मानवेंद्रनाथ रॉयरॉय, मानवेंद्रनाथ  : (२१ मार्च १८८७−२५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. कलकत्त्याजवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव नरेन (नरेंद्र) व आडनाव भट्टाचार्य. मानवेंद्रनाथ रॉय हे त्यांनी नंतर (१९१६) धारण केलेले नाव. त्यांचे वडील संस्कृतीचे शिक्षक होते. कोडलिया येथे स्थायिक झाल्यावर ते मंदिराचे मुख्य पुजारी म्हणूनही काम पहात असत. शालेय शिक्षण पूर्ण करून कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षांला असतानाच नरेन सशस्त्र क्रांतीकारकांच्या चळवळीत ओढले गेले. त्यांच्या विरुद्ध तीन-चार खटले झाले. ‘हौरा कॉन्स्पीरसी केस’ हा त्यांच्याविरुद्ध दाखला करण्यात आलेला प्रसिद्ध खटला. त्यामध्ये आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली (१९११). शस्त्रखरेदीसाठी पैसे हवेत, म्हणून नरेनने दरोडे घालण्यास १९०६ पासून सुरुवात केली होती.

               

पहिले जागतिक महायुद्ध १९१४ साली सुरू झाले. इंग्रजी राज्य उलथून पाडण्याची ही उत्तम संधी होती. त्या वेळी क्रांतीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांत नरेन आणि त्यांचे सहकारी यांचा प्रमुख भाग होता. या कामी जर्मनीची मदत व्हावी, यासाठी क्रांतीकारकांचे प्रयत्न बरेच दिवस चालू होते. या मदतीबद्दल जर्मन प्रतिनिधींना भेटून योजना आखण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नरेन भट्टाचार्य यांची निवड झाली. त्यांनी शस्त्रास्त्रे व दारूगोळा पाठविण्याची एक योजना आखली. त्या योजनेप्रमाणे दारूगोळ्याने भरलेले एक गलबत बंगालमध्ये यावयाचे होते. परंतु ते गलबत येऊ शकले नाही व नंतर ती योजनाच संपूर्णपणे बारगळली. या कामासाठी नरेन यांना इंडोनेशिया, चीन वगैरे देशांचा १९१५-१६ साली दोन वेळा दौरा करावा लागला. दुसऱ्या  वेळी सगळे कारस्थान फसल्यामुळे नरेन एकदा जे परदेशी गेले, ते १९३१ सालापर्यंत परत आले नाहीत.

               

दुसऱ्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १९१६ साली त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय असे आपले नामांतर केले. यानंतर त्यांच्या विचारांतही परिवर्तन झाले आणि ते साम्यवादी क्रांतीच्या दिशेकडे वळले. तथापि त्यांचा सशस्त्र क्रांतिकारक गटांशी व कार्याशी संबंध पूर्णतः तुटला नाही. ज्या जर्मन लष्करी अधिकार्यांचशी शस्त्रांच्या मदतीबद्दल त्यांची बोलणी झाली होती त्यांच्यापैकी एकाने मेक्सिकोमध्ये त्यांची भेट घेतली व शस्त्रपुरवठ्याबद्दल पुन्हा बोलणी सुरू केली. शस्त्रे प्रत्यक्षपणे मिळाली नाहीत पण त्या निमित्ताने बराच जर्मन पैसा रॉय यांच्या हातात पडला. त्या पैशाचा रॉय यांनी नंतर साम्यवादी क्रांतीकार्यासाठी मेक्सिकोमध्ये व जर्मनीमध्ये उपयोग केला.

               

रॉय १९१६ नंतर अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि न्यूयॉर्क या दोन शहरी राहिले. तेथे त्यांनी भारतीय प्रश्नांचा आणि समाजवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास चालू ठेवला. मात्र क्रांतीकारक साम्यवादच रॉय यांच्या मनाला अधिक पटला व रुचला.

               

त्या सुमारास साम्यवादाचा प्रचार अमेरिकेत सुरू झाला होता. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीमुळे त्याला खूपच जोर चढला होता. रॉयसारखा कर्तृत्ववान तरुण नेता मिळाल्यामुळे तेथील साम्यवादी कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. न्यूयॉर्कमध्ये असताना रॉय यांना हिंदू−जर्मन कटाचया खटल्यातील आरोपी म्हणून एक रात्र तुरूंगात काढावी लागली. पण काही तासांनीच त्यांची जामिनावर सुटका झाली. खटला उभा राहण्यापूर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी अमेरिका सोडली आणि ते मेक्सिकोमध्ये दाखल झाले.

