बखरवाङ्मय : मराठीतील एक प्राचीन गद्य वाङ्मयप्रकार. यात वाका, करीणा, हकीकत, कैफियत, आत्मवृत्त, प्रसिध्द ऐतिहासिक स्त्रीपुरूषांची चरित्रे, त्यांच्यासंबंधीच्या आख्यायिका इत्यादींचा समावेश केला जातो.

बखरकार हा बहुधा कारकुनी पेशातला असल्याने फडातील कागदपत्रे जशी त्याला उपलब्ध असत, तव्दत तो कथापुराणांच्या वाचनश्रवणाने बहुश्रुतही झालेला असे. त्यामुळे काही बखरींच्या लेखनावर पुराणांचाही प्रभाव पडलेला दिसतो. आणि बखरीतील हकीकत फुलवून सजवून सांगितली गेल्याचे दिसते.

‘बखर’ ह्या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या आढळतात. त्यांपैकी ‘बक’ म्हणजे ‘बोलणे’ ह्या धातूपासून ‘बखर’ हा शब्द तयार झाला. असे राजवाडे म्हणतात, खबर, ह्या अरबी शब्दाच्या वर्णविपर्यासामुळे ‘बखर’ हा शब्द निर्माण झाला, असेही मत आहे. खुशालीची हकीकत, ह्या अर्थी असणाऱ्या ‘बिल्-खैर’ ह्या शब्दाचीच बखर, बखैर अशीही रूपे आढळतात आणि बखैर याचा अर्थ शिवाजीने करविलेल्या राजव्यवहाराकोशात आख्यायिका, असा दिलेला आढळतो. आख्यानात्मकता हा गुण बऱ्याच बखरींत प्रत्ययाला येतो, ह्याचे कारण यात असावे. बखरीचे लेखन फार्सी तवारिखांच्या अनुकरणातून झाले, असाही एक तर्क राजवाडे  यांनी केला आहे. बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याच्या अरबस्तानमधील प्रथेवरून बकर &gt बखर अशीही एक व्युत्पत्ती पुढे करण्यात आली आहे. बखरलेखनाची पंरपरा संस्कृत पुराणकथांकडे आणि वंशानुचरिताकडे जाते, असेही मत अलीकडे मांडले गेले आहे.

महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर यातील काही पद्य प्रकरणे वगळल्यास सर्व बखरलेखन गद्यात झालेले आहे. मात्र हे गद्यलेखनही सजवून केलेले असते. शूरवीरांचे गुणगाण हे बऱ्याच बखरींचे प्रयोजन दिसते, तसेच माहितगाराकडून पुढीलांना मार्गदर्शन करणे, हाही एक हेतू असल्याचे काही बखरीत नमूद केले गेले आहे.

