मॉगाडिशू : आफ्रिकेतील सोमाली प्रजासत्ताकाची राजधानी, प्रमुख बंदर व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ४,००,००० (१९८१ अंदाज) हे हिंदी महासागर किनाऱ्यावर वसलेले आहे. केन्या, इथिओपिया, ह्या देशांशी हे रस्त्यांनी जोडले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्व आफ्रिकेच्या सागरकिनाऱ्यावरील हे एक महत्त्वाचे बंदर म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.

सुमारे दहाव्या शतकारंभी अरब वसाहतकार येथे आले. सोळाव्या शतकात त्यावर पोर्तुगीचांचा अंमल होता. १८७१ मध्ये हे झांझिबारच्या सुलतानाच्या आधिपत्याखाली आले. १८९२ मध्ये ते इटलीस खंडाने देण्यात आले. १९०५ साली इटलीने ते विकत घेतले व तेथे इटालियन सोमालीलँडची राजधानी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने यावर अंमल प्रस्थापित केला होता.

स्वातंत्र्योत्तर काळात येथील बंदर सुविधांमध्ये वाढ झालेली आहे. येथून केळी, कातडी, डिंक इत्यादींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. येथे मासेमारी, दूधप्रक्रिया, कापड, साखर शुद्धीकरण, थंड पेये इ. व्यवसाय भरभराटलेले आहेत.

येथील युनिव्हर्सिटी इन्स्टियूट ऑफ सोमालिया (१९५४) उल्लेखनीय आहे. येथील फक्र-अद-दिनची मशीद (१२६९), गॅरेसा राजवाडा (एकोणिसावे शतक), संसदभवन इ. नव्या जुन्या वास्तू प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.