गळसुटे: गिलायूच्याभोवती (टॉन्सिलच्याभोवती) झालेल्या विद्रधीला (पूयुक्त फोडाला) गळसुटे असे म्हणतात. गिलायु-गुहिकांतील (गिलायुतील खोलगट भागांतील) जंतुसंसर्गाने गिलायूच्या बाहेरच्या तंतुमय आवरणाचा भेद होऊन गिलायूभोवतीच्या अवकाशी ऊतकांत (एकमेकांत गुंतलेल्या तंतूंच्या संयोजी ऊतकांत, ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) पू तयार होतो व त्याला वाट न मिळाल्यामुळे गिलायु-अधिगुहेत (गिलायूच्या वरच्या भागातील खाचेत) असा विद्रधी होतो.

गिलायुशोथ (गिलायूची दाहयुक्त सूज, टॉन्सिलीटीज) वारंवार झाला, तर गिलायु-गुहिकांची तोंडे आकसल्यामुळे आतील पू गिलायूभोवती जमतो. तीव्र गिलायुशोथासाठी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे योग्य काळापर्यंत न घेतल्यास जंतुसंसर्गाच्या बीमोड न झाल्यामुळेही गळसुटे होऊ शकते.

या विकारात घसा सुजल्वयामुळे गिळणे अशक्य होतो. कान, मान व घशात तीव्र ठणका मारणे, थंडी भरून ताप येणे, मानेतील गाठी सुजून मान सुजणे, तोंड उघडणे अशक्य होणे वगैरे लक्षणे दिसतात.

मृदुतालू फुगून लाल झालेली असून पडजिभेला शोफ (द्रवयुक्त सूज) येऊन ती जाड होऊन गिलायूला चिकटल्यासारखी दिसते.

प्रतिजैव औषधे दोन-तीन दिवस देऊन विद्रधी तयार झाल्याबरोबर विशिष्ट पद्धतीने तो फोडावा लागतो. त्याचा पूर्ण निचरा झाला म्हणजे रोग बरा होतो. एक-दीड महिन्यानंतर गिलायू काढून टाकणे इष्ट ठरते.

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा: गिलायूच्या वरच्या बाजूस गळू होते. ते कच्चे असताना बाहेरून दशांगलेप लावावा. हिरडा, कायफळ, ज्येष्ठमध, बेहडी, पुनर्नवा ह्यांचे चूर्ण चाटवावे आणि रेचक द्यावे. गळवाच्या सुमाराला गळ्याला एकदोन जळवा लावाव्यात. एवढ्याने ते शमले नाही, तर बाह्य विद्रधीची चिकित्सा करावी. खान-पान ह्याच्यात शेवग्याच्या शेंगांचा उपयोग करावा.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री