‘श्याम ’- नारायण गोकळदास नागवाणी : (१९२२-१९८८). सिंधी कवी. मूळ नाव नारायणदास गोकळदास नागवाणी. ‘श्याम ‘ या टोपणनावाने काव्यलेखन. मध्य सिंधमधील खाही कासिम (जि. नवाबशाह) या खेड्यात जन्म. त्यांचे वडील महसूल अधिकारी असल्याने त्यांच्या ठिकठिकाणी बदल्या होत, त्यामुळे श्याम यांचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या गावी झाले. त्यांनी मुंबई विदयापीठातून १९४५ साली फार्सी साहित्यात बी.ए. पदवी घेतली व मध्य सिंधमधील नौशहरो या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली. फाळणीनंतर ते दिल्लीला आले व तेथे त्यांनी केंद्र शासनाची नोकरी पतकरली.

श्याम यांची पहिली कविता (गझल) कराची येथील एका मासिकात प्रसिद्ध झाली (१९३९).’ गुल-ओ-बुलबुल’, ‘साघर-ओ-मिना ‘ यांसारख्या त्यांच्या प्रारंभीच्या कविता तत्कालीन प्रथेनुसार शृंगारिक होत्या.पुढे मात्र त्यांनी विशुद्ध निसर्गप्रेम साधेपणाने व्यक्त करणाऱ्या स्वच्छंदतावादी काव्याची निर्मिती केली. रोशन छनवारो (१९६२) व माक भिना राबेला (१९६४) या काव्यसंग्रहांतील कवितांतून हे जाणवते. मुख्यत: माक भिना राबेला या संग्रहात निसर्गप्रेम व स्वच्छंद निसर्गकीडा यांचे चित्रण आढळते. त्यांचे एकूण आठ काव्यसंगह प्रसिद्ध झाले. त्यांनी वेगवेगळ्या छंदोरचना व काव्यप्रकार यशस्वीपणे हाताळले. त्यांत दोहो, सोर ठो, वै, बैयाट यांसारखी अभिजात सिंधी काव्यातील छंद, वृत्ते जशी आहेत तसेच गझल, नज्म, रूबाई यांसारखे फार्सी काव्यप्रकार, टप्पा हा पंजाबी, तर गीत हा हिंदी प्रकार यांचाही समावेश आहे. फ्रेंच व्हिलानेल, इंगजी सुनीत, जपानी हायकू हे रचनाप्रकारही त्यांनी सिंधी काव्यक्षेत्रात आणले. प्रारंभकाळातील पंखिरून (१९५५) या काव्यसंग्रहात शंभर रूबाया आहेत, तर रूपमाया या खंडकाव्यात सुनीतरचना आहे. त्यात प्राचुर्याने शृंगाररसाचे चित्रण आढळते. नायिकेच्या देहवर्णनाद्वारा नायक आपली प्रणयव्याकुळ मन:स्थिती नायिकेपर्यंत पोहोचवितो व भोवतालच्या निसर्गातील प्रतिमा वापरून ते विशिष्ट ऋतुमान रतिसुखाला कसे अनुकूल आहे, ह्याचे वर्णन करतो. श्याम यांच्या बहुतेक कवितांमध्ये ह्या प्रणय-भावाला मध्यवर्ती स्थान आहे. वरिया भार्यो पलांडू (१९६८) या काव्यसंग्रहात मात्र जीवनातील कठोर वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कविता आहेत. या काव्यसंगहाला १९७० साली साहित्य अकादमीचे पारितोषिक लाभले. यानंतरचा आछिंदे आजा मारन (१९७२) हा काव्यसंग्रहही उल्लेखनीय आहे. भारतीय व पाकिस्तानी सिंधी कवींमध्ये श्याम यांचे स्थान अग्रगण्य मानले जाते. त्यांच्या अन्य साहित्यकृतींमध्ये माक फुरा (१९५३) हे हरी दिलगीर यांच्यासमवेतचे संकलन, तसेच रंग रति लहिरा (१९५३), बांध, लहिरून ऐन समुंद (१९८७) व द आती ऐन हयाति (१९८८) इ. उल्लेखनीय होत. नव्या पिढीतील सिंधी कवींवर श्याम यांचा प्रभाव जाणवतो.

हिरानंदानी, पोपटी (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)