पूरनसिंग

पूरनसिंग : (? १८८१ – १ मार्च १९३१). आधुनिक पंजाबी कवी व निबंधकार. जन्म हझारा जिल्ह्यातील अब्बोट्टाबाद येथे. शिक्षण एम्‌. एस्‌सी. पर्यंत संशोधन

शिष्यवृत्ती मिळाल्याने १९०० साली टोकिओ येथील इंपीरिअल विद्यापीठात प्रवेश. जपानमधील वास्तव्यात त्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता. तेथेच स्वामी रामतीर्थांच्या प्रवचनांनी प्रभावित होऊन नंतर ते वेदान्ती बनले भारतात परत आल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे ते पुन्हा शीख धर्माकडे वळले. लाहोर येथील टेक्निकल स्कूलमध्ये प्राचार्य, डेहराडून येथे रसायनशास्त्रज्ञ म्हणून व १९१३ मध्ये ग्वाल्हेरच्या महाराजांकडे त्यांनी नोकरी केली, परंतु स्वाभिमानी स्वभावामुळे न पटून त्यांनी राजीनामा दिला.

पूरनसिंग हे पंजाबमधील श्रेष्ठ दर्जाचे स्वच्छंदतावादी कवी होत. खुले मैदान (१९२२), खुले घुंड (१९२३) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह. त्यांची कल्पनाशक्ती असामान्य होती. भोवतालच्या व्यवहारी जगात त्यांचे मन कधीच रमले नाही, तसेच तत्त्वज्ञान आणि विज्ञान ह्या विषयांचा व्यासंग त्यांच्या काव्यवृत्तीस बाधक ठरला नाही आणि कवितेतील भावनोत्कट आविष्काराचा अडसरही ठरला नाही. आपला देश, त्यातील माणसे, निसर्ग या सर्वांवर त्यांचे उत्कट प्रेम होते आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटलेले दिसते. भारतीय संतांप्रमाणे त्यांचा पिंड आध्यात्मिक कवीचा होता. त्यांच्या काव्यातून बुद्धाचा मानवतावाद, एमर्सनचा अतिशायितावाद, थोरोची निसर्गपूजा आणि स्वामी रामतीर्थांचा चिद्‌वाद यांचे दर्शन घडते.

पंजाबीतील ते आद्य निबंधकार होत. आपले विचार परखडपणे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी निबंधलेखन केले. खुले लेख (१९३८) हा त्यांचा एकमेव पण महत्त्वाचा निबंधसंग्रह. निबंधलेखनात नवीन प्रयोग करून स्वच्छंदतावादी परंपरेत शोभतील असे नव्या वळणाचे ललित निबंधही त्यांनी लिहिले.

पूरनसिंगांचे वैचारिक लेखन वाचकांना अंतर्मुख बनविते. गुरूग्रंथकोश आणि मटक हुलारे ह्या ग्रंथांच्या चिकित्सक प्रस्तावनांतून त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन आणि विचारांची खोली यांचे दर्शन घडते. त्यांची इंग्रजी पुस्तकेही प्रसिद्ध असून त्यांत त्यांच्या द बुक ऑफ टेन मास्टर्स (१९२६) ह्या पुस्तकास विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. दहा शीख गुरूंची चरित्रे त्यात आली असून गुरू नानकदेव यांनी प्रसृत केलेल्या तत्त्वज्ञानाचा व विचारांचाच नंतरच्या गुरूंनी कसा अनुवाद केला, याचे साधार विवेचन त्यांनी त्यात केले आहे.

निबंधकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यांचा खरा पिंड कवीचाच होता. त्यांच्या गद्यलेखनातूनही याचा प्रत्यय येतो.

के. जगजित सिंह (इं.) ब्रह्मे, माधुरी (म.)