रविवार : पाश्चात्त्य कल्पनेप्रमाणे आठवड्याचा पहिला वार परंतु व्यावहारिक दृष्ट्या शेवटचा वार. या वाराचे नाव बहुतेक सर्व देशांत सूर्यवाचकच आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रीय कल्पनेनुसार या दिवशीच्या सूर्योदयापासून पहिल्या होऱ्याचा अधिपती सूर्य असतो. जगात सर्व ठिकाणी सूर्याला देवताच मानतात. जैन धर्मात नऊ वर्षे केले जाणारे एक व्रत आषाढमासाच्या शेवटच्या रविवारपासून पुढे ९ रविवार चालते. मुसलमान लोक दर चांद्रमासातील पहिल्या रविवारी मंत्र-तंत्र करतात काही ख्रिस्ती पंथ रविवार हा प्रभूच्या प्रार्थनेचा व विश्रांतीचा दिवस म्हणून पाळतात. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साप्ताहिक स्मृतिदिन म्हणून सर्वच ख्रिस्ती लोक रविवार हा प्रार्थनेचा दिवस पाळतात. कॉन्स्टंटाइन या सम्राटांनी आज्ञापत्र काढून रविवार हा सुटीचा दिवस ठरविला. ईस्टरच्या अलीकडचा रविवार पाम-संडे म्हणून प्रसिद्ध आहे. ख्रिस्तांचा जेरूसलेममध्ये विजयी प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या मार्गावर पामवृक्षाच्या फांद्या पसरल्या होत्या म्हणून याला पाम-संडे म्हणतात. रविवार विशेष शुभ मानला जात नसल्याने कोणताही उपक्रम या दिवशी सुरू करीत नाहीत. मात्र या दिवशी दृष्टिदोष दूर करणारी यंत्रे वापरून उपचार करण्यास हरकत नसते, असे मानतात.

ठाकूर, अ. ना.