बेशुद्धि :  शरीराच्या ज्या अवस्थेत बाह्य उद्दीपकांना कोणताही अर्थपूर्ण प्रतिसाद मिळत नाही तिला ‘बेशुद्धी’ म्हणतात. जेव्हा वेदनाजन्य ⇨प्रतिक्षेपी क्रियांचा  संपूर्ण लोप होतो तेव्हा त्या अवस्थेला ‘गुंगी अथवा बेहोषी’ म्हणतात. परिसराची जाणीव म्हणजे ‘बेशुद्धी’ असे म्हणता येईल. ज्या मानसिक क्रिया या जाणिवेस कारणीभूत असतात त्या बेशुद्धीत तात्पुरत्या अक्रिय बनतात.

बेशुद्धीत रोगी झोपल्यासारखा दिसतो व कोणताही बाह्य उद्दीपक त्याला जाग आणण्यास असमर्थ असतो. गंभीर बेशुद्धीत स्वच्छमंडल प्रतिक्षेप (स्वच्छमंडलास म्हणजे बुबुळाच्या पुढच्या (डोळ्यावर प्रकाशकिरण पडताच होणारे बाहुलेचे कुंचन), कंडरा प्रतिक्षेपी क्रिया उदा., जान्वस्थी प्रतिक्षेप ⟶ प्रतिक्षेपी क्रिया) या र्व प्रतिक्षेपी क्रिया लोप पावलेल्या असतात. गुंगीत अथवा बेहोषीत मात्र काही प्रतिक्षेपी क्रिया मिळतात. झोप व बेशुद्धी यांतील प्रमुख फरक हाच की, झोपलेल्या व्यक्तीस प्रयत्नांती जाग आणता येते.

बेशुद्धी हे एक लक्षण असून ते अनेक विकृतींत उद्भवण्याचा संभव असतो. काही चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारच्या रोगांत मृत्युपूर्व अवस्थेत बेशुद्धी हळूहळू द्भवते. प्रस्तुत नोंदीत अनाहूत व एकाएकी उद्भवणाऱ्या बेशुद्धीविषयी माहिती दिली आहे.

मोठ्या रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात बेशुद्धीवस्थेतील रोगी नेहमीच आणले जातात. बेशुद्ध रोग्याची वैद्यकीय तपासणी फार महत्तवाची असते, कारण तिच्यावरून मूळ विकृतीच्या निदनास मदत होते. बेशुद्ध रोग्याचे कोणतेही सहकार्य मिळणार नाही हे ध्यानात घेऊनच त्याची शारीरिक तपासणी ठराविक पद्धतीने करणे जरूर असते. आ. १ मध्ये अशा तपासणीचा एक प्रकार दाखविला आहे. शरीरभागापुढे काय बघावयाचे हे कृतिवर्मनात पुढे दर्शविले आहे.

कारणे : बेशुद्धीच्या कारणांचे र्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (अ) मस्तिष्कीय : (१) आघात, (२) रक्तवाहिनीजन्य, (३) अबुर्दीय (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीने उद्भवणारी), (४) संसर्गजन्य, (५) ⇨अपस्मार (फेफरे) 