इतिहासाचा काही अंश सापडण्याच्या दृष्टीने शालिवाहनाची बखर ही उपलब्ध बखरींत सर्वांत जुनी बखर असल्याचे राजवाडे मानतात. त्या बखरीच्या उपलब्ध प्रतीतील भाषा मात्र जुनी वाटत नाही. शालिवाहनाच्या बखरीनंतर महानुभावांनी लिहिलेल्या सिंधणादी यादवांच्या बखरी येतात. या बखरींतील भाषा जुनी आहे हेमाडपंताची बखर यादवांच्या बखरीबरोबरीचीच समजावी लागते व याही बखरीची भाषा नकलकारांनी शालिवाहनाच्या बखरीतील भाषेप्रमाणे आधुनिक केलेली आहे असे राजवाडे म्हणतात. महिकावतीच्या ऊर्फ माहीमच्या बखरीतील एकूण सहा प्रकरणांपैकी भगवान् दत्ताने लिहिलेली पद्य प्रकरणे (पहिले व चौथे) इ.स.सु.१५७८ ते १५९४ मधील असावीत, तर केशवाचार्याने लिहिलेला गद्य भाग (प्रकरणे २ व ३) १४४८ मधील आहे. असे दिसते. ह्या बखरीचे पाचवे प्रकरण १५३८ मध्ये लिहिले गेले असावे (त्याच्या लेखकाचे नाव अज्ञात आहे), तर सहाव्याचे लेखन १४७८ मध्ये झालेले दिसते. आबाजी नायक आणि रघुनाथपंत कावळे हे त्याचे लेखक. स्वराज्याचा पाया घातला गेल्यानंतरच्या सु. अडीचशे वर्षाच्या काळात मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या व्यक्तींवर व प्रसंगांवर दोनअडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. त्यांत टिपणे, याद्या रोजनिश्या, संतचरित्रे आदींचाही समावेश होतो. बखरलेखनाची परंपरा ही मूलतः ऐतिहासिक स्वरूपाची असली, तरी उपलब्ध प्रत्यंतर–पुराव्यांच्या आधारे घटनांची नोंद करण्यापेक्षा समाजमनामध्ये बध्दमूल झालेल्या आख्यायिकांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते. ऐतिहासिक कारणमीमांसा करण्यापेक्षा इतिहास आणि पुराण ह्यांत नाते प्रस्थापित करण्याची धडपड बखरींतून अनेकदा दिसते. ऐतिहासिक व्यक्तीविषयी लिहिताना पुराणकालीन आदर्शाची मांडणी करण्याचाही प्रयत्न दिसतो. पुराणांच्या पंचलक्षणांपैकी वंशवर्णन आणि वंशानुचरित ह्या दोन वैशिष्ट्यांनी जो युक्त तो इतिहास अशीही बखरकारांची धारणा जाणवते. इतिहासापेक्षा वाङ्मयीन दृष्ट्या बखरी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

बखरींची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येते. (१) चरित्रात्मक (शिवाजी, संभाजी, ब्रम्होद्रस्वामी यांच्या बखरी) (२) वंशानु चरित्रात्मक (पेशव्यांची बखर ,नागपूरकर मोसल्यांची बखर), (३) प्रसंग-वर्णनात्मक (पाणिपतची बखर, खरड्याच्या स्वारीची बखर), (४) पंथीय (श्रीसमर्थाची बखर) ,(५) आत्मचरित्रपर (नाना फडनीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन, बापू कान्हो यांची आत्मवृत्ते), (६) कैफियती (होळकरांची थैली, होळकरांची कैफियत), (७) इनाम कमिशनसाठी लिहिलेल्या बखरी (काही कराणे), (८) पौराणिक (कृष्णजन्मकथा बखर), (९) राजनीतिपर (आज्ञापत्र) वगैरे.

सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरूषाच्या आज्ञेवरून बखरींचे लेखन झालेले दिसते. मुसलमानी तबारिखांचा हा परिणाम असावा. ‘‘साहेबी मेहरबानी करून सेवकास……आज्ञा केली’’ अशी सभासदाच्या बखरीची सुरूवात किंवा भाऊसाहेबांच्या बखरीतील ‘‘पत्री आज्ञा आली कीं हिंदुपद (श्री राजा) शाहू छत्रपती यांचा प्रधान मुख्य आदिकरून सवालक्ष फौजेनिशींही भाऊगर्दी होऊन प्यादेमात कैशी जाली  हे सविस्तर वर्तमान लिहावयास आज्ञा केली’’. हा प्रारंभीचा मजकूर पोष्याने पोषकास उद्देशून लिहिलेला आहे. तसेच पाणिपतच्या बखरीचा कर्ता रघुनाथ यादव गोपिकाबाईंच्या आज्ञेवरून ती बखर लिहिल्याचे नमूद करतो. तात्पर्य, बहुतेक बखरींचे लेखन पोष्य पोषकभावाने झालेले आहे.

बखरीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुरूवात आणि शेवट ही दोन्ही पौराणिक पध्दतीची असतात शिवकालविषयक अनेक बखरीत व्यक्तीच्या वा घटनेच्या वृत्तांताची सुरूवात सृष्टीच्या उत्पत्तीपासून करून नंतर प्राचीन राजांच्या वंशावळी दिल्या जातात तसेच त्यांचा शेवट इष्ट कामनापूर्तीच्या फलश्रुतीने होतो. उदा.,, जे लक्ष्मीवंत असतील ते विशेष भाग्यवंत होतील. यशस्वी असतील ते दिग्विजयी होतील. येणे-प्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण होतील (सभासदाची बखर).

वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली हा बखरींचा एक प्रमुख गुण म्हणता येईल. प्रौढ पण रसाळ भाषा सर्वच बखरीत कमी अधिक प्रमाणात आढळते. आलंकारिक भाषेचाही उपयोग केला जातो आणि वर्णित शूर वीरला कर्णार्जुनाची उपमा दिली जाते, तर युध्दप्रसांगाला भारतीय युध्द म्हटले जाते. बखरलेखन वाङ्मयीन गुणांनी युक्त होते ते त्यामुळेही. भाऊसाहेबांची बखर किंवा चिटणिशी बखरी यांत याचा उत्तम प्रत्यय येतो. काही बखरींत शिथिल वाक्यरचनाही आढळते. हे सारे बखरनवीसाच्या लेखनप्रभुत्वावर अवलंबून असते.

दीर्घ वाक्यरचनेपेक्षा लघु वाक्यरचनेकडे सर्वच बखरकारांचा अधिक कल असतो. लहानलहान सुटी वाक्ये बखरींत अथपासून इतिपर्यंत आढळतात. अशा रचनेची वाक्ये अधिक परिणामकारक असतात. भाऊसाहेबांची बखर अशा वाक्यांमुळेच आकर्षक झाली आहे. अलंकरणांचा हव्यास आणि दीर्घ वाक्यरचनेची उदाहरणेही चित्रगुप्ताच्या बखरीत वा तत्सम काही अन्य बखरीत आढळत असली, तरी छोटी वाक्ये हा बखरींचा एक खास गुण म्हणता येईल. तसेच प्रचलित मराठीतील ‘की’ ऐवजी ‘जे’ चा वापर, तसेच तृतीयान्त कर्त्याने वाक्य सुरू करून नंतर ते कर्तरी प्रयोगात संपवण्याची उदाहरणे विशेष आढळतात. ‘‘भाऊसाहेब यांणीं मुकाम करून तेथे राहिले’’. (पृ.१४०), ‘‘याप्रमाणे वकिलानें खचीत करून माघारें आले’’ (पृ. ३३) इत्यादी. स्वार्थी प्रत्ययाची संकेतार्थी प्रयोग केल्याचीही उदाहरणे आढळतात. उदा.,, ‘‘आसें करिता कोणी कुमक न ‘करीत’ तर तुम्ही मोंगलाई मसलत करून यश संपादावे’’ (पृ.१७). या वाक्यातील ‘करीत’ हा स्वार्थी प्रयोग ‘केली’ या अर्थी आहे. तसेच ‘तां’ प्रत्ययांचा भाववाचक नामाप्रमाणेही उपयोग केलेला आढळतो. उदा.,, ‘‘परंतु जाबसाल करिता उत्तम आहे’’ (पृ. ७). येथे ‘करितां’चा अर्थ ‘करणे’ असा आहे. ‘गळंत’ (अध्याह्रत) शब्द असलेली वाक्यरचनाही आढळते उदा.,, ‘‘किला कोणार (घेता) आला नाही’’ (पृ.३९). येथे ‘घेता’ हा शब्द आध्याह्रत समजावा लागतो. ‘‘रघुनाथराव दादासाहेब यांस विषाद येऊन (त्यांनी) कुंभेरीस मोर्चे लाविले’’ (पृ. ३) येथे ‘त्यांनी’ हा शब्द अध्याह्रत समजावा लागतो (सर्व उदाहरणे भाऊसाहेबांच्या बखरीतली).


‘विषाद’ हा शब्द ‘क्रोध’ या अर्थी भाऊसाहेबांच्या बखरीत आढळतो. अर्जुनाचा कुरूक्षेत्रावरील विषाद (दुःख किंवा खेद) वेगळा आहे. फार्सी-संस्कृतमिश्र अशी रचनाही आढळून येते. उदा.,, ‘‘निखालसता देखिली’’. (पृ.१६३) ‘तों’ या अव्ययाचाही अनेक अर्थांनी वापर केल्याचे आढळून येते. अशा प्रकारची भाषाविषयक व व्याकरणविषयक वैशिष्ट्ये बखरवाङ्मयाची स्वतंत्र वैशिष्ट्ये म्हणून विचारात घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे किल्ले, सरदार इत्यादींची माहिती जमाखर्ची पध्दतीने म्हणजे बितपशील देण्याचा संकेत बखरींत दिसतो. सप्तप्रकरणात्मक चरित्र आणि पाणिपतची बखर यात याची उदाहरणे आढळतात.

