उचकी : (हिक्का). श्वास आत घेतला जात असताना मध्यपटलाचे (छाती व पोट यांमधील पडद्याचे) जोराचे आणि अकस्मात आकुंचन झाल्यामुळे स्वरद्वार एकदम बंद होऊन जो तीव्र आवाज उत्पन्न होतो त्याला ‘उचकी’ असे म्हणतात. 

मध्यपटलाची ही आकुंचन क्रिया प्रतिक्षेपी असून, वक्षाच्या खालच्या आणि उदराच्या वरच्या भागातील इंद्रियांमध्ये क्षोभ उत्पन्न झाल्यास त्या इंद्रियांत अभिवाही आवेग (मेंदूकडे जाणारी प्रेरणा) उत्पन्न होतो. हा आवेग मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या तंत्रिकाकेंद्रात (मज्‍जातंतू-केंद्रात) जाऊन तेथे उत्पन्न होणारी अपवाही प्रेरणा मध्यपटल-तंत्रिका-मार्गाने मध्यपटलस्‍नायूंमध्ये अकस्मात आकुंचन उत्पन्न करते. विशेषतः जठर, अन्ननलिका या ठिकाणी अतिशय उष्ण, थंड या तिखट पदार्थ गेले असता ही प्रतिक्षेपी क्रिया होते. परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील आवरणाची दाहयुक्त सूज), जठरशोथ, पित्ताशयविकार, पर्युदरशोथ (पोटातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थराची दाहयुक्त सूज) वगैरे स्थानिक कारणांमुळे उचकी लागते. तसेच काही सार्वदेहिकविकारांमध्येही उचकी हे लक्षण दिसते. तरुण स्त्रियांमधील उन्मादामध्ये (हिस्टेरियामध्ये) उचकी कित्येक दिवसपर्यंत टिकते. तसेच मूत्रविष-रक्तता (मूत्रातून उत्सर्जित होणारे हानिकारक पदार्थ बाहेर न पडल्यामुळे ते रक्तात साठून राहण्याची अवस्था), काही मस्तिष्कविकार, अतितीव्र सांसर्गिक रोग वगैरे विकारांतही उचकी लागते. या प्रकारांतील उचकी भयसूचक मानली जाते. कित्येक वेळा उचकीला निश्चित असे काही कारण सांगता येत नाही. क्वचित उचकीची साथच आल्यासारखी दिसते.

चिकित्सा: मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करणे हा उचकी थांबविण्याचा उत्तम उपाय आहे. कारण सापडत नसेल, तर गार पाणी सावकाशपणे प्याल्यास काही वेळा उचकी थांबते, तसेच शामक औषधे घेतल्याने किंवा कार्बन डाय-ऑक्साइड वायू हुंगण्यानेही उचकी थांबते.

ढमढेरे, वा. रा.