गोळे, पद्मा : (१० जुलै १९१३– ). आधुनिक मराठी कवयित्री. ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन. पटवर्धन राजघराण्यात तासगाव येथे जन्म. प्राथमिक शिक्षण तासगाव येथे. माध्यमिक शिक्षण पुण्यास. एरंडवणा, पुणे येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम्. ए. झाल्या. शालेय जीवनात त्यांना नाट्यलेखनाची विशेष आवड होती. पन्नादाई  हे त्यांचे नाटक वार्षिक संमेलनात सादर केले गेले होते. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (अप्रकाशित) ही दोन पुरुषपात्रविरहित नाटकेही त्यांनी लिहिली. प्रीतिपथावर (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. 

प्रितिपथावर  ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.

स्वप्नजा  या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका  या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे.

गोखले, विमल