आ.१. बेशुद्धी रोग्याची तपासणी : (१) शिरोवल्क व कवटी : आघातजन्य इजा (२) डोळे : स्वच्छमंडल (स्कतस्त्राव, कावीळ), बाहुली (प्रकाश प्रतिक्षेप-आकुंचन वा विस्फारण), नेत्रबुघ्न {डोळ्यातील आवरणांच्या मागील बाजूचा भाग दृक् बिंब शोफ [⟶नेत्रवैद्यक], अतिरक्तदाबजन्य किंवा मधुमेहजन्य विकृती} (३) उच्छ्वास : मूत्रीय, ॲसिटोन, अल्कोहॉल (४) त्वचा : घामाने डबडबलेली, शुष्क, लाली, नीलवर्णता (रक्ताच्या अपुऱ्या ऑक्सिजनसंयोगामुळे त्वाचा निळसर होणे), कावीळ (५) हृदय : पसामान्य लय, द्विदल संकोच (डाव्या लिंद व निलय यांतील झडपेच्या छिद्राचा संकोच (६) बाहू : रक्तदाब अर्धांगवात, अंतःक्षेपणाच्या )इंजेक्शनाच्या) खुणा (७) हात : नाडी-लय व घनफळ, कंप (८) पाय : अर्धांगवात, पादतल प्रतिक्षेप [⟶प्रतिक्षेप क्रिया] (९) गुदद्वार : शारीरिक तापमान (१०) मूत्राशय व मूत्र : मूत्रावधारण (लघवी मूत्राशयात अडकविणे) किंवा मूत्रअसंयती (न समजता लघवी होणे), मूत्रपरीक्षा-शर्करा, ॲसिटोन प्रथिने (११) उदर : यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ), मूत्रपिंडवृद्धी, भित्तीचा ताठरपणा (१२) छाती : श्वसनाची गती, खोली व लय (१३) मान : ताठरपणा, ग्रीवा (मानेतील) रोहिणीतील नाडी (१४) जीभ : निर्जलीभवन, चावलेली किंवा व्रणयुक्त (१५) नाक व कान : पू किंवा रक्तस्त्राव, मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार देणारा द्रव) स्त्राव, नीलवर्णता.

(आ) चयापचयजन्य : (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये बिघाड झाल्यामुळे उद्भवणारी). (१) मूत्रविषरक्तता (रक्तात मूत्रघटक शिरल्याने उद्भवणारी विषारी अवस्था), (२) मधुमेह, (३) रक्तशर्करान्यूनता, (४) काबर्नडाय-ऑक्साइडजन्य बेहोषी, (५) यकृत विकृती, (६) श्लेष्म-घन शोफ [प्रौढ वयात उत्पन्न झालेल्या अवटू ग्रंथिस्त्रावाच्या न्यूनत्वामुळे होणारी विकृती ⟶ अवटु ग्रथि] (इ) विषजन्य : (१) अल्कोहॉल, (२) अमली अथवा निद्राकारी औषधे उदा., अफू, बार्बिच्युरेटे वगैरे (ई) इतर कारणे : (१) उष्माघात, (२) तापन्यूनता, (३) मस्तिष्कीय हिवताप, (४) मानसिक रोग उदा., ⇨उन्माद, गलितगात्र छिन्नमानस [⟶छिन्नमानस].

विकृतिविज्ञान, प्रयोगशालेय परीक्षा व विशिष्ट परीक्षा : ⇨तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या)विकृतींसंबंधीचे एकूण ज्ञानच मर्यादित स्वरुपाचे आहे. जाणीव अथवा शुद्ध यांवर परिणाम करणाऱ्या निरनिराळ्या गोष्टींची उकल करणे त्यामुळे अवघड असते. सर्वसाधारणपणे मध्यमस्तिषअक, पारमस्तिष्क आणि मस्तिष्क बाह्यक [⟶तंत्रिका तंत्र] यांमधील संबंधातील बिघाड शुद्धीसंबंधीच्या विकृतीस कारणीभूत असतो. ऑक्सिजनन्यूनता, रक्तशर्करान्यूनता, अम्लरक्तता आणि थायामीनन्यूनता [⟶बरोबरी] व इतर काही जीवसत्तावांची न्यूनता बाह्यक णि अभिवाही मस्तिष्क केंद्रातील तंत्रिका कोशिकांच्या (पेशींच्या) चयापचयात बिघाड उत्पन्न करतात. तापधिक्य (४१० से. पेक्षा जास्त) आणि तापन्यूनता (३५० से.पेक्षा कमी) कोशिका चयापचयावर अविशिष्ट परिणाम करीत असावेत. मधुमेहजन्य अम्लरक्तता, मूत्रविषरक्तता, यकृतजन्य बेशुद्धी व संसर्गजन्य रोगातील अंतर्जात विषबाधा यांमुळे कोशिकांवर प्रत्यक्ष परिणाम होत असावा. ल्कोहॉल, बर्बिच्युरेटे, ब्रोमाइडे, फिनोथायाझोने या औषधांच्या विषारी परिणामामुळे येणारी बेशुद्धी बाह्यक व पारमस्तिष्क यांतील तंत्रिका कोशिकांवरील दमनकारक प्रत्यक्ष परिणामामुळे उत्पन्न होते. अपस्माराच्या जोरदार झटक्यानंतर येणारी बेशुद्धी तंत्रिका कोशिकांची क्रियाशीलता तात्पुरती स्थगित झाल्यामुळे

आ. २. विद्युते मस्तिष्कालेख : (अ) आल्फा तरंग (आ) वीटा तरंग (इ) डेल्टा तरंग.

