गिरीश : (२८ ऑक्टोबर १८९३ — ४ डिसेंबर १९७३ ). मराठी कवी. पूर्ण नाव शंकर केशव कानेटकर. जन्म सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे. शिक्षण सातारा आणि पुणे येथे. फलटण, पुणे, सांगली येथे शिक्षक व प्राध्यापक म्हणून काम केले. शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पारितोषिक मिळाले (१९५९). निवृत्तीनंतर सांगलीस स्थायिक झाले.

गिरिश

गिरीश हे ⇨ रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी. बालकवी आणि गोविंदाग्रज ह्यांच्या कविता वाचून त्यांना काव्यरचनेची स्फूर्ती मिळाली परंतु त्यांची काव्यरचना स्वतंत्र आहे. मासिक मनोरंजनात क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या

अभागी कमल (१९२३) ह्या सामाजिक खंडकाव्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्वाचीन मराठीमधील सामाजिक खंडकाव्याचे ते आरंभस्थान म्हणता येईल. त्यानंतर कला (१९२६) हे एकखंडात्मक दीर्घकाव्य, आंबराई (१९२८) हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्य, अनिकेत (१९५४) हे टेनिसनच्या ‘ईनक आर्डन’ ह्या काव्याचे भाषांतर ही दीर्घकाव्ये त्यांनी लिहिली. त्यांची स्फुट कविता कांचनगंगा (१९३०), फलभार (१९३४), मानसमेघ (१९४३) इ. काव्यसंग्रहातून प्रकाशित झालेली आहे. विविध वृत्तांचा वापर, घोटीव शब्दकळा आणि रेखीव रचना ही त्यांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. काही टीकात्मक लेखनही त्यांनी केले आहे (काव्यकला, १९३६ मराठी नाट्यछटा, १९३७). माधव जूलियन्‌ यांचे स्वप्नभूमि (१९६५) हे चरित्र त्यांनी लिहिले आहे. पुणे येथे ते निधन पावले.

जोग, रा. श्री.