खंडितकायी–कृमिरोग :(शिस्टोसोमियासिस अथवा बिल्हार्झियासिस). विशिष्ट जातींच्या परजीवी ( अन्य प्राण्यांच्या शरीरावर उपजीविका करणाऱ्या) कृमींची रक्तात वाढ झाल्यामुळे उत्पन्न होणारे विकार.

मनुष्यात मुख्यत: तीन जातींच्या पर्णकृमींमुळे (पानाच्या आकाराच्या कृमींमुळे) हा रोग होतो. (१) आफ्रिकेत शिस्टोसोमा मॅनसोनाय  या जातीच्या कृमींच्या अंड्यांच्या पार्श्वभागी काट्यासारखी रचना दिसते.(२) शि. हिमॅटोबियम  या जातीच्या कृमीमुळे मुख्यत: आफ्रिका, मध्यपूर्वेकडील देशांत आणि भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर हा रोग आढळतो. या कृमीच्या अंड्यांच्या टोकाला काटा असल्यासारखा दिसतो. (३) शि. जॅपॉनिकम  या जातीच्या कृमीमुळे जपान, चीन, फॉर्मोसा वगैरे दूरपूर्वेकडील देशांत रोग आढळतो. या कृमीच्या अंड्याला एका बाजूला फुगवटी दिसते.

क्वचित शि. बोव्हिस  आणि शि. मथेयी  या जातींच्या पर्णकृमींमुळेही हा रोग संभवतो. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातही हा रोग क्वचित आढळलेला आहे. या कृमींचा अंतिम पोषक (कृमींच्या वाढीच्या अंतिम अवस्थेत पोषण करणारा) मनुष्य असून मध्यस्थ (वाढीच्या मधल्या अवस्थेतील) पोषक गोगलगायीच्या विविध जाती असतात.

शि. मॅनसोनाय  आणि शि. जॅपॉनिकम  या कृमींची पूर्ण वाढ मनुष्यशरीरातील आंत्रमहानीलेच्या (आतड्याच्या मोठ्या नीलेच्या) शाखोपशाखांत होते, तर शि. हिमॅटोबियम  या जातीची पूर्ण वाढ मूत्राशयाच्या भोवतालच्या नीलांमध्ये होते. या ठिकाणी नर आणि मादी यांचा संयोग होऊन निषेचित (फलन झालेली) अंडी अनुक्रमे विष्ठा आणि मूत्रमार्गे शरीराबाहेर पडतात. ती अंडी पाण्यात गेल्याबरोबर त्यांची वाढ होऊ लागून त्यांच्यापासून पक्ष्माभिकामय (शरीराला केसासारखा बारीक अवयव असलेला) प्रथम डिंभ (अळीसारखी अवस्था) उत्पन्न होतो. हा डिंभ पाण्यात मोकळेपणाने फिरत असता, पाण्यातील गोगलगायीच्या शरीरात प्रवेश करतो आणि तेथे त्याचे रूपांतर बीजाणुपुटी (प्रजोत्पादक पेशी असलेली पिशवी) असे होऊन त्यांच्यापासून शेकडो पुच्छडिंभ (शेपटी असलेली अळी अवस्था) तयार होतात. हे पुच्छडिंभ गोगलगायीच्या शरीराबाहेर पाण्यात मोकळे होतात. त्या पाण्याशी मनुष्याचा संपर्क आला, तर हे पुच्छडिंभ त्वचेचाभेद करून मनुष्यशरीरात घुसून शेवटी नीलांमध्ये नर आणि मादी खंडितकायी कृमी तयार होऊन या कृमींचे जीवनचक्र पुरे होते.

लक्षणे : या रोगाच्या लक्षणांचे तीन प्रकार दिसतात : (१) संक्रामणावस्थेतील (रोगबाधा होत असताना), (२) अधिहर्षतेमुळे ( बाह्यपदार्थाच्या पूर्वसंबंधामुळे दुसऱ्या वेळी होणाऱ्या विकृत प्रतिक्रियेमुळे, ॲलर्जीमुळे ) आणि (३) स्थानिक. 

(१)  संक्रामणावस्थेत पुच्छडिंभ त्वचेचा भेद करीत असताना त्वचेला खाज सुटून तेथे पुरळ येतो.

