भाई वीरसिंग

भाई वीरसिंग : (५ डिसेंबर १८७२-१० जुन १९५७ ). आधुनिक पंजाबीतील युगप्रवर्तक कवी, कादंबरीकार व शीख धर्माचे पुनरुज्जीवन करणारे निष्ठावंत लेखक. जन्म अमृतसर येथे. त्यांचे वडील चरनसिंग हे कवी, लेखक व संगीतज्ञ होते. त्यांच्याकडूनच भाई वीरसिंगांना साहित्यनिर्मितीचा वारसा लाभला. वीरसिंगचे बालपण शीख धर्माभ्यासकांच्या सहवासात व्यतीत झाले. एका शीख संताकडून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. १८९१ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि १८९२ मध्ये त्यांनी अमृतसर येथे स्वतःचा ‘वजीर-इ-हिंद’ हा शिळाछाप-छापखाना सुरु केला. १८९४ मध्ये त्यांनी ‘खालसा ट्रॅक्ट सोसायटी’ ची स्थापना केली. शीख धर्मप्रसार व सामाजिक-धार्मिक सुधारणा हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट होते. १८९४ मध्येच त्यानी संस्थेचे मुखपत्र म्हणून खालसा समाचार हे गुरुमुखी लिपीतील पंजाबी साप्ताहिक सुरु केले. त्यातूनच त्यांचे बहुतांश धार्मिक, सामाजिक लेखन प्रसिद्ध झाले. पंजाबी समाजप्रबोधनात तसेच शीख धर्माच्या पुनरुज्जीवनात ही संस्था व खालसा समाचार ह्यांचा वाटा फार मोठा आहे. १८९६ मध्ये त्याचा विवाह झाला.

भाई वीरसिंग यांनी आपले जीवन शीख धर्माच्या प्रसारार्थ व साहीत्यसेवेत व्रतस्थपणे व्यतीत केले. निसर्गावर त्यांचे प्रेम होते. फुलांची व वृक्षवेलीची त्यांना विशेष आवड होती. प्रसिद्धीपराङमुख राहुन एकाकीपणे भरीव कार्य करत राहणे त्यांना आवडे. त्यांचा धर्मिक-आध्यात्मिक पिंड त्यांच्या एकुण जीवनकार्यास व त्यांच्या सर्वच साहित्यनिर्मितीस अधिष्ठानरुप असल्याचे दिसते.

आधुनिक पंजाबी कवितेचे व कादंबरीचे ते प्रणेते मानले जातात. त्यांनी पारंपरिक बंधनांतून पंजाबी काव्य मुक्त करुन त्याला नवे वळण दिले. राणा सूरतसिंग (१९०५) हे त्यांचे पंजाबी मुक्तछंदात रचलेले आद्द दीर्घ काव्य. पंजाबी कवींनी पूर्वी न हाताळलेल्या एका लघुछंदात रचलेल्या त्यांच्या अनेक कवितांचे काही संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काव्यरचनेत नेहमीच नव्या विषयांचा व नव्या अभिव्यक्तिप्रकारांचा मागोवा घेण्याची ओढ दिसून येते. लहर हुलारे (१९२८) हा त्यांच्या कवितांच नितान्तसुंदर संग्रह मानला जातो. त्यांच्या सर्वच कवितांत एक प्रकारचा आध्यात्मिक गूढार्थ आहे. शीख तत्त्वज्ञानातील अनेक कूट प्रश्रांची उकल करण्यसाठी त्यांनी आपली बहुतांश कविता लिहीली. म्हणुनच त्यांच्या कविता एका अर्थी शीख तत्त्वज्ञानावरील भाष्य वा विवरण म्हणता येतील. त्यांची निसर्गपर कविताही विपुल आहे. निसर्गाच्या अंकावरच माणसाचे अंतिम व शाश्वत स्थान असल्याची त्यांची धारणा हेती. चराचरात सर्वशक्तिमान ईश्वर ओतप्रोत भरलेला आहे, असे ते मानत. त्यांच्या अनेक कवितांतून देशभक्तीचाही संदेश आहे. लघुकाव्यरचनेत (रुबायांसारखी रचना) ते सिद्धहस्त होते. मेरे सैंया जाओ (१९५३) ह्या त्यांच्या संग्रहास १९५५ चा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला.