               

मेक्सिकोमधील रॉय यांचे जीवन महत्त्वाच्या घटनांनी भरलेले आहे. तेथे ते जुलै १९१७ पासून नोव्हेबर १९१९ पर्यंत होते. त्या कालावधीत त्यांनी त्या देशाच्या राजकारणात भाग घेतला. १९१८ साली त्यांनी मेक्सिकन समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९१९ मध्ये त्यांनी त्या पक्षाचे साम्यवादी पक्षांत रूपांतर केले. रशियाबाहेर स्थापना झालेला असा तो पहिलाच साम्यवादी पक्ष होता. मेक्सिकोत रॉय यांची रशियन क्रांतीचा एक पुढारी बरड्येन याच्याशी गाठ पडली. दोघे उत्तम मित्रे झाले. लेनिनला रॉयची माहिती झाली ती बरड्येनमार्फतच. बरड्येननेच नंतर रॉय यांना मॉस्को येथे भरणाऱ्या साम्यवादी चळवळीच्या जागतिक परिषदेला हजर राहण्याचे लेनिनचे आमंत्रण दिले. रॉय यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर १९१९ मध्ये मेस्किको सोडले.

               

यूरोपमधील साम्यवादी क्रांताकारक चळवळीचा भर १९२० च्या सुमारास ओसरला होता आणि लेनिनसारखे पुढारी यूरेपबाहेरील देशांकडे आपले लक्ष वळवत होते. त्यांचे लक्ष मुख्यत्वेकरून भारत व चीन या देशांकडे होते. त्यांच्या दृष्टीने रॉय यांचे साम्यवादी चळवळीतील पदार्पण सुचक व आनंददायी होते.

        साम्यवादी चळवळीत रॉय यांची प्रगती मोठ्या वेगाने झाली. साम्यवादी चळवळीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला रॉय हे प्रथम हजर राहीले ते १९२० साली, ती त्या संघटनेची दुसरी जागतिक परिषद होती. मेक्सिकोचे प्रतिनिधी म्हणून ते त्या परिषदेला हजर राहिले. त्या परिषदेत रॉय यांची लेनिनशी पहिली. त्या परिषदेतच त्यांचा लेनिनशी भारतासारख्या वासाहतिक देशांतील साभ्यवादी पक्षाचे कार्य, या विषयावर वाद झाला. या विषयावर एक प्रबंध तयार केला होता. तो लेनिनने रॉय यांचे मत अजमावण्यासाठी म्हणून त्यांना परिषद सूरु होण्यापूर्वीच वाचायला दिला होता. हा रॉय यांचा मोठा सन्मान होता. चर्चेमध्ये रॉय यांची विद्धत्त आणि वादकौशल्य लेनिनच्या व इतर जागतिक कीर्तीच्या साम्यवादी पुढाऱ्यांच्या नजरेत भरले आणि त्यामुळे लवकरच त्यांना साम्यवादी पुढाऱ्यांच्या पहिल्या रांगेत स्थान मिळाले. आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांवर रॉय यांची नेमणूक झाली.

               

ताश्कंद येथे रॉय यांनी १९२० साली भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मात्र वाढला नाही. पुढे रॉय यांच्या प्रोत्साहनामुळे भारतातच १९२५ मध्ये नवीन साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. रॉय हे पहिल्यापासूनच त्या पक्षाचे मार्गदर्शक व पुढारी होते.

               

आंतराष्ट्रीय साम्यवादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कॉमरेड रॉय १९२७ सालच्या सुरुवातीस चीनला गेले. त्या वेळी चीनमधील क्रांतियुद्ध नाजुक अवस्थेत होते. क्वोमिंतांगमधील उजव्या पक्षांचा जोर वाढला होता आणि ते साम्यवादी पक्षाला विरोध करीत होते. या वेळी साम्यवादी पक्ष आणि क्वोमिंतांगमधील उजव्या पक्षांचा जोर वाढला होता आणि ते साम्यवादी पक्षाला विरोध करीत होते. या वेळी साम्यवादी पक्ष आणि क्वोमिंतांग यांच्यामधील युतीचा फेरविचार करणे आवश्यक होते रॉय यांच्या मतानुसार क्वोमिंतांगबरोबर केलेली युती हा एक डावपेचाचा प्रश्र होता. रॉय यांचे हे म्हणणे आंतरराष्ट्रीय संघटनेला पटले होते तथापि सारी साम्यवादी यंत्रणा बरड्येन यांच्यसारख्या वयोवृद्ध पुढाऱ्यांच्या हातांत होती त्यामुळे रॉय यांना काही करता आले नाही.        

