देशपांडे, कुसुमावती आत्माराम: (१० नोव्हेंबर १९०४–१७ नोव्हेंबर १९६१). श्रेष्ठ मराठी कथालेखिका आणि समीक्षक. अमरावती येथे जन्म. पूर्वाश्रमीचे नाव कुसुम जयवंत. मुंबई, नागपूर व लंडन विद्यापीठांत शिक्षण. बी. ए. (ऑनर्स) झाल्यावर नागपूर महाविद्यालयात (पूर्वीच्या मॉरिस कॉलेजात) १९३१ ते १९५५ पर्यंत इंग्लिशचे अध्यापन. नंतर आकाशवाणीच्या स्त्री व बालविभागाच्या निर्मितिप्रमुख. श्रेष्ठ मराठी कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांच्याशी त्यांचा १९२९ मध्ये प्रेमविवाह झाला. उभयतांच्या प्रेमजीवनाचे दर्शन घडविणारा पत्रव्यवहार कुसुमानिल (१९७२) या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. मराठीत तरी अपूर्व आहे. दीपकळी (१९३५), दीपदान (१९४१), मोळी (१९४६), दीपमाळ (१९५८), असे चार लघुकथासंग्रह प्रकाशित. अनुभवांचे निवेदन अपरिहार्य वाटल्यावरच त्यांनी कथा लिहिल्या. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील संबंधांचा त्यांनी आपल्या कथांतून शोध घेतला. तंत्रापेक्षा कथेचा विषय व त्याविषयीचा आपला दृष्टिकोण यांना महत्त्व दिल्याने त्यांच्या कथांना वेगळेपणा लाभला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वामन मल्हार जोशी स्मारक व्याख्यानमालेत त्यांनी मराठी कादंबरीसाहित्यावर १९४८ ह्या वर्षी व्याख्याने दिली. ती मराठी कादंबरी : पहिले शतक या नावाने दोन भागात (१९५३ व १९५४) प्रसिद्ध झाली. त्यांत १८५७ ते १९५० मधील कादंबऱ्यांचे समालोचन आहे. मराठी कादंबरीचा टीकात्मक इतिहास, तिच्यातील प्रवृत्तींचे व परंपरांचे स्पष्टीकरण आणि कादंबरी या साहित्यप्रकाराच्या अंतिम मूल्यांचे दिग्दर्शन त्यात आढळते. पासंग (आवृ. २ री, १९६१) हा त्यांच्या १९३३ ते १९६१ ह्या काळातील निवडक टीकालेखांचा व भाषणांचा संग्रह. या काळातच नवकाव्य व नवकथा आणि अनुषंगाने समीक्षेतील काही नवे विचार यांचा उदय झाला. स्वतंत्र भारतातील सामाजिक पुनर्घटनेचे प्रश्न इतर विचारवंतांप्रमाणे कुसुमावतींनाही जाणवले इंग्लिश साहित्यसमीक्षेच्या चोखंदळ अभ्यासाचीही जोड लाभली. यांमुळे सौंदर्यमूल्याबरोबरच मानसशास्त्रीय, सामाजिक आणि सार्वकालीन जीवनमूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला. स्फुट टीकालेखनाच्या आधुनिक परंपरेत जीवनसापेक्ष टीकाविचाराला सर्वसमावेशक बनवून त्यांनी अधिक विकसित केले. याचा प्रत्यय पासंगमधील टीकालेखांवरून येतो.

त्यांनी लहान मुलांसाठीही लिहिले आहे. त्यापैकी थेंबाची गोष्ट पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. रमाबाई रानडे ह्यांच्या आमच्या आयुष्यातील आठवणींचे त्यांनी इंग्रजी भाषांतर केले. ते केंद्रीय शासनाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध केले. समाजशिक्षणाच्या दृष्टीनेही त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत.

‘साहित्य अकादेमी’ च्या त्या सभासद होत्या. ग्वाल्हेरला १९६१ मध्ये भरलेल्या त्रेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. नवी दिल्ली येथे त्या हृदयविकाराने निधन पावल्या.

संदर्भ : पोतदार, अनुराधा, कुसुमावती वाङ्‌मयदर्शन, पुणे, १९७५.

जाधव, रा. ग.