उद्भवते. मेंदूला होणाऱ्या आघातजन्य संक्षोभ या विकृतीत अंतर्कर्पर दाब (कवटी व मेंदू यांच्या मधल्या पोकळीतील द्रवाचा दाब) केवळ एक हजारांश सेकंदच अतिशय वाढल्यामुळे अल्पकालीन बेशुद्धी येते.परिसराची जाणीव अथवा शुद्ध यांमधील बदल मेंदूतील तंत्रिका कोशिकांमधील शरीरक्रियाविज्ञानीय बदलांचा परिणाम असतो हे विद्युत् मस्तिष्कालेखावरून [⟶विद्युत् मस्तिष्कालेख] स्पष्ट होते. शुद्धीवर असताना या आलेखाद्वारे बाह्यकातील तंत्रिका कोशिकांचा विद्युत् भार नोंदला असता मस्तिष्क तरंगाची दोन प्रकारची कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या) दिसते. का प्रकारात दर सेकंदास ८-१५ तरंग दिसतात, तर दुसऱ्या दर सेकंदास १६-२५ तरंग दिसतात. त्यांना अनुक्रमे ‘आल्फा तरंग’ आणि ‘बीटा तरंग’ अशी नावे आहेत. ते तरंग कुमारावस्थेत तायर होतात व प्रौढ वयात सर्वसाधारणपणे ल्फा तरंगांचे र्चस्व सलेल्या अवस्थेत कायम सतात. गाढ झोपेत तरंग दर सेकंदास १ १/४ ते ३ एवढे मंद होतात. बेहोषीतील कंपर्ता २ ते ३ असते व गंभीर बेशुद्धीत बुतेक सर्व विद्युत् क्रियाशीलतेचे दमन झालेले म्हणजेच समविद्युत् भारावस्था असते. अर्भकावस्था, बालवय आणि झोपेत मिळणाऱ्या तरंगाना ‘डेल्टा तरंग’ म्हणतात.प्रयोगशालेय परीक्षांकरिता रक्त, मूत्र व विशिष्ट सुईद्वारे काढलेला कमरेजवळच्या पाठीच्या मणक्यातील मस्तिष्क-मेरुद्रव यांची तपासणी करणे महत्त्वाचे असते. याशिवाय विषबाधेचा संशय असल्यास जठर नलिकेद्वारे जठरातील द्रव काढून घेऊन तपासणी करावी लागते. डोक्याची क्ष-किरण तपासणी णि ग्रीवा रोहिणीद्वारे वाहिनीदर्शन (मेंदूतील रक्तवाहिन्यांची विकृती समजण्याकरिता केली जाणारी विशिष्ट परीक्षा) शक्य तेवढ्या लवकर परंतु रोगाच्या कूण गांभीर्यावर अवलंबून असतात. उपलब्ध असल्यास ‘कॅट’ क्रमवीक्षण पद्धतीची विशिष्ट क्ष-किरण तपासणी [संगणकाच्या-गणकयंत्राच्या-साहाय्याने मेंदूच्या विविध अक्षीय छेदांच्या क्रमवार क्ष-किरण चित्रणाद्वारे करण्यात येणारी तपासणी ⟶ क्ष-किरण वैद्यक] निदानास उपयुक्त असते.

