मधुरा भक्ति: ईश्वराला प्रियकर व स्वत:ला प्रेयसी मानून केल्या जाणाऱ्या भक्तीच्या प्रकारास मधुरा वा उज्ज्वला भक्ती म्हणतात. पुरूष भक्त हा लिंगविपर्यास करणारा भक्त असे ह्या संदर्भात म्हणता येते. याउलट, ईश्वराला प्रेयसी व स्वत:ला प्रियकर मानून केल्या जाणाऱ्या सूफी साधू वगैरेंच्या भक्तीचाही अंतर्भाव मधुरा भक्तीतच करणे शक्य आहे. विविध भक्तांनी अपत्य, बंधू,सखा, दास इ. प्रकारे ईश्वराबरोबर आपले नाते जोडले आहे परंतु पति-पत्‍नी वा प्रियकर-प्रेयसी या नात्यांमध्ये प्रेमाची आत्यंतिक उत्कटता व माधुर्य आढळत असल्यामुळे अनेक भक्तांनी ईश्वरभक्तींची अनुभूती घेण्यासाठी हे नाते स्वीकारले आहे. पति-पत्‍नींमधील प्रेमापेक्षाही जार–जारिणींच्या प्रेमामध्ये अधिक उत्कटता आहे, असे वाटल्यामुळे काही वेळा भक्त ईश्वराला जार व स्वत:ला जारिणी मानत असल्याचेही आढळते तथापि यावर आक्षेपही घेण्यात आले आहेत. अर्थात, त्यांना त्या नात्यातील अनैतिकतेला मान्यता द्यावयाची नव्हती, तर त्यातील उत्कटतेवर भर द्यावयाचा होता, असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला, याभागवतातील विवेचनामुळे मधुरा भक्तीची संकल्पना उदयाला आली, असे दिसते. त्यापूर्वी वेद, उपनिषदे इत्यादींमधील वाङ्‍मयात ईश्वर व भक्त यांच्यामधील प्रेमसंबंधाच्या वर्णनात दांपत्यप्रेमाचे दाखले दिल्याची उदाहरणे आढळत असली, तरी तेथे हीभक्ती स्पष्टपणे मधुरा भक्तीच्या स्वरूपात आढळत नाही. नारदाच्याभक्तीसूत्रांमध्ये भक्तांचा आदर्श म्हणून ब्रजगोपिकांचा निर्देश आल्यामुळेही मधुरा भक्तीच्या संकल्पनेला पुष्टी मिळाली. कारण, त्यामुळे भक्तांना ईश्वरप्रेमाच्या प्रचीतीसाठी गोपींप्रमाणे स्त्रीरूप स्वीकारण्याचीही आवश्यकता वाटू लागली.⇨

कृष्ण हा जगातील एकमेव पुरूष असून बाकीचे जीवात्मे त्याच्याकडे ओढ लागलेल्या स्त्रिया आहेत, असा सिध्दांतही त्यासाठी निर्माण करण्यात आला. याचा परिणाम म्हणून पुरूषभक्तांनीदेखील स्त्रीवेश धारण करून भक्ती करावयास सुरवात केली. विरह, मीलन इत्यादींमध्ये स्त्रियांना ज्या विविध अवस्थांचा अनुभव येतो, त्या अवस्थांचा अनुभव पुरूषभक्तही घेऊ लागले. बंगालमधील चैतन्य गौरांग प्रभूंच्या वैष्णव संप्रदायात काही वेळा या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, की पुरूषभक्ताला तो स्त्री बनल्यामुळे स्त्री प्रमाणे मासिक ऋतुप्राप्ती झाल्याचे मानून त्यानुसार वर्तन करण्याचे प्रकारही आढळू लागले.

