प्रागैतिहासिक कला : प्रागैतिहासिक मानव व त्याची प्राचीनता यांबद्दल यूरोपात सतराव्या-अठराव्या शतकांत, सध्या प्रचलित आहेत त्यापेक्षा, अगदी वेगळ्या स्वरूपाची मते मांडली जात होती. बिशप अशर यांच्या मते बायबलच्या पुराव्यानुसार पृथ्वीची प्राचीनता इ. स. पू. ४००४ या काळापेक्षा मागे जात नाही. तथापि जेव्हा फ्रान्समध्ये प्राचीन स्तरनिक्षेपात अश्मयुगीन हत्यारे सापडली व त्याबरोबर सध्या अस्तित्वात नसलेल्या प्राण्यांच्या अश्मास्थी सापडल्या, तेव्हापासून अशी मते बदलू लागली. प्रागैतिहासिक संशोधनात, फ्रान्समधील शफॉ या गुहेच्या १८४३ साली केल्या गेलेल्या समन्वेषणात हाडाच्या तुकड्यावर कोरलेल्या दोन हरिणींची चित्रे सापडली. हे कलात्मक काम अश्मयुगीन असेल असे कुणालाच त्यावेळी वाटले नाही. मात्र त्यानंतर फ्रान्समधील ला मादेलीन आणि वेझेर या ठिकाणीआणखी अतिप्राचीन कलात्मक वस्तू उपलब्ध झाल्या आणि त्यांच्या कालनिश्चितीबाबत चर्चा सुरू झाली. १८७९ साली स्पेनमधील अल्तामिरा येथील प्रागैतिहासिक गुहांच्या भिंतीवरील रंगविलेल्या चित्रांचा शोध लागला. त्याच सुमारास फ्रान्स व स्पेन या देशांतून अनेक गुहांतील भित्तीचित्रे शोधण्यात आली. १८७८ मध्ये स्येरॅ यांना फ्रान्समध्ये शबो येथे व १८९५ मध्ये रीव्ह्येअर यांना ला मूथ येथील गुहांत चित्रकारीचा अधिक पुरावा उपलब्ध झाला. १८९७ मध्ये मार्सूला येथील गुहांत आणखी चित्रे सापडली. १९०१ मध्ये कापितां आणि आबे ब्रय यांनी फाँ द गोम येथील भित्तीचित्रे व ले कोंबारेल येथील उत्कीर्णित चित्रांचे नमुने प्रसिद्ध केले, तरी त्यांच्या प्राचीनतेबद्दल विद्वज्जन साशंकच होते.

 विसाव्या शतकात स्पेनमध्ये एल कॅस्तिल्लो, ला पासिगा, ला कोवालानास, होर्नो द ला पेयाँ या स्थळी त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये तेयॉ, बर्निफाल, ला ग्रीझ, निऑ, गर्गास, तू द ऑदुबर्त, ले त्रॉ फ्रीरे आणि ल पॉर्तेल यांशिवाय लॅस्को (१९४०), रूफीनॅक (१९५६), देल रोमीतो (१९६१), कपोवा गुहा (१९५९), इकेन-कुंग (१९६९) आणि ऐतत्सेंकेर (मंगोलिया) या ठिकाणीही प्रागैतिहासिक कलेचे नमुने उपलब्ध झाले. तसेच उत्तर आफ्रिकेच्या सहारा विभागात व दक्षिण आफ्रिकेत, रशियातील उरल प्रदेशात, चेकोस्लोव्हाकियातील दोमीका गुहेत, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातही प्राचीन कलेचे पुरावे सापडले. असे असले तरी, उत्तर स्पेनमधील कँटेब्रिअन पर्वतराजी व दक्षिण फ्रान्समधील पिरेनीज व दॉरदोन या क्षेत्रांतील कलानिर्मिती निर्विवादपणे अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असल्याचे दिसून आले. प्राचीनतेच्या आणि विविधतेच्या दृष्टीने स्पेनमधील अल्तामिरा आणि फ्रान्समधील लॅस्को व निऑ येथील प्रागैतिहासिक कलेचे नमुने अद्वितीय होत. अलीकडे भारतात मध्य प्रदेशातील भीमबेटका येथेही प्रस्तरचित्रे सापडलेली आहेत.

