ख्रिस्ती उपवासकालपूर्व मार्दी ग्रा आनंदोत्सव : एक दृश्य, न्यू ऑर्लीअन्स.

न्यू ऑर्लीअन्स : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील लुइझिॲना राज्यातील प्रसिद्ध औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक शहर आणि परदेश दळणवळणाच्या बाबतीत संयुक्त संस्थानांतील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ५,९३,४७१ (१९७०). हे मिसिसिपी नदीकाठी मुखापासून आत सु. १८० किमी. वर मिसिसिपी नदी आणि पाँचरट्रेन सरोवर यांदरम्यान वसले आहे. केनर, मेट्री, वेस्ट वीगो, मरॅरो, हार्व्ही आणि ग्रेटना ही याची प्रमुख उपनगरे होत. मिसिसिपी नदीच्या वळणावर वसले असल्याने ‘अर्धचंद्राकृती शहर’ हे त्याचे नाव सार्थ वाटते. लॅटिन अमेरिकेचे प्रवेशद्वार म्हणूनही हे शहर ओखळले जाते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. १४४ सेंमी. असून येथे जवळजवळ वर्षभर पाऊस पडतो. येथील हवामान उपोष्ण प्रकारचे असून ऑक्टोबर ते मार्च आणि एप्रिल ते सप्टेंबर यांदरम्यान दैनिक सरासरी तपमान अनुक्रमे १६° व २५° से. असते. उन्हाळे अधिक उष्ण नसतात आणि हिवाळ्यात थंडी पडत असली, तरी तपमान सहसा गोठन बिंदूपर्यंत खाली जात नाही. येथील आल्हाददायक हवामानामुळे एक पर्यटन केंद्र म्हणूनही याची प्रसिद्धी आहे. हे १८४९ पर्यंत लुइझिॲना राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. न्यू ऑर्लीअन्सची ऐतिहासिक पार्श्वभूमीही उल्लेखनीय आहे. एक फ्रेंच वसाहत म्हणून १७१८ मध्ये शहराची स्थापना होऊन ड्यूक डी ऑर्लीअन्स या फ्रेंच राजमुखत्यारीच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहराला हे नाव दिले. १७६२ ते १८०३ यांदरम्यान हे स्पॅनिशांच्या ताब्यात होते तर १८०३ मध्ये पहिल्या नेपोलियनने लुइझिॲना राज्यासह हे शहर संयुक्त संस्थानांना विकले. येथे १८१५ मध्ये झालेले ब्रिटन-अमेरिका यांच्यातील न्यू ऑर्लीअन्स युद्ध प्रसिद्धच आहे. दुसऱ्या महायुद्ध काळातही येथील लष्करी आणि नाविक तळांमुळे शहराला विशेष महत्त्व होते.

न्यू ऑर्लीअन्स हे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग व जलमार्गांचे प्रमुख केंद्र असून, जगातील सु. ८० जलमार्ग येथे मिळतात. मिसिसिपी नदी व पाँचरट्रेन सरोवर यांना जोडणारा २० किमी. लांबीचा कालवासुद्धा जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या बंदरातून मुख्यतः खनिज तेल, इमारती लाकूड, कापूस, मीठ, तंबाखू, गंधक, यंत्रसामग्री, लोखंड, पोलाद व खाद्य पदार्थांची निर्यात आणि बॉक्साइट, कॉफी, साखर, केळी यांची आयात केली जाते. बंदरात धान्याची उंच कोठारे व आठ केळी वाहकांची उत्तम सोय आहे. खनिज तेलशुद्धीकरण, अल्कोहॉल तयार करणे, ॲल्युमिनियम व ॲस्बेस्टसच्या वस्तू बनविणे, दुग्धपदार्थ, इमारती लाकूड व लाडकी वस्तू, मांसपदार्थ, औषधी तेले तयार करणे, अन्नप्रक्रिया, कागद, सरकी काढणे, साबण, रसायने, कापडनिर्मिती, दोरखंडे, विटा व सिमेंट तयार करणे, जहाजबांधणी व दुरुस्ती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. शहराच्या परिसरातील खनिज तेल, नैसर्गिक वायू, गंधक, मीठ, चुनखडी, लाकूड ही प्रमुख नैसर्गिक उत्पादने असून ती शहरातील विविध कारखान्यांमध्ये वापरली जातात. येथे सॅटर्न रॉकेटच्या उड्डाणासाठी लागणाऱ्या उत्क्षेपकाचा प्रकल्प ‘द नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ ह्या संस्थेने सुरू केल्याने (१९६०) शहराच्या आर्थिक विकासावर चांगलाच परिणाम झाला आहे. ह्याच्या आसमंतात साखर, तांदूळ, स्ट्रॉबेरी ऑरेंज, पालेभाज्या, मांस व दूध यांचे उत्पादन केले जाते. १८६२ पर्यंत गुलामांचा व कापसाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. मासेमारीही थोडीफार चालते.

फ्रेंच वसाहत, स्पॅनिश किल्ला, जॅक्सनचा चौथरा, सेंट लुई कॅथीड्रल, मेटायरी सेमेटरी कबरस्थान, पाच वस्तुसंग्रहालये, १४० उद्याने आणि क्रीडामैदाने, प्राणिसंग्रहालय, चर्च इ. येथील प्रमुख आकर्षणे होत. येथे दरवर्षी भरणारा मार्दी ग्रा हा येथील प्रसिद्ध उत्सव असून हजारो लोक या उत्सवाला येतात. तुलाने, लोयोला, डिलार्ड, झेव्हीयर आणि लुइझिॲना राज्य ही विद्यापीठे, सेंट मेरीचे डोमिनिकन, न्यू कोंब व अवर लेडी ऑफ होली क्रॉस ही स्त्रियांची महाविद्यालये, स्त्रियांची अर्सुलाइन अकादमी, डेलगाडो व मौंट कार्मेल महाविद्यालय यांशिवाय अनेक शाळा व महाविद्यालये शहरात आहेत. येथे तीन व्यापारी व एक शैक्षणिक दूरदर्शनकेंद्र आणि चौदा रेडिओकेंद्रे आहेत.

चौधरी, वसंत