श्रीशंकराचार्य संस्कृत विदयापीठ : केरळ राज्याच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कालटी येथील एक संस्कृत विदयापीठ. स्थापना १९९४. केरळ राज्याचे राज्यपाल हे विदयापीठाचे कुलपती, तर राज्याचे शिक्षणमंत्री प्र-कुलगुरू असतात. संस्कृत, भारतविदया, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय भाषा या विषयांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, विकास करणे, सखोल संशोधन करणे, हा या विदयापीठाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. आद्य श्री शंकराचार्य यांच्या कालटी या जन्मस्थळी या विदयापीठाचे मुख्य कार्यालय असून विदयापीठाचे प्रादेशिक अधिकारक्षेत्र संपूर्ण केरळ राज्य आहे. कालटी येथील मुख्य केंद्राशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात काही प्रादेशिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. एट्टुमनूर (कोट्टयम् जिल्हा), पय्यन्नूर (कननोर), तिरूअनंतपुरम्, तिरूर (मल्लपुरम्), त्रिचूर, थुरावूर (अलप्पुझा-अलेप्पी), क्विलंडी (कोझिकोडे), पनमाना (कोल्लम्‌-क्विलॉन) ही विदयापीठाची प्रादेशिक केंद्रे आहेत.

या विदयापीठात बी.ए., बी.एफ्.ए. (ललित कला पदवी), एम्.ए., एम्.एस्.डब्ल्यू., एम्.फिल्., पीएच्.डी. इ. अभ्यासक्रमांचे अध्यापन केले जाते. त्याशिवाय पर्यटन व हिंदी भाषांतर या विषयांचे अर्धवेळ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येथे चालू आहेत. आयुर्वेद, भरतनाट्यम्, इंग्रजी, भूगोल, हिंदी, इतिहास, कुडियाट्टम, मलयाळम्, मोहिनीआट्टम्, संगीत, भित्तिचित्र, चित्रकला, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, संस्कृत-सामान्य, संस्कृत-न्याय, संस्कृत-साहित्य, संस्कृत-वेदान्त, संस्कृत-व्याकरण, शिल्पकला, समाजशास्त्र, रंगभूमी, उर्दू इ. विषयांचे या विदयापीठात विभाग आहेत. विदयापीठात २०००-२००१ या शैक्षणिक वर्षात १,४९१ विदयार्थी शिक्षण घेत होते. त्यांत ४०२ विदयार्थी तर १,०८९ विदयार्थीनी होत्या.

चौधरी, वसंत