गुरबक्षसिंग : (२६ एप्रिल १८९५ – ). आधुनिक पंजाबी साहित्यिक. जन्म सियालकोट येथे. ते बी.एस्‌सी. सी.ई. (मिशिगन) आहेत. पाश्चात्त्य शिक्षण व विपुल परदेशप्रवास यांमुळे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ व पुरोगामी बनला. याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातही आढळते. आपल्या गद्यलेखनात त्यांनी नवनवीन तंत्रे, विषय, कल्पना इत्यादींचा अवलंब करून पंजाबी साहित्यात नवीन विचारप्रवाह आणले. ते एक सिद्धहस्त लेखक असून नाटक, लघुकथा, निबंध इ. साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे सु. पन्नासांवर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. साहित्य अकादेमी तसेच जागतिक शांतता मंडळ यांचे ते सदस्य आहेत. १९७१ मध्ये त्यांना नेहरू पुरस्कार मिळाला. ते प्रीतनगर (जि. अमृतसर) येथून निघणाऱ्या प्रीत लरी (१९३९) ह्या पंजाबी मासिकाचे मुख्य संपादक व त्याच नावाच्या प्रकाशन संस्थेचे मालक आहेत.

सर्वसामान्य माणसाच्या दुःखाचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या साहित्यात केले आहे. त्यांच्या मते, भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर आधारलेली समाजरचना, हेच त्या दुःखाचे मूलभूत असे कारण आहे. देशाच्या फाळणीची प्रत्यक्ष झळ लागलेल्या सर्वसामान्य माणसाच्या वेदनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या लेखनात आढळतो. त्यांच्या सर्व लेखनास त्यांच्या उदारमतवादी व मानवतावादी विचारसरणीचा स्पर्श झाला आहे. उदात्त प्रेम हा त्यांच्या लघुकथांचा मुख्य विषय. त्यांच्या कथांमधून वावरणाऱ्या व्यक्ती विशिष्ट धर्माच्या वा पंथाच्या नसतात तर त्या संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यावर रस्किनच्या (१८९९-१९००) विचारांचा, विशेषतः रस्किन यांच्या स्टोन्स ऑफ व्हेनिस, अन्टू धिस लास्ट, टू पाथ्स व मॉडर्न पेंटर्स या ग्रंथांचा, विशेष प्रभाव पडला आहे.

त्यांची भाषाशैली वेधक, प्रवाही व आलंकारिक आहे. सहजसुंदर, नादयुक्त व लयबद्ध वाक्यरचनेमुळे त्यांचे गद्यलेखन काव्यात्म झाले आहे किंबहुना गद्यलेखनही एक प्रकारे काव्यलेखनच होय, अशी त्यांची धारणा आहे. पंजाबी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. त्यांना ‘शब्दांचे जादूगार’ म्हणून संबोधले जाते. त्यांच्या आदर्शवादी भूमिकेमुळे ते कधीकधी वास्तवतेपासून दूर जातात, अशी टीकाही त्यांच्यावर केली जाते.

गुरबक्षसिंग

त्यांची उल्लेखनीय ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : लघुकथासंग्रह–प्रीत कहाणीआँ (१९३९), अनोखे ते इकल्ले (१९४०), नाग प्रीत दा जादू (१९४४), भाबी मैना ते होर कहाणीआँ (१९५०), विणा विनोद (१९५१), प्रीताँ दी पहरेदार ते होर कहाणीआँ (१९५२), व शबनम (१९५५). निबंधसंग्रह – इक दुनीया दे तेराँ सुफने (१९४२), खुल्हा दर (१९४७), पर्‌सन्न लम्मी उमर (१९४७), नवाँ शिवाला (१९४७), साडे वारस (१९४७) व जिंदगी दी रास (१९५७). नाट्यवाङ्‌मय–राजकुमारी लतिका (१९३६), प्रीत मनी (१९४४), पूरब पछम  (१९४४), प्रित मारग (१९४६), प्रीत मुकट (१९४६) व साडी होणी दा लिश्कारा (१९४६). वैचारिक–मनोहर शख्सीअत (१९४३), सावी पधरी जिंद्‌गी (१९४९) आणि परम् मनुख (१९५३). आत्मचरित्रपर–मेरिआँ अमूल यादाँ (१९४७) व मेरी जीवन कहानी.

मोल्येरच्या Tartufe (१६६९) व Le Bourgeois Gentilhomme (१६७०) या नाटकांचे त्यांनी पंजाबीत केलेले भाषांतर मोल्येर दे दो नाटक (१९५८) या नावाने साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

के. जगजीत सिंह (इं.) पोरे, प्रतिभा (म.)