    


   क्रांतीची घसरगुंडी चालूच होती. ती घसरण रॉय यांना थांबवता आली नाही. अखेर क्वोमिंतांगने साम्यवाद्यांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. त्यात हजारो साम्यवाद्यांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. त्यात हजारो साम्यवाद्यांची आहुती पडली. रॉय यांनीही चीन सोडणे भाग पडले. ते मॉस्कोला परत गेले. पण तिथेही त्यांना फार दिवस राहता आले नाही. चीनमधील अपयशाची सारी जबाबदारी साम्यवादी पुढारी रॉय यांच्यावर टाकून मोकळे झाले पण तो त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. रॉय यांच्याजवळ बरेच अस्सल कागद होते. ते त्यांनी दोन पुस्तकांच्या रुपाने जगापुढे ठेवले आहेत. त्यांचे पहिले पुस्तक रेव्हलूशन अँड काउंटर-रेव्हलूशन इन चायना (१९३०). त्यामध्ये अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यानिशी रॉय यांनी चिनी क्रांतीचा कथन केला आहे. दुसरे पुस्तक माय एक्सपीरिअन्सेस इन चायना (१९३३ १९४५). हे रॉय यांनी तुरुंगात असताना १९३२ साली लिहिलेले पुस्तक. यांखेरीज आता तिसरेही एक पुस्तकप्रसिद्ध झाले आहे. त्याचे नाव एम्. एन्. रॉयस मिशन टू चायना असे असून ते रॉय १९२७ मध्ये चीनमध्ये असताना केलेल्या भाषणांच्या उताऱ्यांवर आधारलेले आहे. हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. न्यूओरिएंटेशन (१९४६), बिथाँड कम्युनिझम (१९४७), न्यू ह्यूमॅनिझम (१९४७), इंडियाज मेसेज (१९५०), रॅडिकल ह्यूमॅनिझम (१९५२), रीझन, रोमँटिसिझम अँड रेव्हलूशन (२ खंड, १९५२, १९५५) इ. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या ग्रंथांची संख्या सत्तरांवर भरते.

आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीतील रॉय यांची ही वाढती प्रतिष्ठा काही मंडळींना खुपू लागली. त्यामुळे नंतर संघटनेत रॉय यांच्या चीनमधील अपयशाचा फायदा घेऊन पुढाऱ्यांच्या मनात रॉय यांच्याविरुद्ध विष कालवले. १९२८ साली सहवी जागतिक साम्यवादी परिषद भरून अतिजहाल धोरणाचा अंमल करण्याचे ठरले आणि मग मवाळ, क्रांतिविरोधी असा शिक्का मारून रॉय यांना साम्यवादी संघटनेतून बाहेर काढण्यात आले पण रॉय यांना ते एक आव्हान आहे असे वाटले. [⟶ इंटरनॅशनल, द].

               

साम्यवादी पक्षातील मतभेद आणि वैमनस्ये १९२७-२८ पासून वाढतच होती. ती केवळ भारतापुरती किंवा भारतीय पक्षापुरती मर्यादित नव्हती. १९२८ मध्ये जागतिक सामयवादी पक्षाची जी सहावी परिषद झाली, त्या परिषदेमध्ये या मतभेदांचा स्फोट झाला. बऱ्याचशा जुन्या कार्यकर्त्यांच्या मताविरुद्ध सहाव्या परिषदेने अतिजहाल मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. त्या वेळी समाजवादी पक्ष व इतर संस्था यांच्याशी शत्रुत्वाने वागण्याचे ठरले आणि त्या संस्क्षेमधील संयुक्त आघाडीचे (युनायटेड फ्रंट) काम बंद करण्यात आले. तसेच त्या संस्थांबरोबरही सगळे संबंध तोडून टाकण्याची आज्ञा सर्व साम्यवादी कार्यकर्त्यांना देण्यात आली. या धोरणांमुळे यूरोपमध्ये आणि इतरत्र वाढणार्या  फॅसिस्ट शक्तिंना परिणामकारक विरोध करता आला नाही. रॉय यांनी या धोरणाला पहिल्यापासूनच विरोध केला होता. काँग्रेसशी सहकार्य करूनच साम्यवादी पक्षाने आपले कार्य व बळ वाढवावे, अशी त्याची सूचना होती. या सूचनेचा अव्हेर झाला आणि राष्ट्रीय काँग्रेसमधील पुरोगामी शक्तीशीदेखील शत्रुत्वाने वागावे, असा आदेश सर्व साम्यवादी कार्यकर्त्यांना देण्यात आला. रॉय यांनी या धोरणाविरुद्ध आपले मत स्पष्टपणे जाहीर केले. त्यासंबंधी त्यांनी काही लेखदेखील लिहिले. त्यामुळेच १९२९ साली त्यांची साम्यवादी पक्षातून हकालपट्टी झाली. साम्यवादी पक्षाने काँग्रेसविरुद्ध आघाडी उभारली आणि तिच्या सर्व कार्यक्रमांना विरोध सुरू केला.

