वनस्पति−१ : रासायनिक प्रक्रियेने थिजविलेल्या वनस्पतिजन्य तेलांना ‘वनस्पती’ असे म्हणतात.

तेले व त्यांचे वनस्पतिसंबंधित गुणधर्म : द्रव्य स्निग्ध पदार्थांना तेल म्हणतात. तेले तीन प्रकारची आहेत : (१) वनस्पतिजन्य व प्राणीजन्य तेले. उदा., तिळाचे तेल, तूप, चरबी इ. (२) खनिज तेले. उदा., केरोसीन अथवा घासलेट, पेट्रोल (गॅसोलीन) इ. (३) सुगंधी वनस्पतीपासून काढलेली तेले. उदा., चंदन तेल, अत्तर इ. [⟶ बाष्पीनशील तेले]. प्रस्तुत नोंदीत पहिल्या प्रकारच्या तेलांसंबंधीची माहिती दिलेली आहे. वनस्पतिजन्य तेले तेलबिया घाण्यात दाबून काढली जातात. प्राणिजन्य तेलांपैकी चरबी प्राण्यांच्या शरीरापासून काढतात व तूप दूधापासून मिळते. चरबी किंवा तूप ही घट्ट वा दाणेदार (द्रव व घट्ट कणमिश्रित) असतात. खाद्य वनस्पतिजन्य तेले प्रामुख्याने द्रव असतात पण खोबरेल थंड हवेत घट्ट होते. कोकम तेल तुपासारखे घट्ट असते व अखाद्य वनस्पतिजन्य तेलांत मोहाचे तेल दाणेदार असते.

रासायनिक दृष्ट्या ही तेले ⇨वसाम्ले व ग्लिसरीन यांच्या संयोगाने बनलेल्या ग्लिसराइडांची मिश्रणे होत. नैसर्गिक वसाम्ले कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांची बनलेली असतात व त्यांच्या रेणूतील अणूंचे प्रमाण CnH2nO2 असे असते. कार्बन अणू सम संख्येतच आढळतात व सर्वसाधारण तेलांत ही संख्या ४ ते २२ पर्यंत असते, तरी प्रामुख्याने C12 ते C18 अणू असलेली वसाम्ले जास्त प्रमाणात आढळतात. तुपात मात्र C4 ते C18 व खोबरेल तेलात C8 ते C18 कार्बन अणू असलेली वसाम्ले असतात. वर जे वसाम्ल रेणूतील C, H व O या अणूंचे प्रमाण दिले आहे ते तृप्त रेणूचे (म्हणजे ज्यांना हायड्रोजन अणू वा त्यांचे समतुल्य अणू जोडता येत नाहीत म्हणजेच ज्यांत द्विबंध व त्रिबंध नसतात अशा रेणूंचे) आहे. त्याशिवाय अतृप्त रेणूही बऱ्याच प्रमाणात असतात. तीच कार्बन अणूची संख्या असलेल्या तृप्त रेणूपेक्षा अतृप्त रेणूचे वितळबिंदू (वितळण्याचे तापमान) कमी असतात, तसेच तृप्त रेणूंच्या वसाम्लात कमी कार्बन अणू संख्या असलेले रेणू पातळ वा कमी वितळबिंदूचे असतात. उदा., C18 H36O2 ह्या तृप्त रेणूला स्टिअरिक अम्ल म्हणतात व ते घट्ट असून त्याचा वितळबिंदू ६९° से. आहे, तर C18H34O2 ह्या अतृप्त रेणूचे ओलेइक अम्ल पातळ आहे व त्याचा वितलबिंदू १४° से. आहे. केवळ दोन हायड्रोजन अणू कमी झाल्याने गुणधर्मात इतका फरक पडल्याचे दिसून येते. तृप्त रेणूंत C10 पर्यंतची अम्ले पातळ व त्यावरची घट्ट आहे. अतृप्त रेणूंत अतृप्ततेचे प्रमाण त्या रेणूतील अतृप्त बंधांच्या (द्विबंधांच्या वा त्रिबंधाच्या) संख्येवर अवलंबून असते. ही अतृप्तता आयोडीन मूल्याद्वारे (१०० ग्रॅ. वसोबरोबर वा तेलाबरोबर किती ग्रॅम आयोडिन संयोग पावते त्या अंकाद्वारे) मोजता येत. उदा., ओलेइक अम्लात एक अतृप्त बंध असतो व त्याचे आयोडिन मूल्य सु. ९० आहे, तर तितकेच कार्बन अणू असलेल्या पण दोन अतृप्त बंध असलेल्या लिनोलीइक अम्लाचे (C18H32O2) आयोडीन मूल्य सु. १८० आहे. बहुतेक वनस्पतिजन्य तेलांत ओलेइक अम्ल आढळते. त्याला जर दोन हायड्रोडन अणू हायड्रोजन अमू जोडता आले, तर ते घट्ट स्टिअरिल अम्ल बनेल व पातळ तेल घट्ट करता येईल. ह्याच प्रक्रियेला ⇨हायड्रोजनीकरण किंवा तृप्तीकरण म्हणता येईल.