बेशुद्ध रोग्याची देखभाल व उपचार : बेशुद्ध व्यक्तीत बहुतेक सर्व प्रतिक्षेपी क्रिया मंद किंवा स्थगित झालेल्या असतात, हे लक्षात ठेवून ती शुद्धीवर येईपर्यंत श्वसनक्रिया आणि हृद्-रक्तवाहिनी तंत्राच्या क्रिया सुरळीत चालू ठेवण्याकडे लक्ष पुरविणे सुरु करावे लागतात. यामध्ये रक्तस्त्राव थांबविणे, श्वसनमार्ग मोकळा ठेवणे हृदय व फुप्फुस यांची क्रिया पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणे, अवसादावरील (तीव्र घातामुळे होणाऱ्या सार्वदेहिक प्रतिक्षोभावरील) उपचार, ऑक्सिजनाचा पुरवठा, रबरी नलिका घालून मूत्राशयातील मूत्र काढणे, निर्जलीभवन झाले असल्यास नीलेतून योग्य द्रावण देणे इत्यादींचा समावेश होतो. शारीरिक तापमान, नाडी, श्वसन-संख्या व रक्तदाब वारंवार तपासून त्यांची नोंद करणे हितावह असते. बेशुद्ध व्यक्तीस तोंडाने काहीही देऊ नये, तसेच उत्तेजक षधे टाळावीत. श्वसनमार्ग मोकळा ठेवण्याकरिता अंतःश्वासनाल नलिका प्रवेशन (तोंड आणि घसा यांमधून खाली जाऊन श्वसनालात जाणारी रबरी नळी घालणे), मुख-ग्रसनी नलिका (तोंड व घशाच्या खालच्या भागापर्यंत पोचणारी नळी) आणि जरूर पडल्यास श्वसनालभेद श्सत्रक्रिया यांचा उपयोग करावा लागतो. बेशुद्धी दीर्घकालीन असल्यास विशिष्ट अंगस्थितीत शुश्रूषा करावी लागते व त्यामुळे न्यूमोनिया (फुप्फुसाची दाहयुक्त सूज) टाळता येतो व श्वसनमार्गातील स्त्राव बाहेर पडण्यास मदत होते. बेशुद्धीचे निदान निश्चित होताच मूळ विकृतीवरील इलाज सुरु करतात. दीर्घकालीन बेशुद्धीत नकाद्वारे नलिकेतून अन्न द्यावे लागते. शेवटी निदानापरत्वे पचार योजावे लागतात.

बेशुद्ध रुग्णाच्या देखभालीत अवधानाने काही चुका होण्याची शक्यता असते. त्यांपैकी काहींचा उल्लेख खाली केला आहे.

(१)श्वसनक्रिया व हृदयक्रिया या जीवनावश्यक क्रियांकडे दुर्लक्ष होणे : योग्य निदान होईपर्यंत या क्रियांकडे सतत लक्ष पुरविणे अत्यंत जरूरीचे असते. श्वसनमार्गातील स्त्राव किंवा जठरातील प्रत्यावर्तित (उलटून लेले) द्रव पदार्थ श्वसनक्रियेत गंभीर अडथळा आणून मृत्यूस कारणीभूत होऊ शकतात. रोग्यास का कुशीवर झोपवून जीभ मागे पाडून श्वसनमार्ग बंद होणार नाही अशा प्रकारे या गोष्टी केल्यास तोंड व घशातील स्त्राव बाहेर पडण्यास मदत होते.

(२)रोग्याचा संपूर्ण इतिहास मिळविण्याकडे दुर्लक्ष होणे : रोग्याबरोबर आलेली माणसे, नातेवाईक, मित्र वगैरे सर्वांकडून सर्व माहिती मिळविणे महत्त्वाचे असते. अशा माहितीतून बेशुद्धीचे मूळ कारण निश्चित करण्यास मदत होऊ शकते.

(३)बेशुद्धीच्या कारणाबद्दल चुकीचा ग्रह करूण घेणे : उच्छ्वासाला अल्कोहॉलाचा वास येत असलेली प्रत्येक व्यक्ती मद्यातिरेकामुळेच बेशुद्ध आहे, असे समजणे ही मोठी चूक ठरण्याचा धोका असतो. याप्रमाणेच प्रत्येक वयस्कर व्यक्तीत रक्ताधाती आघात हेच बेशुद्धीचे कारण असते, अशी समजूतही गैर असू शकते.

संदर्भ :  1. Chamberlain, E. N. Ogilvie, C. Symptoms and Signs in Clinical Medicine, Bristol, 1974.

              2. Scott, B., Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978. 

              3. Thorn G. W. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Tokyo, 1977.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.