सुंद्री ही त्यांची कादंबरी १८९७ मध्ये प्रसिद्ध झाली आणि तिने आधुनिक पंजाबी कादंबरीचा पाया घातला. सुंद्रीनंतर त्यांनी आणखी तीन ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. शीख इतिहासातून त्यांनी आपल्या कादंबऱ्यांची कथानके घेतली. शीख धर्माचा प्रसार व पुनरुज्जीवन हे त्यांच्य कादंबरीलेखनाचेही प्रयोजन आहे. शिखांच्या वीरवृत्तीचे व शीख स्त्रियांच्या असीम धैर्याचे, आदर्शाचे चित्रण त्यांनी त्यांतून केले. त्यांच्या व्यक्तिरेखा आदर्शवादी व प्रसंग काल्पनिक आसल्याचे दिसते.

एक कुशल चरित्रकार म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरु नानक तसेच गुरु गोविंदसिंग यांची त्यांनी तपशीलवार जीवनचरित्रे लिहिली आहेत. राजा लखदातासिंग (१९१०) हे त्यांचे नाटक. याशिवाय शीख धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मग्रंथांवरील भाष्य, मध्ययुगीन शीख साहित्याच्या हस्तलिखितांचे सटीप संपादन, कोशरचना इ. प्रकारांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

पंजाब विद्यापीठाने १९४९ मध्ये त्यांना ‘डॉक्टर ऑफ ओरिएंटल लर्निंग’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. १९५२ मध्ये पंजाब विधान परिषदेचे सदस्य म्हणुन त्यांची नियुत्त्की झाली. १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ दिली. त्यांच्या जीवनातून व साहित्यातून अनेकांनी स्फूर्ती घेतली. त्यांच्या जीवनावर व साहित्यावर पंजाबीत अनेक ग्रंथ लिहिले गेले. शीख पुनरुज्जीवनवादाचे आद्य प्रवर्तक म्हणुन तसेच पंजाबी साहित्यातील आधुनिक युगप्रवर्तक साहित्यिक म्हणुन त्यांचे महत्त्व फार मोठे आहे. अमृतसर येथे ते निधन पावले.

त्यांची महत्त्वाची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : काव्य : राणा सुरतसिंग (१९०५), लहिरों दे हार (१९२१), मटक हुलारे (१९२२), बिजलियां दे हार (१९२७), लहिर हुलारे (१९२८), प्रीत विणा (१९३१), कंबदी कलाई (१९३३), कंत महेली (१९५०), मेरे सैंयां जीओ (१९५३) कांदबरी : सुंद्री (१८९८), विजयसिंग (१८९९), सतवंत कौर (दोन भागांत- १९००,१९२७), बाबा नौधसिंग (१९२१), नाटक : राजा लखदातासिंग (१९१०) चरित्र : श्री कलगीधर चमत्कार (१९२८), संत गाथा (१९४८), श्री अष्ट गुरु चमत्कार (१९५२), गुर बलम सखिआँ (१९५५) भाषांतर : भर्तृहरि जीवन ते नीतिशतक संपादित आणि इतर : वरां भाई गुरदास स्टीक, भाई मणिसिंगकृत सीखन दी भगत माला (संपा.१९१२), रतनसिंग भंगूकृत प्राचीन पंथप्रकाश (संप १९१४), संथ्या श्री गुरु ग्रंथसाहिब कोश, गुरुग्रंथ कोश (१९२७), साखी पोथी (संप. १९५०), भाई संतोखसिंगकृत ब्रज व संस्कृतमिश्रित ग्रंथ गुर प्रताप सूरज ग्रंथ वा सूरज प्रकाश (भाष्य व संपा. १४ खंड, १९३४), पंज ग्रंथ स्टीक (१९०६), प्राचीन हस्तलिखित पुरातन जनमसाखी (संपा. १९२६ ) इत्यादी.

संदर्भ : 1. Harbans Singh. Bhai Vir Singh, New Delhi, १९७२.

           २. प्रीतमसिंह पंछी, संपा. व अनु. भाई वीरसिंह, वर्धा, १९६२.

के. जगजित सिंह(इं) सुर्वे, भा. ग. (म.)