तेलांतील ह्या भिन्न रेणुभारांच्या वसाम्लांच्या प्रमाणांवर त्यांचे गुणधर्म अवलंबून असतात. पैकी भुईमुगाचे किंवा शेंगदाण्याचे तेल वा गोडेतेल भारतात सर्व खाद्य तेलांत सर्वांत जास्त प्रमाणात वापरले जाते कारण भुईमुगाचे उत्पादन सर्व तेलबियांत जास्त असल्यामुळे ते तेल मुबलक मिळते. प्राणिजन्य तेलांत तूप हे लोकप्रिय, स्वादिष्ट व पोषक असले, तरी त्याचे उत्पादन फारच मर्यादित आहे व त्यांमुळे ते शेंगदाण्याच्या तेलापेक्षा खूप महाग असते.

द्रव तेले थिजलेल्या तेलापेक्षा व तुपापेक्षा कमी दिवस टिकतात, कारण त्यांतील अतृप्त वसाम्लांवर हवेतील ऑक्सिजनाचा परिणाम होऊन त्यांचा स्वाद बिघडत जातो आणि काही दिवसांनंतर तेल खवट होते व वापरण्या योग्य नसते. जर ही द्रव तेले हायड्रोजनीकरण प्रक्रियेने काही प्रमाणांत थिजविता आली, तर ती जास्त दिवसंपर्यंत टिकू शकतील आणि ती तुपांसारखी दाणेदार बनविता आली, तर शुद्ध तुपाचा स्वस्त पर्याय म्हणून सर्वसाधारण लोकांत प्रियही होऊ शकतील. ह्या दृष्टीने संशोधन करून द्रव तेलांचे रूपांतर मोठ्या प्रमाणात करण्यात यश आल्यावर त्यापासून कृत्रिम लोणी अथवा ⇨मार्गारीन प्रथम पाश्चात्त्य देशांत बनविण्यात आले व ते फार लोकप्रिय झाले. ह्याच प्रमाणे शेंगदाण्याचे तेल तुपासारखे दाणेदार बनविण्यातही यश मिळाल्यावर ते भारतात पाठवून लोकप्रिय करण्याचे प्रयत्न पहिल्या महायुद्धानंतर करण्यात आले. त्याला प्रथम वनस्पती तूप म्हणण्याचा प्रघात पडला व नंतर ते वस्पती ह्याच नावाने प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे हायड्रोजनीकरण प्रक्रिया वनस्पती बनविण्यात फार महत्त्वाची ठरलेली आहे.