कोणाही लेखकाचे व्यक्तिमत्व त्याच्या लेखनशैलीत व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. ह्या गोष्टीस बखरकार अपवाद नाहीत बखरी चरित्रात्मक असोत की युध्दवर्णनात्मक असोत विषय एक असला, तरी त्यांची शैली वेगवेगळी आहे. उदा.,, सभासदांच्या शिवचरित्रात्मक बखरीची भाषा साधी, सरळ व अनलंकृत आहे, तर त्याच बखरीवरून लिहिलेल्या चित्रगुप्ताच्या बखरीची भाषाशैली संस्कृतप्रचुर अलंकार मंडीत अशी आहे. त्यातूनच लेखकाचे व्यक्तिचित्र वा प्रसंगचित्र उभे करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते. या दृष्टीने सभासदांची बखर, चित्रगुप्ताची बखर, भाऊसाहेबांची बखर, नाना फडणिसाचे आत्मचरित्र, रघुनाथ यादवाची पाणिपतची बखर इ. पाहण्यासारख्या आहेत. उदा.,, चित्रगुप्ताच्या बखरीतील शिवराज्याभिषेक, सभासदाच्या बखरीतील अफझलखानवध, भाऊसाहेबांच्या बखरीतील दत्ताजी शिंदे यांच्या वधाचा प्रसंग किंवा पानिपतहून केलेला पळ यांची वर्णने अत्यंत प्रत्ययकारी उतरली आहेत. भाऊसाहेबांच्या बखरीतील काही प्रसंग व काही व्यक्तिचित्रे अंतःकरणाचा ठाव घेणारी आहेत. उदा., पानिपतावरून केलेल्या पळाचे वर्णन लेखक पुढीलप्रमाणे करतो. ‘‘वाटेनें किती एक जिवे . मारिले कितीएकांस लुटून सोडून दिल्हे. दिलीचा मार्ग न सांपडला आणि भकोन गेले ते फिरत फिरत जातां जातां ते चाळीस हजार जमले. त्यांत पंचवीस पन्नास दांडगे मिळोन लुटून घोडी हिरावून घेतलीं. असा अनर्थ होऊन मातबर मनुष्य पायउतारा जाहले. बहुतांश आन्न कोठें मिळालें, कोठें न मिळालें. मग आवघे जमून मथुरेस येऊन एक दिवस दम खाला. तो हजार मनुष्य थोर थोर नागवे उघडे केवळ भिकारी, भीक मागत आन्नरहित व वसत्ररहित…  आले’’, पळातील लोकांच्या दुर्दशेचे हे वर्णन  अत्यंत ह्रदयद्रावक उतरले आहे.

नाना फडणिसांच्या आत्मचरित्रातही पानिपताच्या पळापळीचे  व स्वतःच्या अनुभवाचे वर्णनही याच प्रकारचे आहे. उदा.,, ‘‘सर्व वाताहत जहाले. मी सायंकाळचे दोन घटका दिवसास पाणिपतांत आलो तों त्या देशाचा मार्ग अगदी ठाऊक नाही. तेथे परमेश्वर वाट दाखवावया रामाजीपंत उभे होते. सांगू लागले, घोडे वस्त्रे टाकून द्यावीं. त्यावरून सर्व टाकून शुध्द लंगोटी लाऊन बसलो. रात्र जहाल्यावर चाललो, तो एका कोसात तीन चार वेळा शरीरास हात लाऊन झाडा घेतला. दर खेपेस समागमेचे दहावीस तोडून टाकीत त्यात मी राहिलो. हे सत्ता ईश्वराची. ’’ प्रस्तुत तीन चार ओळीतील लहान लहान वाक्यांनी नानांवर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगाचे चित्र साक्षात मनासमोर उभे राहते. ह्या सूचक, अर्थवाही भाषेतून वर्णिल्या जाणाऱ्या  प्रसंगाचा प्रभावी परिणाम उत्कटपणे साधलेला आहे. बखरींच्या ऐतिहासिक विश्वसनीयतेबाबत राजवाडे यांनी दाखवून दिलेल्या पंचविध विपर्यासांमुळे-स्थल, काल, व्यक्ती, प्रसंग व कारणविपर्यास –इतिहास म्हणून त्यांना दुय्यम तिय्यम स्थान दिले जात असले, तरी शं.ना. जोशी म्हणतात (भाऊसाहेबांची बखर प्रस्तावना पृ.१५-१६) त्याप्रमाणे अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांचे आणि बखरींचे अध्ययन परस्परपूरक नात्याने होण्यास हरकत नसावी. बखरींचे ऐतिहासिक महत्त्व कमी असले, तरी त्यांचे वाङ्मयीन मूल्य लक्षणीय आहे.

