स्टॅनिस्लॅव्हस्कीस्टॅनिस्लॅव्हस्की ( कन्स्टंट्यीन सिर्गेये व्ह्यिच अल्यिक्स्येव्ह ) : (१७ जानेवारी १८६३—७ ऑगस्ट १९३८). विख्यात रशियन अभिनेता, नाट्यदिग्दर्शक व आधुनिक वास्तववादी अभिनयाला वळण देणारा प्रतिभाशाली रंगकर्मी. मॉस्को येथे एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. अल्यिक्स्येव्ह हे त्याचे घराणे. १८८५ मध्ये स्टॅनिस्लॅव्हस्की हे टोपणनाव त्याने धारण केले. त्यामागे त्याचा मूळ हेतू आपली खरी ओळख आपल्या आई-वडिलांपासून लपविणे हा होता कारण अमीरउमराव घरा-ण्यातली माणसे त्याकाळी नाटकात काम करणे अतिशय कमीपणाचे समजत असत.

अभिनय प्रशिक्षणासाठी १८८५ मध्ये स्टॅनिस्लॅव्हस्कीने मॉस्कोच्या नाट्यप्रशिक्षण शाळेत प्रवेश घेतला पण तेथे त्याचे मन रमले नाही. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या अभिनयाची नक्कल करायला शिकवीत आहेत, असे त्याचे मत झाले आणि नाउमेद होऊन तो तेथून बाहेर पडला.

मानसशास्त्रीय वास्तववादी अभिनय शैलीचे त्याला अधिक आकर्षण वाटले. ⇨ निकोलाय गोगोल आणि म्यिखइल शिफिन यांच्या नाट्यशैलीने तो प्रभावित झाला.

स्टॅनिस्लॅव्हस्कीची प्रयोगशीलता आणि नवता हा त्याच्या नाट्यकलेचा गाभा होता. आपल्या मनातील नाट्यकलेविषयीच्या सर्व कल्पना तो कागदावर मांडत असे. त्याची निरीक्षणे, टीकाटिपण्णी, परीक्षणे, रंगमंचीय अनुभव इतके महत्त्वाचे होते की, ते पुढे ‘ स्टॅनिस्लॅव्हस्कीची रंगमंचीय पद्धती ’ म्हणून आकाराला आले. अल्यिक्स्येव्ह घराण्याचा व्यवसाय हा सैन्याच्या गणवेशात सोन्या-चांदीच्या तारांनी विणलेल्या फिती तयार करण्याचा होता. स्टॅनिस्लॅव्हस्कीने विद्यापीठात शिक्षण न घेता आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे चालू ठेवला. यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा काही भाग त्याने नाट्यकलेसाठी वापरला. मॉस्को येथील ‘ रेड गेट्स ’ या भव्य वास्तूत त्याचे वास्तव्य होते. पुढे त्याने तेथेच एक रंगमंदिर उभारले.

वास्तववादी अभिनयशैली असलेला स्टॅनिस्लॅव्हस्की आपल्या भूमिकेशी एकरूप होत असे. एखाद्या बहुरूप्यासारखा कधी तो कुडमुड्या ज्योतिषी, तर कधी दारूडा माणूस ! अशी वेगवेगळी रूपे धारण करून तो भटकंती करत असे. त्याच्या सोबत काम करणार्‍या नाट्यकलावंतांकडूनही तो असे प्रयोग करून घेई. मॉस्कोमधील रशियन साम्यवादाचे नेते आणि व्हेरा कॉमिसारझेवस्काया या ख्यातनाम अभिनेत्रीचे वडील पर्‍योदारे पेट्रोव्ह्यिच यांच्याकडून स्टॅनिस्लॅव्हस्कीने ध्वनी व आवाज यांचे आणि व्हेरा कॉमिसारझेवस्काया हिच्याकडून स्वर आणि शरीर यांच्या सुसंवादाचे प्रशिक्षण घेतले. या लयबद्ध शिक्षणपद्धतीचा उपयोग त्याने आपल्या ऑपेरांमध्ये केला.

अभिनेते घडविण्यात स्टॅनिस्लॅव्हस्कीचा मोठा वाटा आहे. माय लाइफ इन आर्ट (१९२४) — आत्मचरित्र ॲन ॲक्टर प्रिपेअर्स (१९२६) स्टॅनिस्लॅव्हस्की रिहर्सिस ऑथेल्लो (१९४८) आणि बिल्डिंग अ कॅरॅक्टर (१९५०) हे त्याचे मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ असून ते कलाकारांसाठी अतिशय उपयुक्त ठरले आहेत. अभ्यासू आणि प्रगतिपथावरील कलावंत स्टॅनिस्लॅव्हस्कीच्या नाट्यशैलीचा आदर करतात. ॲन ॲक्टर्स वर्क ऑन रोल (१९३८) या त्याच्या नाटकात त्याच्याबरोबर कॉमिसा-रझेवस्कायाने काम केले आहे. त्याचा विवाह लिलिना या त्याच्याबरोबर रंगभूमीवर काम करणार्‍या कलावतीबरोबर झाला (१८८८). स्टॅनिस्लॅव्हस्कीने ‘ द सोसायटी ऑफ आर्ट अँड लिटरेचर ’ ही संस्था स्थापन केली (१८८९). यात नवोदित आणि व्यावसायिक असे दोन्ही रंगकर्मी त्याने एकत्र आणले. या कामी त्याला त्याचा नाट्यकलावंत मित्र नेमेरो व्हिच दान चेन्को हा मदत करीत असे. त्यांनी स्थापन केलेली अभिनयप्रशिक्षणावर भर देणारी त्यांची ‘मॉस्को आर्ट थिएटर’ (१८९८) ही संस्था म्हणजे निष्ठा, मेहनत, शिस्त, नवता, अभ्यासू वृत्ती यांचे अधिष्ठान होती. चेकॉव्ह, गॉर्की, मोल्येर, पुश्किन इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाट्यकृती त्यांनी रंगमंचावर आणल्या. ‘मॉस्को आर्ट थिएटर’ ने सादर केलेल्या कलाकृतींपैकी काही उल्लेखनीय कलाकृती पुढीलप्रमाणे : शेक्सपिअरचे मर्चंट ऑफ व्हेनिस, सॉफोक्लीझचे अँटिगनी इत्यादी. वास्तववादी शैलीतील अभिनयाने नटलेल्या या नाटकांच्या प्रदीर्घ तालमी तेथे होत असत. ८० तासांची तालीम हा उच्चांकही स्टॅनिस्लॅव्हस्कीने गाठला. ‘ अभिनय हा स्वयंप्रज्ञ, आत्म्याशी प्रतारणा न करणारा असावा ’, असे त्याला वाटत असे. साजशृंगार, वेशभूषा इत्यादींपेक्षा अभिनयातील सच्चेपणाला तो महत्त्व देत असे.

स्टॅनिस्लॅव्हस्कीला अनेक मानसन्मान मिळाले. त्यांतील महत्त्वाचे पुढीलप्रमाणे : ‘ पीपल्स आर्टिस्ट ऑफ दि यूएस्एस्आर ’ (१९३६), ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ (१९३७), ‘ऑर्डर ऑफ द रेड बॅनर ऑफ लेबर’ (१९३८).

मॉस्को येथे त्याचे निधन झाले.

वाड, निशिगंधा