हायड्रोजनीकरण : वनस्पती उत्पादनाखेरीज हायड्रोजनीकरण ही प्रक्रिया अनेक औद्योगिक क्षेत्रांत (उदा., मिथिल अल्कोहॉलचे संश्लेषण, द्रव इंधने, फिनॉलापासून सायक्लोहेक्झॅनॉल बनविणे वगैरे) वापरण्यात येते. येथे वनस्पती उत्पादनाच्या संदर्भातच या प्रक्रियेची माहिती दिलेली आहे. या प्रक्रियेची सर्वसाधारण माहिती ‘हायड्रोजनीकरण’ या नोंदीत दिलेली आहे. वनस्पती बनविण्याकरिता प्रथम द्रव खाद्य तेलाला अंशतः हायड्रोजनीकरण करून थिजविणे आवश्यक आहे आणि त्याकरिता मुख्यतः तीन गोष्टींची आवश्यकता असते : (१) शुद्ध केलेले शेंगदाण्याचे तेल, (२) शुद्ध हायड्रोजन वायू व (३) उतप्रेरक (रासायनिक विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ). हायड्रोजनीकरणाकरिता प्रारंभी फक्त शेंगदाण्याचे तेल वापरीत असत पण जसजसा वनस्पती उद्योग वाढत गेला आणि इतर व्यवसायांत व खाण्याकरिताही त्याचा खप वाढत गेला तसतसा त्याचा तुटवडा पडू लागला, त्यामुळे मग वनस्पतिजन्य खाद्य द्रव तेलांचा उपयोग करण्याचे प्रयत्न केले गेले. आता शेंगदाण्याच्या तेलाबरोबरच सरकी, तीळ, करडई, कारळे, भाताचा कोंडा, मका, मोह, सोयाबीन, पाम, सूर्यफूल इत्यादींच्या खाद्य तेलांचा वनस्पती तयार करण्यासाठी उपयोग करता येतो. तेलबियांतून काढलेल्या तेलांत अल्प प्रमाणात मुक्त वसाम्ले असतात. ती उत्प्रेरकाला दूषित करतात व त्यामुळे हायड्रोजन तेलातील वसाम्ल रेणूतील अतृप्त बंधात शिरून त्यांना तृप्त करू शकत नाही. म्हणून तेलांतून ही मूक्त वसाम्ले काढणे आवश्यक असते. ह्याकरिता तेल दाहक (कॉस्टिक) सोड्याच्या विद्रावाने धुतात, त्यामुळे वसम्लांचे साबाणांत रूपांतर होते व ते पाण्यात विरघळून तेलापासून विलग करण्यात येतात. ह्या प्रक्रियेला अम्ल निरास म्हणता येईल. तेलातील पाण्याचा अंश काढून टाकल्यावर हायड्रोजनीकरणाच्या प्रक्रियेकरिता ते योग्य होते. थिजविलेले तेल बनविण्याचा मुख्य उद्देश त्यापासून वस्पती बनविणे हा आहे व ते स्वादाला व रंगाला चांगले असावे म्हणून तेलातील मूळ रंग कमी करणे प्राप्त असते. त्याचप्रमाणे तेलाचा मूळ स्वाद वा वास तसेच प्रक्रियेत प्राप्त झालेला वास किंवा स्वाद हेही काढणे आवश्यक असते. अम्लनिरास केलेले शुद्ध तेल रंग काढण्याकरिता विरंजन पात्रात घेऊन तापवितात व त्यात योग्य प्रमाणात विशिष्ट विरंजक मृत्तिका किंवा कोळसा चूर्ण निर्वांत अवस्थेत योग्य वेळापर्यंत मिसळतात. नंतर तापमान कमी करून हे तेल व विरंजकाचे मिश्रण मृत्तिका वा कोळसा चूर्ण विलग करण्याकरिता दाब गाळणीमधून काढतात. ह्याप्रमाणे विरंजित केलेले तेल हायड्रोजनीकरणाकरिता वापरतात.


हायड्रोजनीकरणासाठी किमान ९९% शुद्ध हायड्रोजन वायू मुबलक प्रमाणात लागतो. तो प्रामुख्याने पाण्याच्या विद्युत् विच्छेदन प्रक्रियेने बनविला जातो. याकरिता दाहक सोड्याच्या ऊर्ध्वपातित पाण्यातील (तापवून वाफ करून व मग थंड करून मिळविलेल्या पाण्यातील) विद्राव विशिष्ट प्रकारच्या पात्रात भरून त्यामधून एकदिश विद्युत् प्रवाह सोडतात.

