महाजनी, विष्णु मोरेश्वर : (१८५१−१९२३). मराठी कवी. जन्म पुणे येथे १८७३ साली एम्.ए. झाल्यानंतर शिक्षणखात्यात नोकरी करू लागले आणि तेथे शिक्षणसंचालकाच्या पदापर्यंत नोकरी करू लागले आणि तेथे शिक्षणसंचालकाच्या पदापर्यंत चढले.

अव्वल इंगर्जीच्या कालखंडातील आंग्लविभूषित कवींपैकी महाजनी हे एक होत. इंग्रजीतील ‘जी जी सुंदर व सुगंधी कुसुमे सापडली त्यांची ओंजळ महाराष्ट्रीयांस अर्पण’ करण्यासाठी त्यांनी स्कॉट, येनसन, ब्राउनिंग, लाँगफेलो, वर्ड्स्वर्थ, शेली, कोलरिज ह्यांसारख्या कवींची भावगेय कविता कुसुमांजली (१८८५) ह्या संग्रहाच्या रूपाने मराठीत आणली. मराठी भावकवितेतील आत्मपरतेची चाहूल कुसूमांजलीतून दिसून आली, हे या संग्रहाचे मराठी कवितेच्या संदर्भातील महत्त्व होय.

महाजनींच्या अन्य लेखनात शेक्सपिअरच्या काही नाट्यकृतींच्या आधारे लिहिलेल्या नाटकांचा (मोहविलसित, १८८१, विंटर्स टेल) वल्लभानुनय, (१८८७, ऑल इज वेस दॅट एन्डस् वेल) तारा (१८८८, सिंबेलाइन) तसेच बंगल्यातील जमीनदारी वहिवाट (१८९६), ग्रंथसंग्रहालये (१९०७) ह्या पुस्तकांचा समावेश होतो.

पुणे येथे १९०७ साली भरलेल्या मराठी साहित्यासंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कुलकर्णी, अ. र.