत बांध्याचे आणि बळकट असतात. लाकडांच्या पोकळ ओंडक्यात किंवा खडकांच्या खाली ते विश्रांती घेतात. मात्र हिवाळ्यात जमिनीत १–२ मी. लांबीचे बीळ तयार करून त्यात शीतसुप्ती घेतात. बिळात शिरल्यावर ते त्याचे तोंड बंद करतात.
हे प्राणी दिवसभर बिळात झोपून राहतात आणि संध्याकाळी भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. त्यांचा भक्ष्य शोधण्याचा उद्योग रात्रभर चालू असतो. आपल्या नख्यांनी आणि मुस्कटाने जमीन उकरून ते कीटक, आणि कृमी वनस्पतींच्या मुळ्या खातात. पकडलेले टेनरेक कच्चे मांस आणि केळी खातात.
शीतसुप्तीचा काळ संपल्यावर यांच्या प्रजोत्पादनाचा हंगाम सुरू होतो. गर्भावधी थोडा असतो. मादीला २५ पर्यंत पिल्ले होतात, पण त्यांपैकी १२–१६ जगतात.
यार्दी, ह. व्यं.
“