तेलातील अतृप्त वसाम्लांना हायड्रोजन वायूचे अणू संलग्न करण्यासाठी उत्प्रेरकाची आवश्यकता असते. ह्या प्रक्रियेकरिता प्रामुख्याने निकेल उत्प्रेरक वापरतात. तो निकेल फॉर्मेट या निकेल संयुगापासून विशिष्ट प्रक्रियेने बनविला जातो अथवा तयार उत्प्रेरक घेऊन वापरतात. तेल व हायड्रोजन यांच्या शुद्धतेवर तसेच उत्प्रेरकाच्या उत्प्रेरणक्षमतेवर त्याचे तेलातील प्रमाण ठरवावे लागते. 

ह्याप्रमाणे शुद्धीकृत व विरंजित तेल हायड्रोजनीकरण पात्रात घेतात. त्यात आवश्यक प्रमाणात उत्प्रेरक मिसळतात व हायड्रोजन वायू ह्या मिश्रणात सोडतात. उत्प्रेरकाचे कण, हायड्रोजन वायू व तेल साधारण तापमानात एकमेकांत न विरघळणारी द्रव्ये आहेत. याकरिता त्यांचे मिश्रण चांगले व्हावे म्हणून हायड्रोजनीकरण पात्रात ढवळणी बसविलेली असते. हे मिश्रण बंद वाफेने तापविले जाते व त्याचे तापमान सु. १८०° से. ठेवावे लागते. ह्या तापमानावर हायड्रोजन तेलात शोषला जातो. जसजसे हायड्रोजनीकरण होत जाते तसतसा तेलाचा वितळबिंदू वाढत जातो व ठराविक वितळबिंदूचे तृप्त तेल झाले म्हणजे हायड्रोजन वायू सोडणे बंद करतात. बंद बाष्प नलिकेतून येणारी वाफ बंद करून त्याऐवजी पाणी सोडतात व तेल सु. ८०° से. पर्यंत थंड करतात. प्रक्रिया चालू असतानाच पात्रातून तेलाचा नमुना काढून घेऊन त्याचा वितळबिंदू मोजावा लागतो. नंतर थिजविलेल्या तेलातील उत्प्रेरक कण विलग करण्याकरिता मिश्रण दाब-गाळणी मधून काढतात व गाळलेले तेल टाक्यात साठवून ठेवतात.

हायड्रोजन वायू फारच ज्वालाग्राही व स्फोटक असल्याने वरील प्रक्रियेत फार काळजी घ्यावी लागते. हायड्रोजनीकरण प्रक्रिया चालू असताना जसा तेलाचा वितळबिंदू वाढत जातो, तसेच त्याचे आयोडीन मूल्य कमी होत जाते. उदा., शेंगदाण्याच्या तेलाचे आयोडीन मूल्य सु. ९० असते व वितळबिंदू सु. ०° से. असतो. वितळबिंदू ३७° सें. झाल्यावर त्याचे आयोडीन मूल्य सु. ६५ पर्यंत कमी होते व त्यावरून तेलात किती हायड्रोजन शोषला गेला हे काढता येते. वनस्पती बनविण्याकरिता ३७° से.पर्यंत वितळबिंदू ठेवतात साबण किंवा वंगण बनविण्याकरिता वितळबिंदू ४०°−४५° सें. पर्यंत नेतात. ह्या प्रक्रियेत मुक्त अम्लता थोडी वाढते व अती उष्ण तापमानामुळे इतर वैगुण्येही तेलात उद्भवतात. ह्याशिवाय उत्प्रेरकाचे अतिसूक्ष्म कणही राहण्याची शक्यता असते म्हणून वनस्पती बनविण्याकरिता तृप्त केलेले तेल परत शुद्ध करावे लागते. ह्याकरिता कच्चे तेल जसे दाहक सोड्याच्या विद्रावाने धुवून शुद्धीकृत व पुढे विरंजित केले जाते तसेच परत करावे लागते तरी पण ह्या तेलाला अप्रिय वास व स्वाद असतो. साबण किंवा वंगणाकरिता असे थिजलेले तेल वापरता येते पण वनस्पती तूप बनविण्याकरिता त्यातील हा वास काढणे आवश्यक असते. ह्याकरिता शुद्धीकृत व विरंजित थिजविलेले तेल एका विशिष्ट दुर्गंधनाशक पात्रात घेऊन ते पात्र निर्वात करतात आणि तेलाचे तापमान १६° से. पर्यंत वाढवून त्यात अधितप्त वाफ सोडतात. ही वाफ निर्वातीकरण यंत्रणेत खेचली जाते तेव्हा तिच्याबरोबर तेलातील गंधयुक्त पदार्थही तेलातून बाहेर काढले जातात. ह्याप्रमाणे ४-५ तासांनंतर तेलातील वास काढला जातो. नंतर तेलाचे तापमान कमी करण्यात येते व ह्याप्रमाणे शुद्धिकृत, विरंजित व वासरहित केलेले थिजलेले तेल वनस्पती बनविण्यास योग्य होते.

