फ्रीमेसनरी :  एक जागतिक गुप्तसंघटना, संघटनेच्या सदस्यास मेसन म्हणतात. मेसन म्हणजे गवंडी. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील गवंड्यांनी स्थापलेला हा संप्रदाय सु. चौदाव्या शतकात उदयास आला. या संघटनेची विद्यमान (१९८०) सदस्य संख्या सु. ६० लक्ष असून त्यातील बहुसंख्य सदस्य अमेरिकेत व त्याखालोखाल ग्रेट ब्रिटनमध्ये आहेत. या संघटनेची मध्यवर्ती संस्था नाही. प्रत्येक देशात ग्रँड लॉज या नावाच्या तिच्या स्वायत्ता संस्था आहेत. या संस्थेच्या सदस्यांत जे प्रतीकात्मक विधी व समारंभ साजरे होतात, त्यांत गवंड्यांची उपकरणे उदा., ओळंबा, गुण्या, करणीइ. प्रतीक म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे सॉलोमन राजाच्या मंदिराच्या बांधकामाशी निगडित अशा काही घटना प्रतीकात्मक पद्धतीने पार पाडल्या जातात. सामान्यपणे या संप्रदायाची तत्त्वे उदारमतवादी व लोकशाही तत्त्वांसारखी आहेत. अँडरसन याचे कॉन्स्टिट्यूशन(१७२३) या नावाचे आद्य लेखन या संप्रदायात प्रमाणभूत मानले जाते. या संघटनेचे उद्दिष्ट सभासदांत बंधुत्वाची भावना निर्माण करून परोपकार व सदाचार यांची शिकवण देणे, हे आहे. कोणत्याही धर्माच्या प्रौढ व्यक्तीस तिचे सभासद होता येते मात्र ही संस्था कोणत्याही धर्माचा प्रसार किंवा प्रचार करीत नाही. 

सोळाव्या शतकापासून कॅथीड्रल्‌सच्या बांधकामास उतरती कळा लागली. त्या वेळी गवंड्यांच्या फ्रीमेसनरी या संघटनेचे स्वरूप सामाजिक झाले. गवंड्यांव्यतिरिक्त इतर लोकही तीत सामील होऊ लागले. १७१७ मध्ये समान कार्यक्रम करणारी चार लॉजीस इंग्लंडमध्ये ग्रँड लॉज या नावाखाली एकत्रित झाली. पुढे तिचा प्रसार ब्रिटिश साम्राज्याबरोबर त्यांच्या वसाहतींत झपाट्याने झाला. देशपरत्वे तिच्या स्वरूपात, पदाधिकाऱ्यांत व पदव्यांत भिन्नता आढळते.

या संघटनेच्या विचारप्रणालीनुसार काम करणाऱ्या इतर सु. १०० प्रकारच्या संस्था आहेत. त्यांपैकी ऑर्डर ऑफ व ईस्टर्न स्टार ही प्रसिद्ध असून तिचे सभासद मास्टर मेसनचे फक्त स्त्री नातेवाईक असतात. याशिवाय मुलींसाठी कार्य करणाऱ्या जॉब्स डॉटर्स व रेनबो फॉर गर्ल्स या संस्था आहेत.

   

 देशपांडे ,  सु .  र .