श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१ –    ). मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार. पूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. जन्म भिकार तासगाव (जि. सातारा) येथे. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविदयालय आणि कराडचे सायन्स महाविदयालय येथे उच्च शिक्षण घेऊन ते बी.एस्‌सी. झाले (१९६४) आणि पुणे विदयापीठातून एम्.एस्‌सी. ही पदवी त्यांनी संपादन केली (१९६७). त्यानंतर अध्यापनक्षेत्रात शिरून त्यांनी डॉ. दातार कॉलेज, चिपळूण ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथे काही काळ अध्यापन केल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले आणि त्याच महाविदयालयातून निवृत्त झाले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करू लागले. ‘काँपिटिशन’ ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. आणि बाकीचे सगळे (१९८०) व बिनमौजेच्या गोष्टी (१९८०) हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., ‘वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस’, ‘गुरूत्वापसरणाचे प्रदेश’ इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरूषोत्तमराव (१९८३), शीतयुद्ध सदानंद (१९८७), कळ (१९९६), खूप लोक आहेत (२००२), उत्सुकतेने मी झोपलो (२००६) या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रूढ आकृतिबंध आढळणार नाहीत तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव्र जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात. मध्यमवर्गीयांच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे येणारा जीवनाकडे प्रगल्भपणे पाहण्याचा अभाव हा अनेकदा त्यांच्या उपरोधाचे लक्ष्य ठरतो. शब्दांचा वापरही ते अनेकदा असांकेतिक पद्धतीने करतात. यकृत (१९८६), हृदय (१९८७), येळकोट (१९९३), प्रेमाची गोष्ट ? (१९९७), दर्शन (२००४) ह्या त्यांच्या नाटकांतूनही असांकेतिक लेखनाची वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. उत्कृष्ट कथालेखनासाठी कराड पुरस्कार (१९८३) सर्वोत्तम नाट्यलेखनासाठी नाट्यदर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४) कादंबरीलेखनासाठी ह. ना. आपटे पुरस्कार (१९८४) गंगाधर गाडगीळ पुरस्कार (१९९४) उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी साहित्य अकादेमी पुरस्कार  (२००८) त्यांना प्राप्त झाले आहेत.

कुलकर्णी, अ. र.