नेपाळी धनिया : (१) फुलोऱ्यासह फांदी (२) नर-फूल, खालची बाजू (३) नर-फूल, वरची बाजू (४) स्त्री-फूल (५) फळाचा उभा छेद.

नेपाळी धनिया : (हिं तुमरू, नेपालि धनिया, तेजफल गु. तेजबल क. तुंबुरूदू, निम्मी सं. तुंबुरू इं. विंगलीफ प्रिकली ॲश लॅ. झॅंथोझायलम लॅटम, कुल-रूटेसी). ⇨तिरफळाच्या वंशातील हे मध्यम आकारमानाचे, काटेरी, सदापर्णी किंवा काहीसे पानझडी झुडूपकिंवा लहान वृक्ष असून त्याचा प्रसार हिमालयाच्या उतरणीवर, पंजाबात सिंधूच्या पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यास १,५५० मी. उंचीपर्यंत कुमाउँत १,५५०–२,१७० मी. उंचीमध्ये नेपाळ, भूतान आणि खासी टेकड्यांत ६२०–९३० मी. उंचीवर इ. प्रदेशांत आहे. त्याच्या झॅंथोझायलम ह्या वंशात एकूण २०० जाती असून त्यांपैकी भारतात १० आढळतात. नेपाळी धनियाचे झाड सु. ६ मी. उंच व २३ सेंमी. घेराचे असून त्याला त्रिदली किंवा अधिक (५–११) दलांची संयुक्त व एकाआड एक पाने असतात. दले दातेरी, बिनदेठाची, भाल्यासारखी, वर चकचकीत व गोलसर टोकांची असून मुख्य पानांचा देठ व मध्यशीर पसरट (सपक्ष) असतात त्यावरून शास्त्रीय नावातील जातिवाचक शब्द व इंग्रजी नावातील ‘विंगलीफ’ हे विशेषण आले आहे. याच्या शाखायुक्त फुलोऱ्यावर [परिमंजरी → पुष्पबंध] अनेक लहान फुलोरे (वल्लऱ्या) असून त्यांवर लहान, एकलिंगी किंवा द्विलिंगी, पाकळ्या नसलेली पिवळट फुले येतात. नर–फुलात ३–५ केसरदले, स्त्री-फुलात १–५ किंजदले [→ फूल] फळे (बोंडे) गोल, तिरफळांपेक्षा लहान, लाल रंगाची व धन्याएवढी असतात. त्यांची चव व वास धन्याप्रमाणेच असतो म्हणून नेपाळी धनिया (धने) हे नाव पडले आहे. फळ काहीसे तिखट व कडवट असते ते तडकून काळे आणि चकचकीत बी बाहेर पडते.

इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रूटेसी कुलात (सताप कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. झाडाला उग्र वास असतो लाकूड हातात धरण्याच्या काठ्यांकरिता वापरतात. फळ, काटे व साल माशांना गुंगी आणण्यास आणि दातदुखीवर वापरतात. फळात १·५% बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते. सालीत कडू, स्फटिकमय बेरबेरिनासारखे द्रव्य, बाष्पनशील तेल व रेझीन असतात. बी व साल सुगंधी आणि शक्तिवर्धक असून ज्वर, अग्निमांद्य (भूक मंद होणे) व पटकी यांवर देतात. फळे कृमिनाशक असून अपचनात व अतिसारात देतात. मलेशियात फळे व बी उत्तेजक, वायुनाशी व स्वेदजनक (घाम आणणारी) म्हणून वापरतात. इंडोनेशियात बियांचे चूर्ण कृमी व शूल (तीव्र वेदना) यांवर देतात. तेथे ही वनस्पती दीपक (भूक वाढविणारी) मानतात. चरकसंहिता या प्राचीन वैद्यक ग्रंथात ‘तुंबुरू’ चा उल्लेख औषधिद्रव्यांच्या यादीत (हरितवर्गात) केलेला आढळतो.

संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, New Delhi,1975

ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ.