रशिया–जपानयुद्ध : (१९०४-०५). विसाव्या शतकाच्या प्रारंभी रशिया व जपान यांत कोरिया व मँचुरिया यांवरील वर्चस्वासाठी झालेला संघर्ष. या युद्धाला मँचुरियातील पोर्ट आर्थर (चीन) वरील जपानी हल्ल्याने ८ फेब्रुवारी १९०४ रोजी सुरुवात झाली आणि ५ सप्टेंबर १९०५ रोजी पोर्टस्मथच्या शांतता तहाने ते समाप्त झाले.

रशिया व जपान यांत वैमनस्य निर्माण करणाऱ्या अनेक घटना एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उद्भभवल्या होत्या. रशियाने अतिपूर्वेकडे विस्तारवादी धोरण कृतीत आणून त्याकरिता ट्रान्स-सायबीरियन रेल्वे बांधून मॉस्को ते व्हलॅडिव्हस्टॉक ही शहरे जोडली (१८९१). नंतर चीनबरोबर करार करून मॅचुरियातून जाणारी पूर्व रेल्वे बांधली (१८९६). पुढे लिआउनिंग द्वीपकल्पातील पोर्ट आर्थर मक्तेदारीने घेऊन तिथे नाविक तळ केला आणि डायरेन हे व्यापारी बंदर बांधले (१८९८). ⇨बॉक्सर बंडामुळे रशियाने चीनच्या मदतीसाठी सैन्य पाठविले व तिथे ते तळ देऊन बसले. यामुळे रशियन सैन्याच्या हालचाली जपानच्या जवळ होऊ लागल्या आणि कोरिया व मँचुरियात रशियाचे वर्चस्व वाढले. रशियाच्या या अतिपूर्वेकडील वाढत्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी जपानला निमित्त हवे होते. कोरियातील व्यापार व उद्योगधंदे आपल्या नियंत्रणाखाली असावेत, असे जपानला वाटत होते कारण कोरियन रेल्वे जपानच्या मालकीचे होती आणि हजारो जपानी नागरिक कोरियात स्थायिक झाले होते. साहजिकच जपान व रशिया यांत कोरिया व मॅचुरिया येथील प्रदेशांबाबत अनेक करार झाले परंतु रशियाने त्यांपैकी एकाचेही पालन केले नाही, तेव्हा जपानने ग्रेट ब्रिटनबरोबर मैत्रीचा तह करून (१९०२) युद्धाची तयारी आरंभिली. रशियाबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले आणि पोर्ट आर्थरवर पाणतीरांच्या सहाय्याने हल्ला केला. १० फेब्रुवारी १९०४ रोजी अधिकृतरीत्या युद्ध घोषित करण्यात आले. रशियाचे सैन्य संख्येने मोठे होते परंतु ते मॉस्कोहून पूर्वेकडे १६,००० किमी. वर कसे आणावे, हा मोठा प्रश्न होता. त्याचा फायदा घेऊन जपानने द्रुतगतीने रशियाच्या पूर्वेकडील लष्करी ठाण्यावर बाँबचा वर्षाव केला आणि कोरियातील सैन्य मँचुरियात हलविण्यास भाग पाडले. पोर्ट आर्थर शरण आल्यानंतर रशियाचा या युद्धात पराभव झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट यांच्या मध्यस्थीने पोर्टस्मथ येथे शांतता तह होऊन पोर्ट आर्थर व डाल्यिन ही बंदरे जपानकडे हस्तांतरित झाली. सॅकालीनचे विभाजन झाले. मँचुरियन रेल्वे जपानच्या मालकीची झाली. कोरियावर जपानचे वर्चस्व प्रस्थापित होऊन मँचुरियातील दोघांचे सैन्य काढून घेण्यात आले आणि मँचुरिया चीनला परत मिळाला. मात्र बेरिंग सामुद्रधुनीतील मच्छीमारीचे हक्क जपानला प्राप्त झाले. रशियाचे अतिपूर्वेकडील वर्चस्व जवळजवळ संपुष्टात आले. रशियन राजेशाहीविरुद्ध १९०५ ची क्रांती घडली. या युद्धात दोन्ही बाजूंकडून हजारे सैनिक मृत्यूमुखी पडले तथापि जपनाला नुकसानभरपाई मात्र देण्यात आली नाही.

आशियातील जपानसारखे एक लहान राष्ट्र यूरोपातील रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राचा आधुनिक शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने पराभव करू शकते, हे यांतून सिद्ध झाले. जपानचे वर्चस्व आशिया खंडात प्रस्थापित होऊन त्याच्या विस्तारवादी धोरणास चालना मिळाली. याउलट रशियामध्ये राजेशाहीविरुद्ध हळूहळू लोकमत प्रक्षुब्ध होऊन पुढील रशियन राज्यक्रांतीला चालना मिळाली. याउलट रशियामध्ये राजेशाहीविरुद्ध हळूहळू लोकमत प्रक्षुब्ध होऊन पुढील रशियन राज्यक्रांतीला चालना मिळाली.

संदर्भ : 1. Asakaw, K. I. Russo-Japanese Conflict : Its Couses and Issues, London, 1973.

2. Embree, Ainslie T. Ed. Encyclopedia of Asian History, Vol., III, London, 1988.

3. Okamoto, Shumpei, The Japanese Oligarchy and the Russo-Japanese War, New York, 1970.

4. Warner. Denis Warner, Peggy, The Tide at Sunrise : A History of the Russo-Japanese War : 1904-1905, Toronto, 1974.

5. White, John Albert, The Diplomocy of the Russo-Japanese War, Princeton, 1964.

देशपांडे, सु. र.