वनस्पती उद्योग : वनस्पती अथवा वनस्पती तूप हे शुद्धीकृत व वास रंगरहित केलेले थिजविलेले वनस्पतिजन्य तेल आहे. काळजीपूर्वक जर थिजविले, तर ते तुपासारखे दाणेदार बनविता येते किंवा लोण्यासारखे स्निग्ध व घट्ट बनविता येते. पहिल्या महायुद्धात थिजविलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली. हिंदी सैनिकांना मार्गारीन किंवा लोण्यापेक्षा तूप आवडे पण ते बरेच महाग म्हणून शेंगदाण्याच्या तेलापासून बनविलेल्या थिजलेल्या तेलाला तुपाचा सुगंध व रंग देऊन व दाणेदार बनवून वनस्पती तूप म्हणून देण्यात येऊ लागले. ते थिजलेले असल्याने डब्यांतून गळण्याची भीती नसते व टिकाऊही असते, शिवाय शुद्ध तुपापेक्षा बरेच स्वस्त त्यामुळे तेही लोकप्रिय होऊ लागले. पहिल्या महायुद्धानंतर काही परदेशी कारखानदारांनी ते भारतात प्रयोगादाखल पाठवायला सुरुवात केली. त्याचा बराच प्रचारही केला व त्याची मागणी वाढत केली.

अशा वनस्पती तुफाला लागणारे शेंगदाण्याचे तेल भारतात मुबलक व स्वस्त मिळत असल्याने येथेच ते बनविण्याची कल्पना पहिला वनस्पती कारखाना १९३० साली मुंबईत उभारून फलद्रूप झाली. ह्यापूर्वी १९२८-२९ साली सु. २३,००० टन वनस्पती तूप आयात केले गेले होते. ते लोकप्रिय करण्याकरिता सुरुवातीला बराच प्रचारही केला गेला. हळूहळू त्याची मागणी वाढत गेली व नवीन कारखाने निघत गेले. ते शुद्ध तुपासारखे दिसावे म्हणून त्याला किंचित रंग देत व कृत्रिम स्वादही त्यात घालीत पण ह्यामुळे एक नवीनच समस्या उद्भवली. कृत्रिम वनस्पती तूप शुद्ध तुपात मिसळले जाऊ लागले. ह्याविरुद्ध बराच प्रचारही झाला. वनस्पतीची वाढती मागणी आणि लोकप्रियता ह्यामुळे वाढलेला उद्योग बंद करणे अशक्य होते म्हणून वनस्पती उत्पादनावर अबकारी कर लावून निर्बंध आणले गेले, तसेच त्याच्या गुणवत्तेवरही बंधन आणले. १९४७ साली केंद्र सरकारने वनस्पतिजन्य उत्पादन नियंत्रण आदेश काढला. त्यात वनस्पती तुपाला ‘थिजविलेले शेंगदाण्याचे तेल’ म्हणावे व डब्यांवर ह्याप्रमाणे स्पष्टपणे उल्लेख पाहिजे, असे सांगण्यात आले. पुढे सरकीचे व इतर खाद्य तेले वनस्पती तयार करण्याकरिता वापरली जाऊ लागली म्हणून ‘थिजविलेले वनस्पतीजन्य तेल’ असे उल्लेखिले गेले. वरील नियंत्रण आदेशात वनस्पतींचा वितळबिंदू, मुक्त अम्लता, आर्द्रता इ. गुणांची मानके ठरविली गेली. ह्याशिवाय वनस्पती शुद्ध तुपात मिसळले, तर ते शोधता यावे म्हणून वनस्पतींमध्ये निदान ५% तिळाचे तेल घातले पाहिजे व वनस्पतीने विशिष्ट (बोडाइन) परिक्षेत किमान ठराविक गुलाबी रंग (२·० लाल) दिलाच पाहिजे, असा निर्बंध घातला गेला. सर्व तेलांत फक्त तिळाचे तेलच ह्या परीक्षेत गुलाबी रंग देते. ह्यामुळे शुद्ध तुपात वनस्पती मिसळले असेल, तर या सोप्या व उपयुक्त परीक्षेने सहज तपासून सिद्ध करता येते. वनस्पतीतील मुक्त अम्लता कमाल ०·२५% आणि आर्द्रता ०·२५% आसावी, तसेच वनस्पती शारीरिक तापमानात पूर्णपणे वितळावे म्हणून त्याचा वितळबिंदू ३७° से. पेक्षा जास्त नसावा असे वरील आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.


