नीलाशोथ : (फ्लेबिटीस). नीलाभित्तीच्या दाहयुक्त सुजेला नीलाशोथ म्हणतात. ज्या वेळी या सुजेबरोबरच रक्ताचे क्लथनही (साकळण्याची क्रियाही) होते त्या वेळी त्यास क्लथनयुक्त नीलाशोथ असे म्हणतात परंतु अत्यल्प किंवा अजिबात शोथ नसताना होणाऱ्या नीला रक्तक्लथनास ‘नीला रक्तक्लथन’ असे संबोधितात. यालाच ‘लक्षणविरहित’ वा ‘सौम्य’ नीला रक्तक्लथन असेही म्हणतात.

नीलांतील रक्तक्लथन हे गंभीर स्वरूपाच्या विकारांत गणले जाते. या रक्तक्लथनास पुढील तीन प्रमुख कारणे मदत करतात : (१) रक्ताची क्लथनक्षमता वाढणे, उदा., आघातजन्य किंवा रक्तक्षयजन्य रक्तातील बदल (२) रक्तप्रवाह गती मंदावणे, उदा., हृदयविकार किंवा दीर्घ काळ शारीरिक चलनवलन बंद असणे (विषम ज्वरासारख्या रोगात रोग्यास अंथरुणावर बरेच दिवस पडून राहावे लागते) आणि (३) नीलेच्या अंतःस्तरास इजा होणे किंवा सूक्ष्मजंतूंचे संक्रामण होणे. या तीन कारणांना मिळून आर्. फिरखो या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून ‘फिरखो त्रिक्’ म्हणतात.

क्लथनयुक्त नीलाशोथ नीलाभित्तीशिवाय आजूबाजूच्या ऊतकातही (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहातही) पसरलेला असतो. तो अधिक गंभीर स्वरूपाचा असून त्यालाच ‘पूतियुक्त नीलाशोथ’ असेही म्हणतात. तो स्थानीय सूक्ष्मजंतू संक्रामणापासून किंवा रक्तप्रवाहाद्वारे इतर ठिकाणांहून आलेल्या सूक्ष्मजंतूंपासून होतो. पोटावरील विशेषेकरून पोटाच्या खालच्या भागातील (उदरगुहेतील) शस्त्रक्रियांनंतर किंवा नीलेत अंतःक्षेपण (इंजेक्शन) नेहमी द्यावयाचे झाल्यास त्या ठिकाणी जी नळी बसवून ठेवतात त्या ठिकाणी किंवा पूतियुक्त प्रसूतीनंतरच्या काळात ही विकृती उद्‌भवते. शस्त्रक्रियेनंतरच्या किंवा प्रसूतीनंतरच्या काळातील पाचव्या ते पंधराव्या दिवसाच्या काळात रोगास सुरुवात होते. कधीकधी कोणतेही प्रत्यक्ष कारण न आढळताही हा रोग उद्‌भवतो. हा रोग अधस्त्वचीय (त्वचेच्या खालील) नीला किंवा शरीरात खोल भागातील नीला या दोन्हीतही उद्‌भवू शकतो. अधस्त्वचीय नीलाशोथ बहुधा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. त्यात स्थानीय लक्षणांमध्ये नीलेच्या अनुषंगाने वेदना होणे, तो भाग हातास गरम लागणे, ज्वर येणे, नाडीची गती वाढणे, रक्ततपासणीत श्वेतकोशिकाधिक्य (रक्तातील पांढऱ्या कोशिकांचे प्रमाण वाढणे) आणि रक्तकोशिका अवसादन (काचनलिकेत तळाशी साठण्याचे) प्रमाण वाढणे इ. सार्वदेहिक लक्षणेही आढळतात.

खोल भागी असणारा क्लथनयुक्त नीलाशोथ कोणतीही बाह्य लक्षणे न दिसता एकाएकीच सार्वदेहिक लक्षणांनी सुरू होतो. कधी कधी एका पायातील अधस्त्वचीय व खोल असलेल्या सर्वच नीलांमध्ये ही विकृती उद्‌भवून काही तासांतच सबंध पाय निळा पडून सुजतो व अतिशय वेदना होतात. यालाच ‘संपुंजित क्लथनयुक्त नीलाशोथ’ म्हणतात व तो बहुधा जोरदार अवसाद (तीव्र प्रकारच्या आघातानंतर आढळून येणारा सार्वदेहिक प्रतिक्षोभ) आणि पायाच्या काही भागाच्या कोथासहित (काही भागाचा मृत्यू होऊन सडण्याच्या क्रियेसहित) आढळतो.

