तिसट्‌ठि–महापुरिस–गुणालंकार : अपभ्रंश भाषेतील एक श्रेष्ठ महाकाव्य. संस्कृत रूप त्रिषष्टि–महापुरुष–गुणालंकार. कर्ता ⇨ पुष्पदंत (दहावे शतक). महापुराण ह्या नावानेही हे महाकाव्य ओळखले जाते. राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण ह्याच्या आश्रयाने आणि प्रोत्साहनाने पुष्पदंताने ह्या महाकाव्याच्या रचनेस इ. स. ९५९ मध्ये सुरुवात करुन ९६५ मध्ये ते पूर्ण केले. जैन धर्मातील २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव, ९ प्रतिवासुदेव आणि ९ बलदेव अशा एकूण ६३ महापुरुषांची (शलाकापुरुषांची) चरित्रे त्यात वर्णिली आहेत. ह्या महाकाव्यात एखूण १०२ संधी असून त्यांची ३ खंडांत विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला खंड (संधी १ ते ३७) ‘आदिपुराण’ ह्या नावाने ओळखला जातो. दुसऱ्या व तिसऱ्या खंडांत ‘उत्तरपुराण’ विभागलेले आहे (संधी ३८ ते ८० आणि ८१ ते १०२).

पुष्पदंताने जैन पुराणातील संकेतांप्रमाणेच महाकाव्याचे संकेतही पाळलेले आहेत. ब्राम्हणी पुराणांतील सूतशौनकसंवादाप्रमाणे ह्या महापुराणालाही मगधराज श्रेणिक व महावीरशिष्य (गणधर) गौतम ह्यांच्या संवादाची पार्श्वभूमी ठेवलेली आहे. श्रेणिकाच्या विनंतीवरून गौतम ‘महापुराण’ सांगू लागतो.

आदिपुराणात जैनांचा पहिला तीर्थंकर ऋषभनाथ ह्याचे चरित्र आलेले आहे. उत्तरपुराणाच्या प्रथमार्धात म्हणजे महापुराणाच्या दुसऱ्या खंडात २० तीर्थंकर, ८ बलदेव, ८ वासुदेव, ८ प्रतिवासुदेव आणि १० चक्रवर्ती एवढ्यांचे वर्णन आहे.  ह्याच खंडात रामायणकथाही आलेली आहे (संधी ६९ ते ७९). ह्याच भागास जैनांचे ‘पउमचरिउ’ अथवा पद्मपुराण म्हणतात. श्रेणिकाच्या मनात रामकथेविषयी काही शंका असल्यामुळे त्यांचे निरसन करण्याची विनंती तो गौतमाला करतो. त्यानंतर जैन धर्मीयांची रामकथा सुरू होते.

व्यास–वाल्मीकींच्या वचनांवर विश्वास ठेवून लोक कुमार्गाला लागले वाल्मीकीने खरी रामकथा सांगितली नाही ती आपण सांगतो आहोत, असा कवीचा दावा आहे. जैनमतानुसार रामाच्या आईचे नाव सुबला लक्ष्मणाची आई कैकेयी. राम गोरा होता, तर लक्ष्मण सावळा. सीता ही रावण आणि मंदोदरी ह्यांची मुलगी. ती आपल्या पित्यास संकटात आणील असे भविष्य वर्तविले गेल्यामुळे रावण तिला पेटीत घालून एका शेतात गाडून टाकतो. ही पेटी जनकाला मिळते आणि तो सीतेचे पालन–पोषण करतो, तिचा रामाशी विवाह लावून देतो. रामाचा सीतेखेरीज अन्य सात स्त्रियांशी विवाह झाला होता, तसेच लक्ष्मणलाही सोळा बायका होत्या, असे ह्या जैन रामकथेत सांगितले आहे. नारदांच्या तोंडून सीतेची प्रशंसा ऐकून रावण तिला पळवितो. सीताहरणाच्या वेळी दशरथ हयात असतो. राम–रावणाचे घनघोर युद्ध होते. तथापि रावणवध लक्ष्मणाकडून होतो. त्यानंतर लक्ष्मण अर्धचक्रवर्ती होतो, राज्योपभोग घेऊन अंती नरकास जातो. राम भिक्षी होतो निर्वाणपदी पोहोचतो. राम, लक्ष्मण आणि रावण हे जैनांचे अनुक्रमे ८ वे बलदेव, वासुदेव आणि प्रतिवासुदेव होत.

उत्तरपुराणाच्या दुसऱ्या भागात (महापुराणाचा ३ रा खंड) संधी ८१ ते ९२ मध्ये महाभारताची कथा (हरिवंश–पुराण) आहे पार्श्वनाथ, महावीर, जंबूस्वामी आणि प्रीतिंकर ह्यांच्याही कथा आहेत. महावीराच्या निर्वाणाचे वर्णन देऊन ग्रंथाची अखेर केली आहे.

६३ महापुरुषांच्या चरित्र्यांचे कथन असणाऱ्या ह्या महापुराणात काही प्रमाणात रचनाशैथिल्य येणे स्वाभाविकच होते तथापि पुष्पदंताच्या श्रेष्ठ प्रतिभेच्या आणि साहित्यगुणांच्या त्यातुन येणाऱ्या प्रत्ययामुळे हे न्यून मोठे वाटत नाही. मनोहर निसर्गवर्णने, सुंदर सुभाषिते व लोकोक्ती शांत रसाला पोषक असाच शृंगारवीरादी रसांचा केलेला परिपोष अलंकारप्रचुर, अर्थगांभीर्ययुक्त अशी भाषा ही ह्या महाकाव्याची उल्लेखनीय वैशिष्ठ्ये होत. डॉ. प. ल. वैद्य ह्यांनी हे महाकाव्य संपादिलेले आहे.

तगारे, ग. वा.