वनस्पतीच्या वर उल्लेखिलेल्या मानकांशिवाय त्याच्या वितरण व्यवस्थेवरही बंधने आहेत. वनस्पतीच्या डब्यांवर ज्या महिन्यात ते बनविले असेल त्याचा छाप असला पाहिजे. किरकोळ वनस्पती विकणाऱ्या दुकानदाराने किरकोळ शुद्ध तूप विकू नये. कारखान्यातील भरलेल्या डब्यांची महिन्यातून दोनदा सरकारी परीक्षकाकडून तपासणी होते व नमुने काढून परीक्षेला पाठवितात. ह्या निर्बंधामुळे वनस्पती भेसळीकरिता वापरण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. भेसळ सिद्ध झाली, तर कायद्याने दंड करता येतो.

वनस्पती अथवा थिजवलेले तेल नैसर्गिक नसून रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेले असल्यामुळे ते वापरल्यास स्वास्थ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असावी, अशी शंका सुरुवातीला काही लोकांकडून काढण्यात आली. पण प्रदीर्घ प्रयोगानंतर असे सिद्ध करून दाखविण्यात आले आहे की, ते नैसर्गिक तेलापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी दर्जाचे नाही. उलट शुद्धीकृत व थिजवलेले असल्याने ते जास्त टिकाऊ आहे. शुद्ध तुपात जीवनसत्त्वे असतात व पोषकतेत तेलापेक्षा ते थोडे जास्त चांगले असते हे खरे, म्हणून वनस्पती हे शुद्ध तुपाचा पर्याय न समजता तेलाचा पर्याय समजावा. त्याची पोषकता वाढविण्याकरिता वनस्पतीमध्ये काही ठराविक प्रमाणात अ जीवनसत्त्व घालण्याचा दंडक वर उल्लेखिलेल्या सरकारी आदेशात आहे. शुद्ध तुपाच्या वाढत्या तुटवड्यामुळे वनस्पतीची मागणी वाढतच आहे व त्यामुळे वनस्पती उद्योग हा महत्त्वाचा व कायमचा उद्योग झाला आहे.

भारतात १९८८ मध्ये वनस्पती उत्पादनाचे सर्व देशभर पसरलेले १०२ कारखाने होते. या कारखान्यांची परवानगी देण्यात आलेली एकूण उत्पादनक्षमता १७·४४ लक्ष टन होती. यांपैकी काही उत्पादनक्षमतेचा उपयोग मार्गारीन, बेकरी पदार्थांत वापरण्यात येणारे मोहन (शॉर्टनिंग), सरळ वापरण्याकरिता परिष्कृत तेले, तसेच साबण व वंगणे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी थिजवलेले तेले यांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. भारतातील वनस्पती उत्पादनाची आकडेवारी कोष्टक क्र. १ मध्ये दिलेली आहे. १९८८-८९ या वर्षी ऑक्टोबर १९८८ पर्यंत वनस्पतीचे ८·२० लक्ष टन उत्पादन झालेले होते. १९५१ मध्ये उत्पादनक्षमता ३,३१,००० टन होती, तर १९८०-८१ मध्ये ती १३,२०,००० टन होती.