 कालमापन : प्रागैतिहासिक कलेचा कालखंड फार विस्तृत आहे. अलीकडे आफ्रिकेतील केन्या देशात ⇨ओल्डुवायी गॉर्ज येथे ॲबेव्हिलियन संस्कृतीतील मानवाच्या वापरातील जमिनीवर लाल गेरूचे गोळे सापडले. हे कदाचित जमीन रंगविण्यास वा चित्रे काढण्यास उपयोगात आणले जात असावेत, असे मानल्यास अशा प्रकारच्या कलोपयोगी उपकरणांचा काळ सु. चार लाख वर्षांपूर्वीचा ठरतो. तथापि प्रागैतिहासिक कला प्रामुख्याने उत्तर पुराणाश्मयुगीन कालखंडातील असून तिचा काळ यूरोपात तरी सु. तीस हजार वर्षांपूर्वीचा असावा, असे स्पष्टपणे दिसून येते. यूरोपात प्रागैतिहासिक कलेला इ. स. पू. सु. १५,००० वर्षांपूर्वीच्या मग्डेलेनिअन संस्कृतीच्या काळी बहर आला होता. त्या काळातील कलानिर्मितीचे स्वरूप विविध, रेखीव, वास्तव व कलागुणसंपन्न आहे. काही कलाप्रकार –विशेषतः नॉर्वे, स्वीडन, उत्तर रशिया या क्षेत्रांतील –मध्याश्मयुगीन वा नवाश्मयुगीनही ठरलेले असल्याने ते कलादृष्ट्या उत्तर पुराणाश्मयुगानंतरचे आहेत, हे उघड आहे.

 कलाप्रकार : प्रागैतिहासिक कलेचा पुरावा पुढील माध्यमांत उपलब्ध झालेला आहे : (१) गुहांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावर काढलेली चित्रे. (२) गुहांच्या भिंतींवरील आणि प्रस्तराधारित कातळावरील उत्कीर्णन. (३) प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती. (४) थोड्याशा उठावात केलेली म्हणजे अपोस्थित शिल्पे. (५) दगडाचे तुकडे, गोट्या, हाडांचे वा शिंगांचे तुकडे यांसारख्या लहान वस्तूंवर केलेली चित्रकारी अथवा उत्कीर्णन. 

पुराणाश्मयुगीन चित्रकलेबाबत एक गोष्ट लक्षणीय आहे. काही गुहांत चित्रकाम कमी उंचीवर केले आहे तर काही ठिकाणी ते अशा उंचीवर केले आहे, की त्यासाठी चित्रकाराला कशावरतरीचढूनच ते करावे लागले असेल. काही चित्रे तर गुहेत इतकी आतवर आणि दुर्गम ठिकाणी काढलेली आहेत, की त्या ठिकाणी चित्रकाराने काम कसे केले असेल, याचा अचंबा वाटतो. याउलट काही चित्रकारी गुहांच्या भिंतींवर इतक्या खाली केलेली आहे, की ते चित्र एका दृष्टिक्षेपात पाहणे शक्य होत नाही.

(१) सांबरशिंगावर कोरलेले रेनडिअर, पीटर्सफेल्स, जर्मनी (२) बैल व घोडे यांचे चित्रण, लॅस्को गुहा, फ्रान्स (३) काळवीट आणि मासे यांचे चित्रण, लोर्थे फ्रान्स (४) मग्डेलेनिअन संस्कृतीतील गव्याचे एक शिल्प, ला मादेलीन गुहा, फ्रान्स (५) रानगव्याचे मृत्तिकाशिल्प (लांबी ६१ सेंमी.), तू द ऑदुबर्त, फ्रान्स (६) घोडेस्वाराचे चित्रण, भीमबेटका, भारत.

 प्रागैतिहासिक काळातील बहुतांशी गुहाचित्रणात तौलनिक अथवा सापेक्ष प्रमाण वापरलेले नाही. उदा., लॅस्को येथील गुहाचित्रणात हरीण, सिंह, बाराशिंगा तसेच रानगवा व प्रचंड हत्ती हे एकाच परिमाणात काढलेले आहेत. दुसरे असे, की बरीचशी चित्रकारी सुट्या सुट्या जनावरांची असल्याने तीत संयोजनाची कल्पना दिसून येत नाही. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे, काही चित्रणातून दिसून येणारे सांकेतिक शैलीकरण. उत्कीर्णित स्त्रीचित्रणातील स्त्रिया स्तनांच्या व नितंबांच्या अतिशयोक्तीपूर्ण शिल्पांकनामुळेच ओळखता येतात आणि रेनडिअरांचे कळप केवळ त्यांच्या शिंगांमुळे व पायांमुळे ओळखता येतात.


