कार्पेट साप : ऑस्ट्रेलियातील अजगराच्या एका प्रकाराला हे नाव दिले आहे. पायथॉन स्पायलोटीझ  या ऑस्ट्रेलियन अजगराची प्रस्तुत साप ही एक उपजाती आहे असे मानण्यात येते. कार्पेट म्हणजे गालिचा. गालिच्यावर ज्याप्रमाणे चित्रविचित्र वेलबुट्टी किंवा आकृती असतात त्याचप्रमाणे याच्या शरीराचा पृष्ठीय भाग रंगांच्या चित्रविचित्र आकृत्यांनी भूषविलेला असल्यामुळे या अजगराला ‘कार्पेट साप’ म्हणतात.

पूर्ण वाढ झालेल्या कार्पेट सापाची लांबी सु.२–३·५ मी. असते. याच्या शरीरावरील आकृत्यांमुळे हा फार सुंदर दिसतो. या आकृत्यांत व्यक्तिगत विविधता आढळून येते. प्रारूपिक (प्रातिनिधिक) नमुन्यांचा रंग वरच्या बाजूला काळा असतो आणि त्यावर पिवळे ठिपके असतात. हे ठिपके कमी अधिक प्रमाणात ओळीने असतात. प्रत्येक शल्कावर (खवल्यावर) एक पिवळसर टिंब असते. खालच्या (पोटाकडच्या किंवा अधर) बाजूचा रंग पिवळा असतो. ऑस्ट्रेलियात, उत्तरेकडील रेताड प्रदेश वगळून, तो सगळीकडे मुबलक आढळतो. ज्या ठिकाणी पाणी असेल अशा उघड्या कड्यांवर, पाणथळीच्या आणि खाजणांच्या काठांवर तो राहतो. तो आपला बराच वेळ झाडांवरही घालवितो. लहान सस्तन प्राणी आणि पक्षी हे याचे भक्ष्य होय. सु.३ मी. लांबीच्या एका बंदिस्त कार्पेट सापाने खूप मोठे वटवाघूळ सहज गिळल्याची नोंद केलेली आढळते.  

कर्वे ज.नी.