आ.१. फुप्फुस रोहिणीतील रक्तक्लथनजन्य अंतर्कीलन (फिरखो यांनी १८५८ मध्ये स्वतः काढलेले चित्र) : (१) फुप्फुस रोहिणी, (२) रोहिणीची पहिली शाखा, (३) रक्तक्लथित गुठळी.खोल भागी असणाऱ्या क्लथनयुक्त नीलाशोथाचे निदान अलीकडील ‘नीलादर्शन’ या क्ष-किरण तपासणीने सोपे बनले आहे. त्याकरिता क्ष-किरण अपारदर्शी रंग (उदा., कॉनरे, हायपेक वगैरे) पावलावरील नीलेत किंवा घोट्याच्या हाडाच्या अस्थिमज्जेत (हाडाच्या मध्यवर्ती पोकळीतील संयोजी म्हणजे जोडण्याचे कार्य करणाऱ्या ऊतकात) अंतःक्षेपणाने देतात व ठराविक कालांतराने क्ष-किरण चित्रे काढतात. या चित्रांवरून क्लथन कोठे व केवढ्या प्रमाणात आहे हे नक्की समजते. कधीकधी शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास नीलादर्शन अत्यंत आवश्यक व उपयुक्त ठरते.

रक्तक्लथन प्रवृत्ती असल्यास शस्त्रक्रियेच्या नंतरच्या काळात हा रोग उद्‌भवू नये म्हणून पुढील उपाययोजना करतात : रोग्यास अवसाद होऊ न देणे, फार घट्ट पट्ट्या बांधून रक्तप्रवाहात अडथळा न आणणे, पोट फुगू न देणे, शस्त्रक्रियेनंतर शारीरिक हालचाल लवकर सुरू करणे, जरूर वाटल्यास रोग्याचे सर्व रक्तच बदलून टाकणे व क्लथनरोधक औषध देणे. पोटरीच्या स्नायूंना विशेषेकरून दीर्घकालीन शस्त्रक्रियांच्या वेळीच विद्युत् झटके देण्यानेही या रोगास प्रतिबंध घालता येतो.

आ.२. नीलेतील रक्तक्लथनजन्य अंतर्कीलनामुळे होणारे संभाव्य परिणाम : (१) नीलेतील रक्तक्लथित गुठळी, (२) यकृत. (३) हृदय, (४) फुप्फुस नीला दाखविणारा बाण, (५) फुप्फुस रोहिण्या, (६) फुप्फुस, (७) मूत्रपिंड, (८) महारोहिणी.प्रसूतीपश्च क्लथनयुक्त नीलाशोथ बहुधा पायातील मोठ्या नीलांत उद्‌भवतो. कधीकधी प्रसूतीच्या वेळी श्रोणिगुहेतील (धडाच्या तळाशी कमरेच्या हाडांनी बनलेल्या पोकळीतील) भागावर जंतुसंक्रामण झाल्यामुळे प्रथम त्या भागातील नीलांत रोगास सुरुवात होऊन तो नंतर पायातील नीलांत पसरतो. प्रसूतीच्या वेळी अतिरक्तस्राव झाल्यामुळे एकूण रक्तप्रवाहाची गती मंद होण्याने रोग्यास मदत होत असावी. सबंध पायावर सूज येऊन त्वचा पांढरी दिसते आणि वेदना होतात. या विकृतीला ‘श्वेत पादशोथ’ म्हणतात.

नीला रक्तक्लथन किंवा लक्षणविरहित रोगात बाह्य किंवा सार्वदेहिक लक्षणांचा अभाव असतो. अत्यल्प शोथ असून क्लथित गुठळी मऊ व नीलाभित्तीस घट्ट बिलगलेली नसते. तिची सुरुवात झाल्यानंतर ती हृदयाच्या बाजूकडे हळूहळू वाढत जाते. हा रोग बहुधा पायांच्या खोल भागी असणाऱ्या नीलांत होतो. पोटऱ्यांतील नीलांत सुरू झालेले रक्तक्लथन वाढत जाऊन थेट निम्न महानीलेपर्यंतही पोहोचण्याची शक्यता असते. क्लथनयुक्त नीलाशोथातील क्लथित रक्त नीला भित्तीस घट्ट बिलगलेले असते व म्हणून त्याचा तुकडा तुटून सहसा रक्तप्रवाहाबरोबर इतरत्र वाहून नेला जात नाही. याला अंतर्क्लथन किंवा वाहिनीक्लथन म्हणतात. असा तुकडा नीलेत (वा रोहिणीत) अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडणे याला ⇨ अंतर्कीलन म्हणतात. अंतर्कीलनाचा धोका नीला रक्तक्लथनात अधिक असतो. असा एखादा तुकडा (अंतर्कील) फुप्फुस रोहिणीत अडकल्यास ‘फुप्फुस अंतर्कीलन’ नावाचा गंभीर उपद्रव उद्‌भवतो. कोणतीही पूर्वसूचना न मिळता आणि एकाएकीच वेदनामय कष्टश्वसन, अवसाद व त्वचानीलता (ऑक्सिजनन्यूनतेमुळे त्वचा काळीनिळी पडणे) ही लक्षणे उद्‌भवून रोगी दगावण्याचीही शक्यता असते. फुप्फुसात अडकलेल्या रक्तक्लथित गुठळीपासून नव्या गुठळ्या तयार होऊन त्या हृदयाच्या डाव्या भागात परत येऊन, सार्वदेहिक रक्ताभिसरणातून कोणत्याही अंतस्त्याच्या (छाती व उदर यांतील एखाद्या अवयवाच्या उदा., मूत्रपिंड, प्लीहा इ.) रोहिणीत अडकून तेथे दुष्परिणाम करण्याचा संभव असतो.