भारतामध्ये आपल्याला परत पाठवावे असा त्यांनी साम्यवादी पुढाऱ्यांशी बरेच दिवस आग्रह धरला पण तो स्वीकरण्यात आला नाही. १९३० च्या अखेरीस गुप्त रीतीने ते भारतात येऊन दाखल झाले. त्यानंतर सहा महिने ते भारतामध्ये गुप्तपणे राहिले. या अवधीत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घेतल्या. पं. जवाहरलाल नेहरूंकडे तर ते दोन-तीन दिवस मुक्कामाला होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी संयुक्त प्रांताचा दोन-तीन दौराही केला होता.

               

रॉय भारतात परत आले ते आपल्या विचारसरणीनुसार कार्य करण्याच्या उद्देशाने. काँग्रेसची १९३० ची असहकाराची चळवळ त्यावेळी मंदावत आली होती आणि विशेषेकरून तरुण मंडळीत औदासिन्य पसरले होते. म. गांधींजवळ खादी आणि ग्रामोद्योग यांखेरीज दुसरा कार्यक्रम नव्हता. रॉय यांनी त्या वेळी काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि स्वातंत्र्याचा लढा वाढविण्याचा कार्यक्रम जनतेसमोर ठेवला. त्या कार्यक्रमाचा पुरस्कार करण्यासाठी म्हणून जनतेची संघटना हवी होती. ती निर्माण करण्यासाठी रॉय यांनी या सुमारास आपली काँग्रेस अंतर्गत अशी ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन’या नावाची संस्था १९३१ मध्ये स्थापन केली. तिचे काम हळूहळू देशभर वाढत होत.

               

रॉय यांच्या या उद्योगांची पोलीसांनी शहानिशा सुरू केली. त्यांच्यावर पूर्वीचे कानपूर खटला व मीरत खटला यासंबंधीचे आरेप होतेच. त्या निमित्ताने पोलिस सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेत होते. २१ जुलै १९३१ रोजी अखेर पोलिसांना यश आले. रॉय यांना मुंबई येथे भायखळा भागात अटक झाली. नंतर त्यांना कानपूर येथे नेण्यात आले. तेथेच तो खटला चालला व त्यामध्ये रॉय यानां १२ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. पुढे आपलीच ती शिक्षा ६ वर्षांवर आणण्यात आली. तुरूंगातील हा काळ रॉय यांनी अभ्यासात घालविला. त्याचप्रमाणे तुरूंगाबाहेरील सहकाऱ्यांना ते वेळोवेळी मार्ग दर्शनपर आणि विवेचनात्मक संदेश गुप्तपणे पाठवत असत.

               

रॉय यांची नोव्हेंबर १९३६ मध्ये तुरूंगातून मुक्ता झाली. त्यांचे सहकारी व काँग्रेस पुढारी यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रॉय हे ताबडतोब आपल्या कार्याला लागले. अगोदर विचार करून ठरल्याप्रमाणे, रॉय यांनी ताबडतोब काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश त्यांनी पं. नेहरूंच्या सल्लाप्रमाणे संयुक्त प्रांतात केला. पं नेहरूंच्या मदतीमुळे रॉय यांची ताबडतोब फैजपूर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून व प्रांतिक काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाचे सभासद म्हणून निवड झाली. रॉय यांचे राजकीय सहकारी याच सुमारास ताबडतोब काँग्रेसचे सभासद बनून आपले कार्य करत होते. त्या सर्वाचा मिळून एक ‘रॉय गट’ स्थापना झाला. काँग्रेस कार्यप्रवण व सामर्थ्यशाली बनवावी तसेच काँग्रेसने शेतकरी-कामकऱ्यांशी व सामान्य जनतेशी एकरूपता सावाधी, असा रॉय व त्यांचे सहकारी यांचा प्रयत्नक होता.

