L - फिनिल ॲलॅनीनफिनिल ॲलॅनीन : प्राण्यांच्या वाढीस आवश्यक असलेले एक ॲमिनो अम्‍ल [→ ॲमिनो अम्‍ले]. हे बीटा फिनिल ॲलॅनीन व आल्फा ॲमिनो बीटा फिनिल प्रोपियॉनिक अम्‍ल म्हणूनही ओळखले जाते. रेणुसूत्र C9H11O2N संरचना (रेणूंची मांडणी) C6H5-CH2-C*H(NH2) COOH असून तिच्यातील तारांकित कार्बन अणू असममित (ज्याला चार वेगवेगळे अणू अथवा गट जोडले आहेत असा) असल्यामुळे याचे दोन प्रकाशीय समघटक आहेत त्यांचे D व L हे विन्यासही ज्ञात आहेत. निसर्गात सामान्यतः L- विन्यास आढळून येतो. (प्रकाशीय समघटक तसेच D व L चिन्हे यांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्‍ले’ ही नोंद पहावी ). तथापि काही सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या पॉलिपेप्टाइडांच्या (उदा., टायरोसिडीन, ग्रॅमिसिडीन एस् ‌यांच्या) जलीय विच्छेदनातील (पाण्याच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करण्याच्या क्रियेतील) संयुगात D विन्यास असल्याचे दिसून आले आहे.

अंकुरलेल्या ल्यूपिनाच्या बीजांपासून १८७९ मध्ये ई. शूल्ट्‌झ आणि जे. बारब्येरी यांनी हे प्रथम वेगळे काढले. ई. एर्लेनमायर आणि ए. लिप्प यांनी १८८२ मध्ये याचे संश्लेषण केले (कृत्रिम रीतीने तयार केले). झाईन, हीमोग्‍लोबिन, फायब्रिन इ. प्रथिनांत ते संयोगित रूपात असते.

L- फिनिल ॲलॅनीन हे ओव्हाल्ब्युमीन, लॅक्टाल्ब्युमीन, झाईन व फायब्रिन इ. प्रथिनांचे जलीय विच्छेदन करून मिळवितात. DL- फिनिल ॲलॅनीन, बेंझॉइल आल्फा ॲमिनो सिनॅमिक अम्लाच्या ॲझलॅक्टोनापासून किंवा आल्फा ॲसिटामिनो सिनॉमिक अम्लापासून, त्याचप्रमाणे एथिल ॲसिटामायडो मॅलोनेट व बेंझिल क्लोराइड यांची विक्रिया करून मिळणाऱ्या संयुगापासून संश्लेषणाने मिळते. त्याचे क्लोरासिटिल फिनिल ॲलॅनीन बनवितात. त्यावर मूत्रपिंड किंवा स्वादुपिंड यांच्यापासून मिळणाऱ्या एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांची) विक्रिया करून फिनिल ॲलॅनिनाची D व L ही विन्यासरूपे वेगळी करता येतात.

L- फिनिल ॲलॅनिनाची चव किंचित कडवट असून २८३° से. तापमानास त्याचे अपघटन (रेणूचे लहान तुकडे होण्याची क्रिया) होते. २५° से. ला याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत.

pK1 (COOH) : १·८३ pK2 (NH3+) : ९·१३

समविद्युत् ‌भारबिंदू : ५·४८.

प्रकाशीय वलन : [α]D (पाण्यात) -३४·५

[α]D (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) -४·५

विद्राव्यता (ग्रॅ./१०० मिलि. पाणी) : २·९७

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

सूक्ष्मजंतूंमध्ये फॉस्फो-इनॉल पायरूव्हिक अम्‍ल व एरिथ्रोज-४-फॉस्फेट यांपासून फिनिल ॲलॅनिनाचे संश्लेषण केले जाते. तथापि मानवाला त्याचा पुरवठा अन्नातूनच व्हावा लागतो व म्हणूनच त्याचा समावेश आवश्यक ॲमिनो अम्‍ल गटात केला जातो.

शरीरात फिनिल ॲलॅनिनाचा चयापचय (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी) टायरोसिनाच्या मार्गाने होतो [→ टायरोसीन ]. शरीरात अ जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास रक्त, यकृत व मूत्रपिंड यांमधील फिनिल ॲलॅनिनाचे प्रमाण वाढते. हे कीटोजनक (कीटोने तयार करणारे) आहे. मनुष्याच्या आहारात दररोज १·१ ग्रॅ. फिनिल ॲलॅनिनाची गरज असते.

फिनिल ॲलॅनिनाची अनेक प्रतिरोधके (याच्या परिणामाविरूद्ध उपाय करणारी द्रव्ये) आहेत. त्यांपैकी बीटा-२ व बीटा-३ थायेनिल ॲलॅनीन, बीटा-२-फ्यूरिल ॲलॅनीन व फ्ल्युओराफिनिल ॲलॅनीन ही महत्त्वाची आहेत.

हेगिष्टे, म.द.