उपकरणे : उत्कीर्ण शिल्पांसाठी प्रागैतिहासिक मानवाने गारगोटीपासून बनविलेली अणकुचीदार तक्षण-हत्यारे (ब्यूरिन) वापरली असावीत. अशी अनेक हत्यारे ज्या गुहांत उत्कीर्ण शिल्पकारी आहे, त्या गुहांत सापडलेली आहेत. अश्मयुगातील मग्डेलेनिअन संस्कृती उत्कृष्ट उत्कीर्ण शिल्पकारीबद्दल विख्यात आहे. अल्तामिरा येथील कलेत उत्कीर्ण शिल्पांकन व चित्रकारी एकत्र केल्याचे आढळून येते. हाच प्रकार लॅस्को, एल कॅस्तिल्लो, आंग्लेस-सुर-ला-अँग्लिन व निऑ येथील कलानिर्मितीतही आढळून येतो. शिल्पकारी, चित्रकारी आणि मूर्तिकारी गुहेतच केली जात होती याचा पुरावा म्हणजे फ्रान्समधील ऑदुबर्त येथील गुहांच्या जमिनीवर उमटलेले प्रागैतिहासिक मानवाच्या पावलांचे ठसे. याच गुहेत हाताने बनविलेल्या मातीच्या रानगव्यांच्या अत्यंत वास्तव मूर्ती (लांबी ६१ सेंमी.) सापडलेल्या आहेत.

 अनेक ठिकाणी खडकांतील वैशिष्ट्यांचा मोठ्या कल्पकतेने उपयोग करून घेतल्याचे आढळते. एल कॅस्तिल्लो येथील गुहेत खडकाच्या उठावाचा आणि खोलगटपणाचा रानगव्याच्या शरीराच्या अवयवांची पुष्टता दाखविण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे, तर फ्रान्समधील सलॉ नॉई येथे काळवीटाच्या मुखासारख्या दिसणाऱ्या खडकावर फक्त शिंगे चितारून वास्तवता आणली आहे. फ्रान्समधील फाँ द गोम येथे मात्र चित्रीकरणासाठी आधी लाल गेरू चोपडून पृष्ठभाग तयार केलेला आहे, असे आढळून येते.

 गुहेच्या आत अंधाऱ्या जागेत कृत्रिम प्रकाशाचा वापर अपरिहार्य होता. त्यासाठी दगडी दिव्यांचा वापर केला जाई. असे दगडी दिवे ला मूथ आणि लॅस्को (फ्रान्स) येथील गुहांत सापडलेले आहेत. हे दिवे लंबगोल आकाराचे (लांबी १७ सेंमी.) असून त्यात मधोमध गोल खड्डा केलेला आढळतो. चरबीचा तेल म्हणून व वाळलेल्या शेवाळाचा वातीसारखा उपयोग केला जात असावा, असे तज्ञांचे मत आहे.

 रंग बनविण्यासाठी रंगीत मातीचा उपयोग करीत. गेरूपासून पिवळा, लाल आणि तपकिरी मँगॅनीज डाय-ऑक्साइडपासून काळा आणि गडद तपकिरी केओलीनपासून पांढरा व कोळशापासून काळा रंग तयार करीत असावेत, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसते. हे रंग पाण्यात वा चरबीत कालवले जात आणि शंखांत किंवा हाडांच्या नळकांडीत रंग साठवीत. काही ठिकाणी हाडांच्या नळकांडीत भरलेला रंग तोंडाने हाताच्या पालथ्या पंजावर फुंकल्यामुळे हाताचा ठसा बिनरंगी, म्हणजेच रंगाच्या पार्श्वभूमीवर उठावदार केलेला दिसतो. असे तंत्र लॅस्कोच्या गुहांत दिसून येते.

