गो. गं. लिमयेलिमये, गोपाळ गंगाधर : (२५ सप्टेंबर १८८१-१८ नोव्हेंबर १९७१). मराठी कथाकार आणि विनोदकार. ‘ कॅ.गो.गं.लिमये’ ह्या नावाने लेखन. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. तथापि त्यांच्या वडिलांची बदली बेळगावला झाल्यामुळे त्यांचे बालपण तेथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावलाच झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून घेतले. पुढे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून वैद्यकीय पदवी घेतली. वैद्यकीय परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले. ‘ इंडियन मेडिकल सर्व्हिस’ साठी त्यांची निवड होऊन १९१८ते १९२१ ह्या कालखंडात त्यांना सैन्यात कॅप्टन ह्या हुद्यावर नेमले गेले. १९२२ ते १९५४ पर्यंत मुंबई महानगरपालिकेत आरोग्याधिकारी म्हणूनच त्यांनी काम पाहिले.

लिमये ह्यांनी १९१२ पासून लेखनाला सुरुवात केली. ‘ प्रेमाचा खेळ’ ही त्यांची पहिली कथा १९१२ मध्ये मासिक मनोरंजनात प्रसिद्ध झाली. त्याच सुमारास बापूची प्रतिज्ञा… ही त्यांची विनोदी दीर्घकथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. सखा सोनचाफा व इतर गोष्टी (१९२२), वनज्योत्स्ना (दीर्घकथा, १९२४), शकूचा भाऊ (१९२८), तिच्याकरिता (१९३३) आणि हेलकावे (१९३८) हे त्यांचे अन्य कथाग्रंथ. ह्यांखेरीज त्यांच्या काही कथांचा एक संग्रह- गो. ग. लिमये ह्यांच्या निवडक कथा -१९७० साली राम कोलारकर ह्यांनी संपादून प्रसिद्ध केला. १९२० च्या पूर्वीची त्यांची कथा घटनाप्रधान, बोधप्रधान आणि काहीशी पाल्हाळिक होती परंतु १९२२ साली त्यांनी लिहिलेली ‘किस्मत’ ही कथा मराठी कथेला वेगळी वाट दाखवणारी ठरली. ह्या कथेत त्यांनी माणसाच्या मनाचा वेध घेतला. घटनाप्रधान आणि कल्पनारम्य वातावरणातून मराठी कथेला वास्तवतेकडे वळविण्याचा, अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला. ह्याशिवाय युद्धाच्या अनुभवांवर कथा लिहून मराठीत युद्धकथांची लक्षणीय भर घातली.

कथेइतकेच मोलाचे कार्य लिमये यांनी विनोदाच्या क्षेत्रात केले. विनोदी लेखसंग्रह (१९२३), विनोदसागर…(१९२५), जुना बाजार (१९३२), गोपाळकाला (१९४२), तुमच्याकरिता (१९५०) व विनोदबकावली (१९६५) हे त्यांच्या विनोदी लेखांचे संग्रह. त्यांच्या आरंभीच्या विनोदावर कोल्हटकर व गडकरी ह्यांची छाप दिसते. नंतर मात्र त्या प्रभावाच्या ते बाहेर पडलेले दिसतात. मानवी स्वभावाच्या सूक्ष्म अवलोकनातून त्यांचा विनोद निर्माण झालेला आहे. मानवी जीवनातील विसंगतींचे दर्शन तो घडवतो पण कुठेही बोचक उपरोध नसल्यामुळे तो प्रसन्न वाटतो. साध्या साध्या घटनांतून विनोदनिर्मिती करण्याचे त्यांचे कौशल्य ‘छकडा, सिंहगड आणि कुत्रे’, ‘आमची (आळंदीची) सायकल ट्रिप,’ ‘पाण्याच्या बादलीचा विलक्षण खटला’ ह्यांसारख्या विनोदी लेखांतून सहज दिसून येते. कथा, नाट्य, प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी त्यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय विविधता आलेली आहे.

सैन्यांतील आठवणी (१९३९)हे लिमये यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. पेशावर, दारेसलाम, बगदाद इ. ठिकाणच्या त्यांच्या आठवणी त्यांनी त्यात मनोरंजक पद्धतीने सांगितल्या आहेत. ह्यांशिवाय विख्यात फ्रेंच नाटककार मोल्येर ह्याच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. वैद्यक, शुश्रूषा अशा विषयांशी संबंधित पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.

पुणे येथे ते निधन पावले. 

अदवंत, म. ना.