वेल्श, विल्यम हेन्‍री : (८ एप्रिल १८५०-३० एप्रिल १९३४). अमेरिकन विकृतिवैज्ञानिक. आधुनिक वैद्यकीय पद्धती व शिक्षण अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत लागू करण्याच्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाला अमेरिकेतील वैद्यकीय केंद्रांमध्ये अग्रेसर स्थान मिळवून देण्याच्या कामीही त्यांनी मार्गदर्शन केले.

वेल्श यांचा जन्म नॉरफॉक (कनेक्टिकट) येथे झाला. १८७६-७८ या काळात जर्मनीमध्ये वैद्यकातील पदवीचे शिक्षण घेत असताना ते ब्रेस्लौ विद्यापीठातील विकृतिवैज्ञानिक यूलीअस कोन्‌हाइम यांच्या प्रयोगशाळेत काम करीत होते. त्या वेळी त्यांना रॉबर्ट कॉख यांचा बॅसिलस अँथ्रॅसिस या रोगकारकाच्या संक्रामकतेचा ऐतिहासिक प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची संधी लाभली. अमेरिकेला परतल्यावर वेल्श न्यूयॉर्क शहरातील बेल्व्ह्यू हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये १८७९ साली विकृतिविज्ञान व शरीररचनाशास्त्र या विषयांचे प्राध्यापक झाले. नव्यानेच स्थापन झालेल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात पहिला विकृतिविज्ञान विभाग त्यांनी विकसित केला (१८८४). त्या विभागासाठी प्रसिद्ध भिषक विल्यम ओसलर व शल्यचिकित्सक विल्यम हॉलस्टेड यांच्या नेमणुका त्यांनी करवून घेतल्या. विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यालयाचे प्रथम अधिष्ठाते या नात्याने वेल्श यांनी जवळजवळ एकट्यानेच वैद्यकाचा एक अभ्यासक्रम तयार केला. त्यामुळे अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणात क्रांती घडून आली. त्या अभ्यासक्रमात भौतिक शास्त्रांचा सखोल अभ्यास, चिकित्सालयीन कर्तव्यात (नैदानिक कामात) व प्रयोगशाळेतील कामात प्रत्यक्ष सहभाग यांवर विशेष भर देण्यात आला होता. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ⇨पीतज्वराचे संशोधन ⇨ वॉल्टर रीड व जेम्स कॅरल आणि जंतुशास्त्रज्ञ ⇨सायमन फ्लेक्सनगर यांचा समावेश होता.

घटसर्पाच्या विषामुळे होणारे विकृतिवैज्ञानिक परिणाम (फ्लेक्सनर यांच्या बरोबर १८९१-९२), जॉर्ज नटॉल यांच्याबरोबर बॅसिलस एरोजिनेस या सूक्ष्मजंतूचा शोध, मायक्रोकॉकस अल्बस या सूक्ष्मजंतूचा शोध (१८९२) व जखमेतील तापाशी त्याचा असलेला संबंध आणि वायुकोथाला कारणीभूत असणार्याक क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय या सूक्ष्मजंतूचा शोध या मूलभूत स्वरूपाच्या संशोधनासाठी वेल्श यांची विशेष ख्याती आहे. वायुकोथाला कारणीभूत होणार्यात सूक्ष्मजंतूचा शोध त्यांनी लावल्याने त्या सूक्ष्मजंतूस त्यांच्या सन्मानार्थ `वेल्श बॅसिलस’ (दंडाणू) असेही म्हणतात.

पॅथॉलॉजी ऑफ फीव्हर (१८८८), बॅक्टिरिऑलॉजी ऑफ सर्जिकल इन्फेक्शन्स (१८९५), थ्रॉंबॉसिस अँड एंबॉलिझम (१८९९) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.

  बॉल्टिमोर येथे ते मरण पावले.

जमदाडे, ज.वि.