               

दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ साली सुरू झाले. हे युद्ध फँसिझम विरोधी आहे, म्हणून त्याला भारतीय जनतेने मदत करावी व त्या बाबतीत सहकारशी सहकार्य करावे अशी रॉय यांची भूमिका होती. १ सप्टेंबर १९४० रोजी रॉय यांनी युद्धसहकार्याबद्दलचे मोठे निदर्शन केले. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली.

               

त्यानंतर रॉय यांनी आपला स्वतःचा ‘रँडिकल डेमाँक्रँटिक पार्टी’ हा पक्ष १९४० मध्ये स्थापन केला.

               

युद्धकाळात या पक्षाने लोकविरोधकाला न जुमानता युद्धसहकार्याचे धोरण स्वीकारले आणि त्याप्रमाणे काम केले. युद्धसहकार्य हे साधाऱणपणे लोकांनाही पसंत नव्हते आणि म्हणून युद्धकाळात रॉय यांची लोकप्रियता बरीच खालावली. वर्तमानपत्रातूंन त्यांच्या विरुद्ध प्रचार झाला, त्यांच्या सहकार्यांरविरुद्ध काही ठिकाणी दगडफेक, चिखलफेक देखील झाली. या सर्व प्रकारांमुळे विचलीत न होता रॉय यांनी आपले निश्चित केलेले धोरण तसेच चालू ठेवले.

             


  

रॉय यांचे तात्त्विक चिंतन-मनन चालू होतेच. राजकीय पक्ष जनतेच्या हातामध्ये सत्ता जाण्याच्या कामी साहाय्याभूत होत नाहीत, असे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी १९४८ मध्ये आपला पक्ष विसर्जित केला. जनतेमध्ये जागृती निर्माण करणाच्या प्रयत्नास त्यांनी स्वतःला वाहून घेतले.

               

तुरूंगवासातील हालअपेष्टामुळे रॉय यांची प्रकृती १९३६ पासूनच बिघडली होती. नंतरच्या धावपळीत ती अधिकच बिघडली. ती आटोक्याबाहेर गेली नाही, याचे मुख्य कारण, त्यांची पत्नी एलन रॉय यांनी केलेली त्यांची शुश्रूषा. १९३८ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. रॉय साम्यवादी पक्षात होते, तेव्हापासून त्या सहकारी होत्या.

               

रॉय यांनी १९४६ मध्ये बावीस सूत्रांच्या स्वरूपात आपला नवमानवतावाद मांडला. मानवी प्रकृतीची घडण, तिच्यात समाविष्ट असलेल्या मूलभूत शक्ती आणि प्रेरणा तसेच मानवाची समग्र परिस्थिती सम्यक आकलनावर नवमानवतावाद आधारलेला आहे.

पक्षविसर्जनानंतर जनतेची जागृती करणे आणि तिची संघटना बांधणे हे कार्य रॉय आमरण चालू ठेवले . ‘रँडिकल हयूमँनिस्ट चळवळ’ या नावाने त्यांचे हे कार्य नावारूपास आले. त्यांच्या मृत्यूनंतरही ही चळवळ टिकून आहे.

               

संस्कारक्षम वयात रॉय याच्या विचारांवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद वगैरेच्या विचाराचा खूप प्रभाव होता. ऐन तारूण्यात संन्यासमार्गाचा स्वीकार करण्यासाठी विचार त्यांनी केला होता, परंतु नंतर सशस्त्र क्रांतिमार्गाकडे ते वळले. पुढे तोही मार्ग टाकून त्यांनी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत कार्य केले. साम्यवादाच्या स्वीकारानंतरही त्यांचे आत्मपरीक्षण व तत्त्वचिंतन चालूच राहिले. यातूलच साम्यवादामधील उणिवाही त्यांना दिसून आल्या आणि साम्यवादानंतरचा मार्ग म्हणून त्यांनी नवमानवतावादाचा पुरस्कार केला.

               

डेहराडून येथे त्यांचे निधन झाले.

पहा : नवमानवतावाद.

संदर्भ :  1. Karnik, V. B. M. N. Roy: Political Biography, Bombay, 1978.           

             २. कर्णिक, द्वा. भ. मानवेन्द्रनाथ रॉय : व्यक्ती आणि विचार, मुंबई, १९८१.   

             ३.रेगे, मे. पु. संपा. नवभारत (मासिक): एम् .एन् .रॉय विशेषांक, फेब्रुवारी-मार्च, वाई, १९८७.

               

                                                कर्णिक, व. भ.