रसांच्या दृष्टीने विचार केला, तर वीर व करूण रसांचा आढळ बखरींत प्रामुख्याने होतो. विशेषतः मोहिमांतील यशापयशांचे वर्णन करताना त्यांचा परिपोष अधिक उत्कटपणे होतो. उदा.,, अफझलखानाचा वध, वसईची लढाई इ. यशाच्या व शौर्याच्या गांथांत वीररस तर नारायणरावाचा खून, पानिपताचा पराभव व पळ यांत करूणरस प्रकर्षाने जाणवतो. बखरकारांचे व त्याने वर्णिलेल्या व्यक्तीचे देशप्रेम, स्वाभिमान, स्वामिभक्ती, कर्तव्यनिष्ठा इत्यादींची जाणही बखरींतून व्यक्त होते.

भाषेच्या दृष्टीने बखरींच्याकडे पहिले तर तत्कालीन समाजात रूढ झालेल्या फार्सी शब्दाचा उपयोग त्यांत केला जाणे अपरिहार्य दिसते. मात्र बखरकार हा बहुश्रुत असल्याने आणि संस्कृत-मराठी पुराणादिकांचाही त्याच्यावर प्रभाव पडलेला असल्याने फार्सी शब्दांप्रमाणेच मराठी व संस्कृत या भाषांतील वाकप्रचार व म्हणी, तसेच अर्थपूर्ण दृष्टांत यांचाही उपयोग त्यांनी केलेला दिसतो. निवेदनात त्यामुळे औचित्य आणि गतिमानताही आलेली आहे. उदा.,, भाऊसाहेबांच्या बखरीतील पुढील वाक्ये : ‘‘शाळवांचे पिकाप्रमाणे शिरे कापली ’’ , ‘‘झाडास बांधले असता झाड घेऊन जातील’’, ‘‘दे माय धरणी ठाव असे जाईल’’, ‘‘मुरगी मारी बचडे दाणादाण होतात तसे जिकडील तिकडे पळाले’’ वगैरे.

महानुभवांच्या गद्यलेखनानंतर मराठी गद्याची धुरा वाहून त्याला समृध्द करण्याचे आणि त्याला वाङ्मयीन रूप देण्याचे श्रेय बखरींनाच द्यावे लागेल आणि म्हणून इतिहासकारांकडून त्यांच्याकडे इतिहासाचे एक साधन आणि तेही गौण, एवढ्याच दृष्टीने पाहिले जात असले, तरी मराठी वाङ्मेतिहासकाराला बखरींची एक वाङ्मयप्रकार म्हणून दखल घेतल्यावाचून पुढे जाता येणार नाही. ह्या नोंदीसाठी वापरण्यात आलेली भाऊसाहेबांची बखर ही वि.सी. चितळे व शं.ना.जोशी संपादित आहे. (१९५५) .

संदर्भ : १. भावे, वि.ल., तुळपुळे, शं.गो.महाराष्ट्र-सारस्वत, पुणे,१९६३. 

          २. राजवाडे ,वि.का. राजवाडे-लेखसंग्रह-भाग १ ला ,पुणे ,१९२८.

          ३. हेरवाडकर, र. वि. मराठी बखर पुणे, १९५७.

ग्रामोपाध्ये, गं. व.