डॉइल, आर्थर कॉनन : (२२ मे १८५९ – ७ जुलै १९३०). आयरिश कथा कादंबरीकर. ‘शेरलॉक होम्स’ ह्या जगद्‌विख्यात व्यक्तिरेखेचा निर्माता. एडिंबरो येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्मला. एडिंबरो विद्यापीठातून वैद्यकाची एम्.डी. ही पदवी संपादन केली (१८८५). काही वर्षे वैद्यकाचा व्यवसायही केला. तथापि १८९० नंतर त्याने स्वतःस सर्वस्वी लेखनास वाहून घेतले मात्र बोअर युद्ध सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाऊन एक प्रमुख शल्यचिकित्सक म्हणून त्याने काम केले.

डॉइल हा मुख्यतः रहस्यकथाकार म्हणून ओळखला जातो. विक्षिप्त पण चतुर गुप्तहेर शेरलॉक होम्स हा त्याचा मानसपुत्र अ स्टडी इन स्कार्लेट (१८८७) ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीत अवतरला. एडिंबरो येथील एक नामवंत शल्यचिकित्सक डॉक्टर बेल ह्याच्यावरून ही व्यक्तिरेखा त्याला अंशतः सुचली. डॉक्टर वॉटसन हा शेरलॉक होम्सचा साहाय्यक. ही जोडगोळी इतकी लोकप्रिय झाली, की जिवंत माणसांचा उमटावा तसा त्यांचा ठसा डॉइलच्या वाटकांवर उमटला. देशोदेशींच्या गुप्तहेरकथालेखनावरही डॉइलचा प्रभाव पडलेला आहे. संविधानकाची कौशल्यपूर्ण हाताळणी, वेधक निवेदनशैली ही त्याच्या रहस्यकथा-कादंबऱ्यांची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेतच तथापि गुन्ह्याच्या संशोधनचित्रणात शेरलॉक होम्सच्या व्यक्तिरेखेआडून स्वतः डॉइलने जी कल्पकता दाखविली, तिचा प्रभाव एकूण गुन्हेशास्त्रावरही पडला. नाटके, चित्रपट इत्यादींसाठी त्याच्या कथा-कांदबऱ्यांचा परिणामकारपणे उपयोग करून घेण्यात आलेला आहे. डॉइलच्या प्रसिद्ध शेरलॉक होम्स कांदबऱ्या अशा : द साइन ऑफ द फोर (१८९०), द हाउंड ऑफ द बास्कर्व्हिल्स [१९०२, ह्या कादंबरीचे मराठी रूपांतर प्र. के. अत्रे ह्यांनी मोहित्यांचा शाप (आवृ. दुसरी १९६७) ह्या नावाने केलेले आहे] आणि द व्हॅली ऑफ फिअर (१९१४). त्याच्या अनेक कथांतूनही शेरलॉक होम्स आणि वॉट्सन ही जोडगोळी आलेली आहे.

रहस्यकथा-कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्याने काही ऐतिहासिक कादंबऱ्या व कविताही लिहिल्या. द व्हाइट कंपनी (१८९१), रोडनी स्टोन (१८९६) व सर नायगेल (१९०६) ह्या त्याच्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या, तसेच साँग्ज ऑफ ॲक्शन (१८९८) आणि साँग्ज ऑफ द रोड (१९११) हे त्याचे दोन कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले.

दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या युद्धात द ग्रेट बोअर वॉर (१९००) ह्या नावाने लिहिलेल्या इतिहासात त्याने निःपक्षपातीपणाने दोन्ही बाजूंचे समतोल मूल्यमापन केले आहे तथापि १९०२ मध्ये द वॉर इन साउथ आफ्रिका : इट्स कॉज अँड काँडक्ट हे पुस्तपत्र लिहून त्याने ब्रिटिश सरकारची बाजू मांडली. घटस्फोटाच्या कायद्यावर लिहून त्याने ब्रिटनमधील स्त्रियांच्या समान हक्कांचे समर्थन केले, तसेच बेल्जियम सत्तेने केलेल्या पिळवणुकीच्या निषेधार्थ त्याने लेखन केले.

आयुष्याच्या अखेरीस त्याने आपला सर्व वेळ अध्यात्मावरील श्रद्धा दृढ करण्यात व्यतीत केला त्यात एक व्य़क्तिगत दृष्टी होती. रोमन कॅथलिक पंथाचा तर वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्याने त्याग केला होता. १९१७ ते १९२५ मध्ये त्याने यूरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. ठिकाणी जाऊन अध्यात्मावर भाषणे दिली, द न्यू रेव्हिलेशन (१९१८), द व्हायटल मेसेज (१९१९), द वाँडरिंग्ज ऑफ अ स्पिरिच्यूअलिस्ट (१९२१) आणि हिस्टरी ऑफ स्पिरिच्यूअलिझम (१९२६) ही अध्यात्मपर पुस्तके त्याने लिहिली. ससेक्स परगण्यातील क्रोबर येथे तो निधन पावला.

गोखले, शशिकांत