मधुरा भक्तीमध्ये असे आगळेपण आढळत असल्यामुळे तिचे मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याचे प्रयत्‍नही झाले आहेत. भक्ती हीच मुळी लैंगिक विकृती आहे, असे माननारे काही मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे मधुरा भक्तीला काही जणांनी विकृत मानले, यात आश्चर्य नाही. मधुरा भक्तीमध्ये कामभावनेचे उदात्तीकरण होते, की कामभावनेचे रूपांतर होऊन मधुरा भक्ती ही एक वेगळीच अवस्था बनते, यांसारख्या प्रश्नांची मानसशास्त्रीय चर्चा करण्यात आली आहे. पुरूषभक्ताला स्त्रीवेष धारण करावा असे वाटणे ही विकृती आहे, की आणखी काही वेगळी अवस्था आहे, याचेही विवेचन करण्यात आले आहे. या विषयाची चर्चा करणारी लैंगिक मानसशास्त्रातील‘विरूध्दलिंगी-वेशांतरण विकृती’ (ट्रॅन्स्व्हेस्टिझम किंवा इऑनिझम) नावाची एक विकृतीही आढळते.

स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यानंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात.स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती. सहजिया वैष्णवांनीच मधुरा भक्तीला महत्त्व आणले, त्यांनी राधा ही कृष्णाची पत्‍नी न मानता परकीया मानली आणि परस्त्रीच्या प्रेमाचे माहात्म्य वाढविण्याचा प्रयत्‍न केला. [चैतन्य महाप्रभू चैतन्य संप्रदाय तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म बौध्द धर्म ].

पुरूषभक्ताने स्त्रीवेश धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्‍नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनलेपरंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा शिल्लक राहिल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले, असे दिसते. आपल्याकडचे⇨पोतराजवगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून तंत्रमार्गात व तेथून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे. जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूनेविवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.

चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते. त्यांचा अवतार द्विविध असल्याचे सांगितले जाते कारण आपल्यापासून राधेला मिळणाऱ्या मधुर सुखाची अनुभूती घेता यावी, म्हणून कृष्णाने चैतन्यांच्या रूपाने राधेचा अवतार घेतला, असे म्हणतात.⇨रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते.⇨वल्लभाचार्याच्यापुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला.मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. रूपगोस्वामी यांनीहरिभक्तिरसामृतसिंधुया ग्रंथातील‘मधुरभक्तिरसलहरी’ या प्रकरणात आणिउज्ज्वलनीलमणिया स्वतंत्र ग्रंथात ही शास्त्रीय मांडणी केलेली आहे. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसासारखी करण्यात आली आहेत. शृंगाराप्रमाणेच त्याचेही संभोग व विप्रलंभ असे प्रकार मानण्यात आले आहेत. कृष्णरती हा मधुररसाचा स्थायी भाव मानण्यात आला असून कृष्ण व राधा हे आलंबनविभाव मानले आहेत. मुरलीचा स्वर वैगेरे उद्दिपनविभाव, रोमांच वगैरे अनुभाव आणि हर्ष वगैरे संचारी भाव मानण्यात आले आहेत. मधुररसास भक्तीरसाचा सम्राट असे म्हटले आहे.⇨कृष्णदास कविराजकृतचैतन्यचरितामृतहा ग्रंथही मधुरा भक्तीचे स्वरूप समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

प्र.न. जोशी यांनी आपल्या ग्रंथात मराठी साहित्यातील मधुरा भक्तीचा आढावा घेतला आहे परंतु स. रा. गाडगीळ यांच्या मते⇨गुलाबरावमहाराजांचा (१८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला मुळीच स्थान नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्‍नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादी सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.

भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील⇨नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (मृ. १४४९) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. यूरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णनेही आढळतात. [“सूफी पंथ].

जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत⇨मीराबाईया त्यापैकी प्रमूख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी⇨आंडाळही रंगनाथाला (कृष्णाला) आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.मुस्लिम स्त्रीसंत रबिया (७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.

 पहा: भक्तीमार्ग भागवत धर्म वैष्णव संप्रदाय. 

संदर्भ: 1. De. Sushil Kumar.Early History of the Vaisnava Faith and Movement in Bengal,Calcutta, 1961. 

          2. Dimock, E. C.The Place of the Hidden Moon: EroticMysticism in the Vaisnava Sahajiya Cult of Bengal,London, 1966. 

          ३. गाडगीळ, स. रा.मधुरा भक्ती, -उद्‍गम आणि विकास नवभारत, वाई, ऑगस्ट,१९६२. 

          ४. जोशी, प्र. न.मराठी साहित्यातील मधुराभक्ती,पुणे,१९५७.

साळुंखे, आ. ह.