(२) संक्रामणानंतर २ ते ८ आठवड्यांच्या अवधीनंतर त्वचेला खाज सुटून पित्त उठणे, यकृत व प्लीहेची (पांथरीची) वाढ होणे, मूत्रातून वा मलातून रक्त जाणे ही लक्षणे दिसतात. क्वचित लक्षणे तीव्र ⇨ आंत्रज्वरासारखी (टायफॉइडासारखी) होऊन मृत्यूही संभवतो.

खंडितकायी कृमींचे जीवनचक्र व अंडी : (अ) शिस्टोसोमा मॅनसोनाय प्रौढ (आ) अंडी : (१) शि. मॅनसोनाय, (२) शि. हिमॅटोबियम, (३) शि. जॅपॉनिकम (इ) जीवनचक्र : (१) अंडे, (२) प्रथम डिंभ, (३) गोगलगाय, (४) पुच्छडिंभ, (५) माणसाच्या पायाच्या त्वचेतून पुच्छडिंभ शिरताना, (६) माणसाच्या मलातून बाहेर पडणारे अंड.

(३) यकृत, आंत्र (आतडे) आणि मूत्राशय यांत स्थानिक शोथ (दाहयुक्त सूज) आणि तंतुमयता होते त्यामुळे त्या अंतस्त्यांच्या (उदराच्या पोकळीतील इंद्रियांच्या) कार्यात अडथळा निर्माण होऊन परिणामी यकृत सूत्रणरोग (यकृतपेशींचा मृत्यू होऊन संयोजी पेशीसमूहांची वाढ झाल्यामुळे यकृत जाड होणारा रोग). वृक्कशोथ (मूत्रपिंडाची दाहयुक्त सूज), पूयवृक्क (मूत्रपिंडाची पूयुक्त सूज) किंवा मूत्राशयात अंकुरार्बुद (चामखिळीच्या जातीची गाठ) होते. उपद्रव (संभाव्य उपविकृती) म्हणून शिश्न, मूत्राशय आणि गर्भाशयग्रीवा (गर्भाशयाचा चिंचोळा भाग) या ठिकाणी कर्करोगही होतो.

निदान : रक्तातील रक्तानुरागी (इओसीन या रंगद्रव्याने रंगल्या जाणाऱ्या) कोशिकांची (पेशींची) संख्यावृद्धी, मूत्राशयदर्शन (मूत्राशयदर्शिका या उपकरणाने मूत्राशयाची तपासणी करणे), मलाशयदर्शन, मूत्र आणि मलामध्ये कृमींची अंडी सापडणे वगैरे गोष्टींची निदानाला मदत होते. काही विशेष रक्तपरीक्षा, अंतस्त्वक् परीक्षा आणि बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) श्लेष्मकलेवरील (आतील स्तरावरील) द्रव्य घासून काढून त्याची परीक्षाही उपयुक्त ठरते.

चिकित्सा : प्रतिबंधात्मक : मलमूत्राचा पाण्याशी संबंध येऊ न देणे, गोगलगायींचा नाश, संसर्गित पाण्याचा संपर्क टाळणे, पाणी उकळून पिणे वगैरे प्रतिबंधक उपाय योजण्यात येतात. चीन व ईजिप्त या देशांत हा रोग अंतर्जन्य (त्याच ठिकाणी नेहमी उद्‌भवणारा असा) असतो. त्या देशांतून टार्टार एमेटिक नावाचे औषध इंजेक्शनाद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरून रोग नियंत्रण करतात.

रोगनाशक : त्रिसंयुजी (इतर अणूंशी संयोग होण्याची क्षमता दर्शविणारा अंक ३ असलेले) अँटिमनी (स्नायूत टोचून) अथवा स्टिबोफेन (नीलेत टोचून) व ल्यूकँथोन हायड्रोक्लोराइड म्हणजे मिरासिल-डी (मुखातून) ही द्रव्ये पर्णकृमींना मारक असून ती  रोगनाशक म्हणून बरीच वर्षे उपयोगात आहेत. निरिडाझोल हे औषध तिन्ही जातींच्या पर्णकृमींवर गुणकारी ठरले आहे.

या रोगापासून होणाऱ्या उपद्रवांना अनुरूप अशी औषधी वा शस्त्रचिकित्सा करावा लागते.

पशूंतील खंडितकायी-कृमिरोग : विशिष्ट जातींच्या खंडितकायी-कृमींमुळे पशूंमध्येही आजार संभवतात. त्यांतील महत्त्वाच्या रोगांची माहिती त्या त्या पशूच्या नोंदीमध्ये दिली आहे.

सलगर, द. चि.