ग्रँड रॅपिड्स् : अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील केंट परगण्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,९७,६४९ (१९७o). हे लॅन्सिंगच्या वायव्येस १oo किमी. व मिशिगन सरोवराच्या पूर्वेस ४o किमी. ग्रँड नदीवर असून येथील ५·५ मी. खाली येणाऱ्या द्रुतवाहाजवळ ओटावा इंडियनांची प्रथम वस्ती होती. मग इतर इंडियन आले व गोरे व्यापारी एकोणिसाव्या शतकात त्यांच्याकडून केसाळ कातडी विकत घेऊ लागले. पुढे ते आंतरप्रांतीय व्यापाराचे मोठे केंद्र झाले. हल्ली विविध शेतमाल, फळफळावळ, जिप्सम, वाळू वगैरेंची मोठी बाजारपेठ येथे असून हे महत्त्वाचे औद्योगिक शहरही आहे. येथील विविध प्रकारच्या फर्निचरचे उत्पादन विशेष प्रसिद्ध आहे. फर्निचर, मोटारींचे सुटे भाग व सांगाडे, विमानांची विविध यंत्रे, कागदाचे पदार्थ, विजेची उपकरणी, तेलशुद्धी असे परोपरीचे कारखाने आहेत. प्रकाशन व शिलामुद्रण हे महत्त्वाचे व्यवसाय आहेत. कॅल्व्हिन कॉलेज, मिशिगन विद्यापीठांची शाखा यांसारख्या शैक्षणिक संस्थांमुळे व फर्निचर-संग्रहालय, कलावीथी, ग्रंथालय, खगोलालय, उद्याने इत्यादींमुळे याचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्वही मोठे आहे.

ओक, द. ह.