करकरा : करकोच्याबरोबर या पक्ष्याचाही ग्रूइडी पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव अँथ्रोपॉयडीस व्हर्गो असे आहे. करकोच्याप्रमाणेच हा देखील स्थलांतर करणारा पक्षी असून करकोच्याबरोबरच हिवाळी पाहुणा म्हणून तो भारतात येतो आणि त्याच्याबरोबर परत जातो. भारतात आल्यावर हे पक्षी सगळ्या प्रदेशांत पसरतात.

करकोच्यापेक्षा हा लहान पण सुंदर असून करड्या रंगाचा असतो. डोके काळे असते सबंध मानेची पुढची बाजू काळ्या रंगाची असून या काळ्या पट्‌ट्यातील छातीजवळची पिसे लांब आणि छातीवर लोंबत असतात. प्रत्येक डोळ्याच्या मागे पांढऱ्या मऊ पिसांचा ठळक झुपका असतो. मान व पाय लांब असतात. शेपटी लांब लोंबत्या पिसांखाली झाकलेली असते.

यांचे मोठे थवे असतात. दुपारच्या वेळी ते नदीच्या रेताड पात्रात किंवा तलावाच्या काठावर विश्रांती घेतात. इतर वेळी धान्य आणि कोवळी रोपटी खाण्याकरिता ते शेतात – विशेषत: गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या शेतात – शिरतात. यांच्यामुळे पिकांची थोडीफार नासाडी होते. हा उंच सुरात ‘कर्र कर्र’ असा आवाज काढतो व त्यावरुनच याला करकरा हे नाव पडले असावे असे वाटते. यांचा थवा जमिनीवरून उडण्याच्या सुमारास त्यातले बहुतेक पक्षी मोठ्याने आवाज काढीत असल्यामुळे कानठळ्या बसतात. उडताना हा पक्षी मान पुढच्या बाजूला व पाय मागच्या बाजूला ताठ पसरतो. उडणाऱ्या थव्याची रचना∧(उलट्या व्ही अक्षरासारखी) अशा आकृतीची असते. कोवळी रोपे, कोंब, धान्य, किडे आणि सरडे, पाली यांच्यासारखे लहान सरपटणारे प्राणी हे यांचे भक्ष्य होय.

करकरा

यांची वीण मे आणि जून महिन्यांत दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका आणि उत्तर व मध्य आशियात मंगोलियाच्या पूर्वेस होते. घरटे करकोच्याच्या घरट्यासारखेच पण बोरु, वेत, लव्हाळी आणि गवत यांचे असते. मादी प्रत्येक खेपेला दोन अंडी घालते. त्यांचा रंग पिवळसर करडा असून त्यावर तांबूस तपकिरी अथवा करड्या रंगाचे डाग असतात.

पहा : करकोचा.

कर्वे, ज.नी.