 तंत्राच्या विविधतेबरोबरच, चित्रगत आशयाची विविधताही पुराणाश्मयुगीन यूरोपीय चित्रकलेत दिसून येते. त्या चित्रकलेत प्रामुख्याने प्राण्यांची चित्रे असली, तरी मानवी आकृत्यांचे चित्रणही केल्याचे आढळून येते. लॅस्को, अल्तामिरा, निऑ इ. ठिकाणी रानगवे, रानटी बैल, घोडे, हरिणे, रेनडिअर, अस्वल या प्राण्यांचे चित्रीकरण प्रामुख्याने दिसत असले, तरी पुराणाश्मयुगाच्या उत्तरकाळात (उत्तरपुराणाश्मयुग : यूरोपातील संभाव्य काळ इ. स. पू. २५००० ते १००००) वैशिष्ट्यपूर्ण स्त्रीमूर्तींची निर्मिती झाल्याचे दिसून येते. प्रामुख्याने हस्तिदंतात कोरलेल्या या स्त्रीमूर्ती लठ्ठ बांध्याच्या, स्थूल स्तनांच्या, बोजड नितंबांच्या आणि जननेंद्रिये कोरून दाखविलेल्या आहेत. यांना यूरोपीय पुरातत्त्वज्ञ ⇨व्हीनस असे संबोधित असले, तरी या मूर्तींचा वापर सुफलताविधीशी संलग्न अशा काही कर्मकांडांशी असावा, असे दिसते. [⟶ आदिमाता].

 चित्रे आणि शिल्पे यांशिवाय हत्यारांच्या मुठींवर व हाडांच्या तुकड्यांवर निरनिराळ्या प्राण्यांची चित्रे कोरलेली आढळून येतात. यातील हत्ती, रेनडिअर आणि घोडा यांची चित्रे अत्यंत वास्तव व प्रमाणबद्ध कोरलेली आहेत आणि ही बहुतेक फ्रान्स, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व रशिया या विभागांत मिळालेली आहेत.

 मध्याश्मयुगातील किंवा आंतराश्मयुगातील (यूरोपात इ. स. पू. पंधरा हजार ते दहा हजार वर्षे) कलेचे अवशेष मात्र फारसे मिळत नाहीत. फक्त उत्तर स्पेन आणि फ्रान्सचा पूर्व भाग येथे तांबड्या गेरूने टिंबे काढलेल्या, नागमोडी रेघा काढलेल्या अथवा सरळ रेघा काढलेल्या दगडी गोट्या उपलब्ध झाल्या. त्यांचा निश्चित उपयोग काय होता, हे मात्र अनिश्चित आहे. यूरोपव्यतिरिक्त पॅलेस्टाइनमधील या काळातील नाटुफियन संस्कृतीचे लोक काही कलात्मक वस्तू बनवीत असल्याचा पुरावा मिळालेला आहे. विळ्याच्या लाकडी मुठीवर हे लोक विविध जनावरांची व पक्ष्यांची चित्रे उत्कृष्टपणे कोरीत असत.

 नवाश्मयुगात (इ. स. पू. सु. आठ हजार वर्षांपासून प्रारंभ) कलेचे एक वेगळेच स्वरूप दिसून येते. मातृदेवतांच्या मातीच्या मूर्तींव्यतिरिक्त, मृतांच्या कवट्यांना मातीने लिंपून चेहऱ्याची वैशिष्ट्ये हुबेहूब निर्माण करण्याची कला अवगत असल्याचे पॅलेस्टाइनमधील ⇨जेरिको (इ. स. पू. सु. ८०००) येथील पुराव्यावरून दिसून येते. तुर्कस्तानातील शताल हुयुक येथील भित्तिचित्रे, ईजिप्तमधील हस्तिदंती पळ्यांवरील जनावरांची व पक्ष्यांची कोरीव चित्रे, चीनमधील यांग शाव संस्कृतीची घाटदार सचित्र मृत्पात्रे, माल्टा व क्रीट येथील रंगीबेरंगी मृत्पात्रे यांचा उल्लेख नवाश्मयुगीन कलेच्या संदर्भात करणे आवश्यक आहे.


भारतात प्रागैतिहासिक कलेचा पुरावा फारसा उपलब्ध झालेला नाही. काही पुराणाश्मयुगीन दगडी हातकुऱ्हाडी अत्यंत घाटदार असल्या [⟶नेवासे], तरी त्यांचा कलावस्तूंत अंतर्भाव करता येत नाही. अलीकडे मध्य प्रदेशात भोपाळजवळ भीमबेटका येथे गुहाचित्रे सापडली आहेत. सर्वसाधारणपणे ही गुहाचित्रे मध्याश्मयुगीन समजली जात असली, तरी त्यातील काही बऱ्याच नंतरच्या काळातील असावीत, असे दिसते. नवाश्मयुगीन (भारतात इ. स. पू. २०००) समजले जाणारे प्रस्तर चित्रकलेचे काही नमुने आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत सापडलेले आहेत. परंतु प्रागैतिहासिक कलेच्या क्षेत्रात यूरोप किंवा पश्चिम आशियाइतका विविध व कालमापित केलेला पुरावा भारतात फारसा सापडलेला नाही.

 

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सायबीरिया इ. प्रदेशांत प्राचीन कलानमुने सापडलेले आहेत. परंतु ते सर्व लॅस्को व अल्तामिरा यांच्या काळानंतरचे आहेत.

 लॅस्को : फ्रान्समधील दॉरदोन विभागात वेझेर नदीच्या काठी असलेल्या मोंतिनॅक गावाजवळील लॅस्को येथील गुहा आणि तिच्यातील चित्रे जगप्रसिद्ध आहेत. ही चित्रे १९४० साली अचानकपणे उघडकीस आली. एका मुलाचे कुत्र्याचे पिल्लू एका मोठ्या बिळात शिरले व त्याच्या पाठोपाठ शिरलेल्या मुलाला ही गुहाचित्रे दिसली. वेझेर नदीचे खोरे प्रागैतिहासिक मानवाची वसतिस्थळे, गुहा आणि गुहाचित्रे यांकरिता सुप्रसिद्ध आहे. ले मूस्त्ये, क्रो मान्यो, ला मूथ, ले कोंबारेल, फाँ द गोम आणि बर्निफाल ही त्यांपैकी उल्लेखनीय आहेत.

 लॅस्को गुहा प्रशस्त आकाराच्या नाहीत व त्याचे छतही फारसे उंच नाही परंतु उत्कीर्णित, चित्रित आणि आरेखित कलात्मक निर्मितीने ही गुहा संपूर्ण भरलेली आहे. प्रामुख्याने काळवीट, रेनडिअर, रानगवा, घोडे आणि रानटी बैल यांची चित्रणे दिसून येत असली, तरी बैल आणि घोडे यांना प्राधान्य दिल्याचे आढळते. येथील कला एकाच पातळीवरची वाटत नाही. हरिणांचे कळप अत्यंत वास्तवतेने आणि लालित्याने रंगविलेले असले, तरी बैल काहीसे बोजड आणि सुस्त वाटतात. घोडे मात्र गतिमान आणि चपळ रेखाटलेले आहेत. अल्तामिराच्या मानाने लॅस्कोची कला जास्त जिवंत, वास्तव आणि चैतन्ययुक्त आहे. छताऐवजी गुहेच्या भिंतीवर रंगविल्याने ही जनावरे नीटपणे पाहता येतात व त्यामुळे त्यांच्याविषयी एका प्रकारे जवळीक वाटते. लाल, तपकिरी, पिवळा आणि काळा या रंगांत काढलेली ही प्राणिचित्रे चटकन डोळ्यात भरतात.

कालदृष्ट्या अल्तामिरापेक्षा लॅस्को प्राचीन आहे. अल्तामिराचे चित्रकार मग्डेलेनिअन संस्कृतीचे होते, तर लॅस्कोची चित्रकारी ग्रेव्हॅटियन संस्कृतीच्या लोकांची आहे. चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ कालमापनपद्धती यांनुसार लॅस्कोचा काळ इ. स. पू. सु. १८००० असा दिला जातो. या चित्रकलेचे जनक पूर्वेकडील सपाट प्रदेशातून आलेले असावेत. [⟶लॅस्को].

