बापट, नागेश विनायक : (? – मार्च १९॰२). ऐतिहासिक कादंबरीकार आणि चरित्रकार. जन्म सातारा जिल्ह्यातील वाईचा. शिक्षण मॅट्रिकपर्यंत तसेच कराड येथे विठोबा अण्णा दप्तरदार ह्यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकले नाहीत. आरंभी पोस्टखात्यात पोस्टमास्तर म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर मुंबई सरकारच्या शिक्षणखात्यात नोकरी केली. ह्या नोकरीत त्यांचा उत्कर्ष होऊन डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर ह्या पदापर्यंत ते चढले. १८७२ मध्ये ही नोकरी सुटली. त्यानंतर बडोदे संस्थानचे अधिपती श्री सजाजीराव महाराज ह्यांचा आश्रय त्यांना लाभला. प्रथम अबकारी खात्यातील दरोगे आणि नंतर मामलेदार म्हणून ह्या संस्थानाची सेवा त्यांनी केली ह्या सेवेत असतानाच त्यांचे बरेचसे लेखन झाले. बापटांचा पहिला ग्रंथ बाजीराव बल्लाळ ऊर्फ पहिले बाजीरावसाहेब पेशवे (१८७९) हा होय. हा चरित्रग्रंथ असला, तरी त्यातील विभूतिपूजेची प्रवृत्ती, कल्पनारम्यता आणि अलंकृत भाषा ह्यांमुळे त्याला एखाद्या रसाळ ऐतिहासिक कादंबरीचे स्वरूप आलेले आहे. ह्या ग्रंथामुळे बापटांना ग्रंथकार म्हणून चांगली प्रसिद्धी मिळाली. कै. श्रीमंत महाराणी जमनाबाईसाहेब गायकवाड ह्यांचे चरित्र (१९॰॰) हा बापटांचा त्यानंतरचा एक उल्लेखनीय चरित्रग्रंथ. राजगुरू दादोजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज (आवृ.२ री, १८८३) ह्या त्यांच्या ग्रंथात दादोजी कोंडदेवांचे चरित्र, त्यांच्या निधनाचा प्रसंग आणि त्यांनी शिवाजी महाराजांना केलेला उपदेश आलेला आहे. इतिहास, वृद्धपरंपरेने चालत आलेल्या गोष्टी व कित्येक इंग्रजी आणि मराठी ग्रंथ ह्यांच्या आधाराने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यातील दादोबांचा उपदेश मात्र काल्पनिक आहे. सुभद्राहरण (१८९२), जैमिनी अश्वमेधाच्या आधारे लिहिलेले टिटवी (१८९३) यांसारखी काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली परंतु त्यांची ख्याती मुख्यत: एक ऐतिहासिक कादंबरीकार म्हणूनच आहे. लालन दी बैरागन ह्या इंग्रजी कादंबरीच्या आधारे तसेच पानपतविषयक काही बखरींतून माहिती मिळवून त्यांनी लिहिलेली पानपतची मोहीम सन १७६१ (१८९७) ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचें दुष्कर्म राजाला भोंवतें आणि प्रजेलाही भोवते (आवृ. २ री, १८८८) आणि चितूरगडचा वेढा (१८९९) ह्या त्यांच्या अन्य कादंबऱ्या. बापटांनी कादंबरीलेखनास सुरुवात केली, तो काळ रम्यादभुततेच्या आकर्षणाचा होता. तथापि बापटांनी ऐतिहासिक सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. ऐतिहासिक कादंबरीकार हाही एक प्रकारचा इतिहासकारच होय, असे त्यांचे मत होते. बापटांची निवेदनशैली चटकदार होती. ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यापेक्षा इतिहासच मनोरंजक करण्याच्या प्रवृत्तीचा उगम बापटांच्या कादंबतऱ्यात दिसून येतो, असा नरहर कुरुंदकरांसारख्या समीक्षकांचा अभिप्राय आहे. फलटण येथे ते निधन पावले.

संदर्भ : खानोलकर, गं. दे. अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक, तृतीय खण्ड, मुंबई १९४९.

कुलकर्णी, गो. म.