कधीकधी नीलेतील रक्तक्लथन संपूर्णपणे नाहीसे होऊन नीला पूर्ववत होते. पुष्कळ वेळा झडपेजवळच विकृती होत असल्यामुळे झडपेची क्रिया पूर्ववत होत नाही. त्यामुळे रोग्याचा पाय अधून मधून, विशेषेकरून उभे राहिल्यास, सुजण्याची शक्यता असते. ज्या रोग्यांना क्लथनयुक्त नीलाशोथ एकदा होऊन जातो त्यांच्या बाबतीत तो पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते. स्थलांतरक्षम क्लथनयुक्त नीलाशोथ नावाचा प्रकार (शरीरातील एका भागातील रोग बरा होतो न होतो तोच दुसऱ्या भागात उद्‌भवणे) इस्ट्रोजेन (स्त्रीमदजन हॉर्मोन) औषधांच्या सेवनाचा दुष्परिणाम म्हणून उद्‌भवतो. ही औषधे स्त्रियांच्या संततिप्रतिबंधक गोळ्यांतून व पुरुषांना शस्त्रक्रियेने असाध्य असलेल्या अशा ⇨ अष्ठीला ग्रंथीच्या कर्करोगावर नियमित घ्यावी लागतात. ब्यूर्गर रोग (परिसरीय छोट्या रोहिण्या व नीलांच्या अवकाशिका – मध्यवर्ती पोकळ्या बंद करून टाकणारा शोथजन्य रोग लिओ ब्यूर्गर या अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग) या विकृतीतही वरील प्रकारचा क्लथनयुक्त नीलाशोथ आढळतो.


उपचारांपैकी काही प्रतिबंधात्मक इलाजांचा वर उल्लेख आलेला आहे. १९४० सालापासून या प्रकारच्या इलाजांवर विशेष भर देण्यात येत आहे. या सर्वांचा उद्देश फिरखो त्रिकाविरुद्ध उपाययोजना करणे हाच आहे. नीलादर्शन किंवा आयोडीन (१२५) या समस्थानिकाने (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराने) युक्त असलेले फायब्रिनोजेन वापरून केलेल्या गॅमा चाचण्या निदानाकरिता जेवढ्या उपयुक्त आहेत तेवढ्याच इलाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. याशिवाय शोथ बरा होईपर्यंत संपूर्ण विश्रांती व तद्‌नंतर लगेच अक्रिय व पाठोपाठ सक्रिय व्यायाम हितावह असतो. सूक्ष्मजंतू संक्रामणावर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे व हेपारीन किंवा डीकुमेरॉल यांसारखी रक्तक्लथनरोधके उपयुक्त असतात. आर्व्हिन नावाचे नवे रक्तक्लथनरोधक मलेशियातील सर्पविषापासून बनविण्यात आले आहे परंतु त्याचा अजून सर्रास वापर करण्यात आलेला नाही. नवीन उपचारांमध्ये काही ‘फायब्रिनो – विलयक’ (फायब्रिनाचे तुकडे करणाऱ्या अथवा त्याचे द्रवात रूपांतर करणाऱ्या) औषधांचा वापर करतात. त्यापासून रक्तक्लथित गुठळ्यांचे विलयन होऊन ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करतात. त्याकरिता स्ट्रेप्टोकिनेझ स्थानीय स्वरूपात (बाहेरून लावण्यासाठी) व तोंडावाटे देतात. क्लथनरोधकापेक्षा क्लथनविलयके अधिक परिणामकारक असल्याचे व ती तेवढी हानिकारक नसल्याचे आढळले आहे.

कधीकधी शस्त्रक्रिया करून आणि शक्य असल्यास नीलेचा रोगग्रस्त तुकडा काढून टाकतात. त्याशिवाय नीला कापून उघडी करून तीमधील रक्तक्लथित गुठळी बाहेर काढून टाकता येते. या शस्त्रक्रियेला ‘रक्तक्लथित नीलाछिद्रीकरण’ (थ्रॉम्बेक्टमी) म्हणतात.

नीलेतील कोणत्याही प्रकारचे रक्तक्लथन नेहमी गंभीरच मानले जाते. पाश्चात्त्य देशांपेक्षा भारतात या रोगाचे प्रमाण अत्यल्प आढळते.

संदर्भ : 1. Sangham Lal Balkrishna Rao, B. N. Anand, S. S., Eds. Textbook of Surgery, New Delhi, 1975.

   2. Sabiston, D. C., Ed. Davis-Christopher Textbook of Surgery, Philadelphia, 1972.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.