कोष्टक क्र. १. भारतातील वनस्पतीचे उत्पादन (हजार टनांत). 

वर्ष

उत्पादन

१९५१

१७५

१९५६

२६०

१९६१

३३९

१९६६

३५८

१९७१-७२

५९४

१९७६-७७ 

५४१

१९८०-८१ 

७५२

१९८३-८४ 

८९०

हिंदुस्थान व्हेजिटेलब ऑइल्स कॉर्पोरेशन ही सरकारी कंपनी १९८४ मध्ये स्थापन करण्यात आली. या कंपनीचे देशात १९८८ मध्ये १० कारखाने होते व त्यांत मुख्यत्वे वनस्पतीचे उत्पादन, आयात खाद्य तेलाचे परिष्करण व आवेष्टन वगैरे कार्य करण्यात येते. गव्हन्मेंट हायड्रोजनेशन फॅक्टरी, कोझिकोडे (केरळ) गणेश फ्लोअर मिल्स कंपनी, दिल्ली व कानपूर अमृतसर ऑइल वर्क्स, अमृतसर भावनगर व्हेजिटेबल प्रोडक्ट्स, भावनगर (गुजरात) हे सरकारी क्षेत्रातील वनस्पती उत्पादक कारखाने आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत उत्पादनक्षमतेच्या दृष्टीने वनस्पती उत्पादनाचे कारखाने प्राधान्याने आहेत. जगातील विविध देशांतील वनस्पतिसदृश स्वयंपाकाच्या स्निग्ध पदार्थांचे व तुलनेसाठी लोणी वा तूप यांचे १९८२-८३ चे उत्पादन कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे.

वनस्पती उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री प्रारंभी परदेशांतून आयात करण्यात आली, हळूहळू ती भारतात बनू लागली व आता बहुतेक सर्व यंत्रसामग्री भारतातच तयार होते. ऑइल अँड ऑइल सीड्स जर्नल (मासिक) व ऑइल सीड्स मार्केट रिव्हू (साप्ताहिक) या बारतातील नियतकालिकांत वनस्पती उद्योगांसंबंधीची माहिती प्रसिद्ध होते.

कोष्टक क्र. २. जगातील विविध देशांतील वनस्पतिसदृश स्निग्ध पदार्थांचे उत्पादन (१९८२-८३) (हजार टनांत). 

देश 

मार्गारीन 

स्वयंपाकाचे संयुक्त स्निग्ध पदार्थ 

लोणी/ तूप 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

११५०·०

१९७०·० 

४८१·० 

ऑस्ट्रेलिया 

१४७·० 

८२·० 

७१·० 

कॅनडा 

१५७·० 

२३२·० 

९५·० 

जपान 

२४५·५ 

१४३·५ 

– 

नेदरलँड्स 

२५८·० 

२५०·० 

– 

जर्मनी, पश्चिम 

५०८·० 

१०३·० 

– 

पाकिस्तान

– 

५६०·० 

२२५·० 

ब्रिटन

४०२·० 

१५३·० 

– 

भारत

– 

८८०·० 

६८५·० 

यूरोप, पश्चिम

२,११४·६ 

– 

२,०५३·० 

यूरोप, पूर्व (रशियासह) 

२,००७·६ 

– 

१,८१४·० 

जागतिक एकूण

७,८४१·७ 

३,०३०·० 

६,२१५·० 

पहा : तेले व वसा मार्गारीन वसाम्ले हायड्रोजनीकरण.

संदर्भ : 1. Chhatrapati, A. C. The Vanaspati Industry, Bombay, 1985.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part IX, New Delhi, 1976.

           3. Hattiangdi, G. S. The Vanaspti Industry, Hyderabad, 1958.

           4. Mark, H. F. and others, Kirk-Othmer Encyclopedia of Chemical Technology, Vol. 8, New York, 1965.

गुंडे, ब. गं.