बेर्नीनी, जोव्हान्नी लोरेंत्सा : (७ डिसेंबर १५९८- २८ नोव्हेंबर १६८०). प्रख्यात इटालियन वास्तुशिल्पज्ञ. नेपल्स येथे जन्म. तो इटालियन⇨बरोक कलाशैलीचा प्रमुख प्रवर्तक मानला जातो. त्याचे वडील प्येअत्रो बेर्नींनी (१५६२-१६२९) हेही नामवंत चित्रकार व शिल्पकार होते. कलेचे प्राथमिक धडे त्याने त्यांच्याकडूनच घेतले. वास्तू, शिल्प, चित्र, नाट्य, काव्य अशा विविध कलांमध्ये त्याला गती होती. रोममध्येच त्याने महत्त्वाची वास्तु-शिल्प निर्मिती केली. सुरुवातीच्या काळातील डेव्हिड (१६२३), द रेप ऑफ प्रॉसरपिना (१६२१-२२), अपोला ॲन्ड डॅफ्नी (१६२२-२४) इ. शिल्पाकृती त्याने शीप्योने कार्डिनल बोरगेसे य आश्रयदात्यासाठी निर्माण केल्या. त्यातून तत्कालीन रीतिलाघववादाचे संकेत त्याने बाजूला सारल्याचे दिसते. १६२९ मध्ये रोममधील ‘सेंट पीटर्स बॅसिलिके’ चा प्रमुख वास्तुविशारद म्हणून त्याची नियुक्ती झाली. पोपच्या वेदीवरील अलंकृत छत्र (बाल्दाकिन), ‘ॲप्स’ भागातील सेंट पीटरचे सिंहासन आणि चर्चच्या समोरच्या भागातील प्रशस्त दीर्घ गोलाकर चौकाच्या सभोवती उभारलेली भव्य व शोभिवंत स्तंभावली हे त्याचे सेंट पीटर्समधील कार्य संस्मरणीय ठरले. पोप आठवा अर्बन व पोप सातवा अलेक्झांडर यांच्या सेंट पीटर्समधील थडग्यांची रचना ही त्याची उत्तरकालीन भव्य निर्मिती होय. व्हॅटिकनसाठी त्याने शाही जिन्यांची (स्काला रेजिया) रचना केली व कॉन्स्टंटीनचा वीरश्रीयुक्त अश्वारूढ पुतळा घडवला. अनेक तत्कालीन श्रेष्ठ व्यक्तींचे उत्कृष्ट अर्धपुतळे त्याने घडवले त्यांत पोप पाचवा पॉल, पोप पंधरावा ग्रेगरी, पोप आठवा अर्बन, कार्डिनल बोरगेसे, चौदावा लूई आदींचा समावेश होतो. रोममध्ये त्याने अनेक सुंदर कारंजांची रचना केली. त्यांत ट्राय्‌टन फाउंटन (१६३२-३७) व फाउंटन ऑफ द फोर रिव्हर्स (१६४८-५१) ही विशेष प्रसिद्ध आहेत. १६५८ ते १६७० या काळात त्याने तीन प्रमुख चर्चवास्तूंसाठी अभिकल्प तयार केले: कास्तेल गांदॉल्फो येथील ‘सान तोग्मासो दा व्हिलानोव्हा’, आरिसिया येथील ‘सांता मारिया देल्ल आस्सुनझिऑने’ आणि रोममधील ‘सांत आंद्रेआ अल् क्विरिनेल’. १६६५ मध्ये फ्रान्सच्या चौदाव्या लूईच्या निमंत्रणावरून तो पॅरिसला लूव्ह्‌रचा वास्तुकल्प पूर्ण करण्यासाठी गेला पण त्याच्या आराखड्यांना मान्यता न मिळाल्याने तो रोमला परतला व अखेरपर्यंत तेथेच राहिला. रोम येथेच त्याचे निधन झाले.

‘अपोलो अँड डॅफ्नी’ : बेर्नीनीची एक विख्यात शिल्पाकृती.

बेर्नींनी हा अष्टपैलू प्रतिमेचा बहुप्रसन्न कलावंत होता. त्याने आपल्या कारकीर्दीमध्ये चर्च व चॅपेल वास्तू, कारंजी, स्मारके, थडगी, पुतळे अशा अनेक प्रकारांमध्ये विपुल निर्मिती केली. त्याने काही काळ एकाच वेळी शंभरांहून अधिक प्रकल्पांवर काम केले. त्याच्या हाताखाली शेकडो कारागीर व शिल्पज्ञ राबत होते. त्याची अफाट निर्माणशक्ती सहजगत्या कोणत्याही कलामाध्यमामध्ये रममाण होत असे. त्याने २०० वर चित्रे व शेकडो उत्कृष्ट रेखाटने केली. त्याने काढलेले स्वतःचे चित्र (सु. १६२५) त्याच्या उत्कृष्ट रेखनकौशल्याचे एक उदाहरण आहे. वास्तु-शिल्प-चित्र या त्रिविध कलाविष्कारांचा एकात्म व सुरेख मेळ साधण्याचे अपूर्व सामर्थ्य त्याच्या ठायी होते. रोममधील ‘सांता मारिया देल्ला व्हित्तोरिया’ मधील द एक्स्‌टसी ऑफ सेंट तेरेसा (१६४५-५२ पहा:चित्रपत्र ४७) या शिल्पातून त्याचा प्रत्यय येतो. पांढरे व रंगीत संगमरवर तसेच ब्राँझ व चुनेगच्ची माध्यमांचे कौशल्यपूर्ण मिश्रणही त्यात दिसून येते. विषयातील नाट्य नेमकेपणाने हेरून ते अत्यंत परिणामकारक रीतीने व्यक्त करण्याचे त्याचे कसबही ह्या तसेच अपोलो ॲन्ड डॅफ्नीसारख्या शिल्पांतून दिसते. जड संगमरवराचे, जणू त्यातून श्वासोच्छ्वासाचा भास व्हावा इतक्या सजीव, चैतन्यपूर्ण मूर्तींमध्ये त्याने रूपांतर केले. त्याने काही सुखात्मिका लिहिल्या. तसेच काही विडंबन-चित्रेही काढली. रंगभूमीवरही त्याने वेशभूषा, रंगमंचाच्या तांत्रिक क्लृप्त्या तसेच अन्य नाट्यप्रयोगसंबद्ध बाबी इ. प्रकारांमध्ये नेत्रदीपक कार्य केले. त्याच्या प्रमुख वास्तू व शिल्पे रोममध्येच असली, तरी त्याच्या कलेचा प्रभाव जवळजवळ दोन शतके सबंध यूरोपभर जाणवत होता.

पहा : इटलीतील कला.

संदर्भ :      1. Baldinucci, Filippo Trans, Enggass, Cotherine, The Life of Bernini, Ontario, 1965.

            2. Wittkower, Rudolf, Gian Lorenzo Berninl : The Sculptor of the Roman Baroque, London, 1955.

पेठे, प्रकाश इनामदार, श्री. दे.