बेडेकर, मालतीबाई : (१ ऑक्टोबर १९०५-). विख्यात मराठी कांदबरीलेखिका. जन्म कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्हयातील आवास ह्या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात. शिक्षण घोडनदी, हिंगणे आणि मुंबई येथे ‘प्रदेयागमा’ (पी.ए.)ही कर्वे विद्यापीठाची, एम.ए.च्या दर्जाची, पदवी त्यांनी मिळविली. १९३८ साली विश्राम बेडेकर ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाळूताई खरे हे त्यांचे विवाहापूर्वीचे नाव होय. प्रागतिक विचारांचे वडील, महर्षी अण्णासाहेब कर्वे, वामन मल्हार जोशी, श्री. म. माटे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे पती विश्राम बेडेकर ह्यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. हिंगणे येथील कन्याशाळेच्या त्या काही काळ शिक्षिका व मुख्याधापिका होत्या (१९२३ ते १९३३ पैकी पहिले वर्ष केवळ शिक्षिका म्हणून) त्यानंतर सोलापूर येथे, सरकारच्या शिक्षण व कल्याण खात्यात ‘महिला-पर्यवेक्षिका’ (लेडीज सुपरिटेंडंट) म्हणून त्यांनी नोकरी केली (१९३७-४०). तेथे असताना गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातीचा जवळून अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘महिला सेवाग्राम’ ह्या संस्थेतही त्यांनी ‘केस रिव्हयू बोर्डा’वर सु. १० वर्षे विनावेतन काम केले (१९५२ -६२). अनाथ, विधवा, परित्यक्ता अशा विविध प्रकारच्या दुःखी स्त्रियांच्या समस्या त्यांना तेथे अभ्यासता आल्या. १९२५ सालापासूनच त्या लेखनाकडे वळल्या. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर ह्यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. अलंकारमंजूषा हा अलंकार शास्त्रावरील ग्रंथ असून हिंदू व्यवहार धर्मशास्त्रात हिंदू कायद्याचे सोपे, सुबोध विवेचन आहे. हे दोन्ही ग्रंथ मालतीबाईंच्या व्यासंगाची साक्ष देतात. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी त्यांची कथा घेतली गेली, तेव्हा विभावरी शिरुरकर म्हणजे मालतीबाई बेडेकर होत, हा गौप्य स्फोट झाला. कळ्यांचे निःश्वास ह्या कथासंग्रहानंतर हिंदोळ्यावर (१९३४), विरलेले स्वप्न (१९३५), बळी(१९५०), जाई(१९५२), शबरी(१९६२) ह्यासांरख्या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. आपल्या कांदबऱ्यातूनही, मराठी साहित्यात दीर्घकाळ अव्यक्त राहिलेले स्त्रियांच्या व्यथांचे एक वेगळे वेदनाविश्व त्यांनी अत्यंत प्रांजळपणाने साकार केले. त्यांच्या कथा-कांदबऱ्यांनी वाचकांच्या मनाची पकड तर घेतलीच पंरतु मराठी साहित्यश्रेष्ठींचे कुतूहलही जागृत केले. त्याचे दर्शन आपणास विभावरीचे टीकाकार (१९४९, संपा, व्दा.भ. कर्णिक ब्र. मु. नाडकर्णी) ह्या ग्रंथातून घडते. असे असले, तरी स्त्रीजीवनाची एक विशिष्टच बाजू आपल्या कथा कांदबऱ्यातून उभी केल्यामुळे, तसेच काही स्वयंकेद्रित व्यक्तिरेखाच त्यांतून रंगविल्यामुळे, त्यातील जीवनदर्शनात एंकागीपणा आल्याची टीका त्यांच्यावर झालेली आहे. त्यांच्या बळी ह्या कादंबरीने मात्र एका नव्याच जाणिवेला वाट करून दिली. गुन्हेगार मानल्या गेलेल्या जमातींच्या जीवनाचे सूक्ष्म, मार्मिक व वास्तव चित्र ह्या कांदबरीत त्यांनी उभे केले. सखोल जीवनान्वेषण आणि अनलंकृत पण नेमकी, परिणामकारक भाषा ही ह्या कादंबरीची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. सोलापूर येथे शिक्षण व कल्याण खात्यात काम करीत असताना आलेले अनुभव ह्या कादंबरीच्या लेखनासाठी त्यांना प्रेरक ठरले. पारध (१९४७) आणि हिरा जो भंगला नाही हयांसारखी काही नाटकेसुध्दा त्यांनी लिहिली आहेत. महिला सेवाग्राम ह्या संस्थेतील अनुभंवाच्या आधारे घराला मुकलेल्या स्त्रिया (१९६२) हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख त्यांनी लिहिला. स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन (१९७१) हा त्यांचा ललित निंबंधसंग्रह होय. बळी, शबरी आणि घराला मुकलेल्या स्त्रिया ह्या तीन पुस्तंकाना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली. त्यांच्या बहुतेक कांदबऱ्यांची गुजरातीत भाषांतरें झाली आहेत. १९८१ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तत्पूर्वी विलेपार्ले, ग्वाल्हेर, नासिक ह्या ठिकाणी झालेल्या विभागीय साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते. इंदूर,कराड,नागपूर,जळगाव येथे झालेल्या स्त्री परिषदांच्या अध्यक्षस्थानीही त्या होत्या. तसेच बोहरा सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले होते.

कुलकर्णी, अ. र.