नंदी—१ : शिवगणांपैकी एक आणि शंकराचा प्रमुख द्वारपाल. नंदीश, नंदीश्वर, नंदिकेश्वर अशीही याची नावे आहेत. शिवसहस्रनामांमध्ये हे एक शिवाचे नाव आहे. शिवपुराणाच्या शतरुद्रखंडात (अध्याय २२) शिवाचे अवतार वर्णिले आहेत. त्यात शिलादमुनीस शिवकृपेने झालेला हा पुत्र असल्याचे म्हटले आहे. विष्णुपुत्रांचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाचे रूप धारण केल्याचेही तेथे म्हटले आहे. महाभारत व पुराणे यांत नंदिकेश्वरासंबंधी कथा आढळतात. रामायणात (उत्तरकांड, सर्ग १६) तो कुरूप, बुटका आणि वानरमुखी असल्याचे म्हटले आहे.
दक्षिण भारतातील शिवालयांमध्ये प्रवेशद्वारी नंदीची चतुर्भुज मूर्ती असते. विष्णुधर्मोत्तरपुराण, हेमाद्रीचा चतुर्वर्गचिंतामणि (व्रतखंड),
अभिलषितार्थ चिंतामणि वगैरे ग्रंथांत नंदिकेश्वराचे मूर्तिध्यान चतुर्भुज, त्रिनेत्र, तांबूस वर्णाचा आणि त्रिशूल व गोफण धारण केलेला, असे वर्णिले आहे. दक्षयज्ञाचा संहार करण्यासाठी शंकराने आपल्या जटेतून वीरभद्र निर्माण केला, त्याचे वाहन बैल हे आहे (अग्निपुराण ५२.१४). वीरशैव (लिंगायत) संप्रदायाच्या प्राचीन इतिहासात वीरभद्राला महत्त्वाचे स्थान आहे. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी या संप्रदायाचा पुनरुद्धार केला. हे बसवेश्वर नंदिकेश्वराचा अवतार असल्याचे म्हटले आहे.
शिवालयांमध्ये शंकराच्या पिंडीपुढे नंदी (बैल) असतो. वीरशैव संप्रदायातही त्याचे फार महत्त्व आहे. शंकर आणि त्याचे गण यांच्याशी बैलाचा संबंध फार प्राचीन काळापासून जोडला गेल्यामुळे, नंदी किंवा नंदिकेश्वर म्हणजे बैल असे समीकरण झाले असावे.
काशीकर, चिं. ग.
नंदीच्या मूर्ती : बहुतेक सर्व शिवमंदिरांत मंडपाच्या मधोमध अथवा स्वतंत्र नंदी-मंडपात शिववाहन नंदीच्या मूर्ती बसविलेल्या असतात. दक्षिण भारतात गोपुरांवर किंवा प्राकारांवर अशा मूर्ती ओळीने बसविण्यात येत. बहुतेक ठिकाणी नंदीची मूर्ती पूर्णाकार किंवा क्वचित त्याहूनही मोठी घडविलेली असते. स्थलकालपरत्वे अथवा रुचिभिन्नत्वाने काही तपशिलांचे भेद दिसत असले, तरी सामान्यपणे बसलेल्या नंदीच्याच मूर्ती घडविलेल्या दिसतात. त्याची शिंगे आखूड व टोकादार असून वशिंड खूपच मोठे असते. पुढचा एक पाय अंगाखाली मुडपलेला असला, तरी दुसरा उचलून किंचित पुढे टाकलेला असतो. त्यामुळे हा वृषभ आता उठून उभा राहील असे वाटते. डोके थोडे एका बाजूला कललेले असते पण दृष्टी मात्र गाभाऱ्यातील पिंडीकडे लावलेली असते. गळ्यात व पाठीवर घुंगरांच्या आणि घंटांच्या माळा, साखळ्या, पायात घुंगरांचे चाळ अशा अनेक अलंकारांनी नंदीमूर्ती नटविलेली असते. या साऱ्या अलंकरणापेक्षा बघणारावर जर कशाची छाप पडत असेल, तर ती त्याच्या भरदार शरीरयष्टीची. सासवडच्या संगमेश्वर आणि वटेश्वर मंदिरांतील नंदीमूर्ती या मराठी प्रदेशातील अत्यंत उल्लेखनीय होत.
माटे, म. श्री.
“