 अल्तामिरा : स्पेनमधील सांतादेर विभागातील अल्तामिरा हे स्थळ जगप्रसिद्ध आहे. ‘अल्तामिरा’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ उंचीवरून दिसणारे दृश्य असा होतो आणि या गुहांच्या ठिकाणाहून समोरच्या खोऱ्याचे दृश्य मनोहर दिसत असल्याने तो यथार्थ वाटतो. या गुहांचा व त्यातील चित्रांचा शोध १८७९ साली दॉन मार्सिलीनो द सॉतौला या स्पॅनिश संशोधकाने प्रथम लावला. तथापि १९०२ पर्यंत या गुहांना फारशी प्रसिद्धी लाभली नाही. प्रारंभी तर येथील गुहाचित्रे प्राचीन नसून ती खुद्द सॉतौला यांनीच चितारली आहेत, असा अपप्रचार करून या संशोधकाची अक्षरशः बदनामी करण्यात आली आणि ही चित्रे खरोखरच अश्मयुगीन आहेत, अशी जेव्हा विद्वानांची खात्री पटली, त्याआधीच सॉतौला यांचा मृत्यू झालेला होता. अल्तामिरा येथील गुहाचित्रांचा शोध अगदी अचानकपणे लागला, असे म्हटले जाते. सॉतौला हे समन्वेषण करीत असताना, त्यांची दमलेली लहान मुलगी कपारीखाली बसली होती आणि तिने सहज वर पाहिले तेव्हा तिला बैलाचे मोठे रंगीत चित्र दिसले, ते तिने वडिलांना बोलावून दाखविले. ते चित्र अर्थातच बैलाचे नसून रानगव्याचे होते. यानंतर सर्व गुहाचित्रांचा अभ्यास करून सॉतौला यांनी १८८० साली त्यावर एक छोटे पुस्तक प्रसिद्ध केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समध्ये पुराणाश्मयुगीन गुहा व त्यातील चित्रे उघडकीस आल्याने अल्तामिराच्या गुहाचित्रांनाही महत्त्व प्राप्त झाले. सुविख्यात फ्रेंच पुरातत्त्वज्ञ एमील कार्तेल्हॅक व आंरी ब्रय यांनीही अल्तामिराची चित्रकला पुराणाश्मयुगीन असल्याचे जाहीर केले.अल्तामिराच्या गुहेत रानगवा, रानअस्वल व दमट जंगलात आढळणारे इतर प्राणी चित्रित केलेले आहेत. चित्रीकरणात अनेक रंगांचा वापर केलेला असला, तरी रानगव्याचे चित्रण लाल गेरूने केलेले आहे. चित्रांकन मात्र काळपट रंगात केले आहे. यातील काही जनावरांचे चित्रण सु. १·८२ मी. (सु. सहा फूट) लांब आहे. अल्तामिरा गुहाचित्रांचे उत्कृष्ट नमुने उत्तर पुराणाश्मयुगीन मग्डेलेनिअन संस्कृतिकाळाशी संबद्ध आहेत. [→ अल्तामिरा].

भीमबेटका:भारतात भीमबेटका येथील प्रस्तर गुहांत चित्रकलेचे बरेच नमुने सापडलेले आहेत. यांचा शोध उज्जैन विद्यापीठाचे डॉ. वाकणकर व पुणे विद्यापीठाचे डॉ. मिश्र यांनी लावला. येथील प्रस्तरचित्रे एकाच काळातील नसून, ती वेगवेगळ्या काळांतील आहेत. त्यातील अतिप्राचीन चित्रांचा काळ मध्याश्मयुग असा असून चित्रात प्रामुख्याने रानगवे, बैल व अन्य सांकेतिक शैलीकरणयुक्त प्राण्यांचे एकरंगी वा दुरंगी चित्रण आहे. पिवळा, लाल, तपकिरी व काळा अशा रंगांचा वापर चित्रणात करण्यात आला असून काही चित्रांमध्ये मानवाकृतीही दाखविण्यात आली आहे. गुहांत लघु-अश्मास्त्रे (मायक्रोलिथ्स) सापडलेली असल्याने मध्याश्मयुगीन मानव या गुहांमध्ये वस्तीस होता, असे म्हणता येते. [→ भीमबेटका].

पहा : अश्मयुग आदिम कला आफ्रिकेतील कला ताम्रपाषाणयुग ब्राँझयुग.

संदर्भ : 1. Breuil, H. Four Hundred Centuries of Cave Art, London, 1952.

            2. Huyghe, Rene, Ed. Larousse Encyclopedia of Prehistoric and Ancient Art, London, 1962.

            3. Jelinek, J. The Pictorial Encyclopedia of the Evolution of Man, London, 1975.

            4. Lommel. Andreas, Prehistoric and Primitive Man, London, 1966.

            5. Myron, Robert, Prehistoric Art, New York, 1964.

           6. देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.

    देव, शां. भा.